'ग्रीन कॉलेज-क्लीन कॉलेज ' स्पर्धेत 'या' महाविद्यालयाची बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • प्रा. प्रतिभा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाने बाजी मारली.
  • मंगळवारी अंबड येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन फॅक्‍टरीच्या आवारातील अस्मिता सभागृहात हा कार्यक्रम झाला.

नाशिक : किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवांतर्गतच्या ‘इको रेंजर्स’मधील ‘ग्रीन कॉलेज-क्‍लीन कॉलेज’ उपक्रमात मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे यश मिळविले. सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाने हे यश मिळविले. 

प्रा. प्रतिभा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाने बाजी मारली. मंगळवारी अंबड येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन फॅक्‍टरीच्या आवारातील अस्मिता सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रा. अश्‍वीन अमृतकर, प्रा. वंदना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अशोका बिझनेस स्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट, लोकनेते गोपीनाथराव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रमात सहभाग राहिला. प्रा. पगार म्हणाल्या, की एकदा वापरता येतील अशा प्लॅस्टिक बाटल्यांपासून तयार केलेल्या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे महाविद्यालय परिसरातील झाडांना पाणी देण्यात येते.

तसेच पाणी बचतीबाबत जनजागृती, वृक्षारोपण, सर्व कार्यक्रमांत ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक वापर बंद आदी उपक्रम राबविण्यात आले. भविष्यात महाविद्यालयाच्या परिसरातील पाला-पाचोळ्या यांपासून खतनिर्मिती, आठवड्यातून किमान एक दिवस सायकलचा विद्यार्थ्यांकडून वापर असे उपक्रम राबविण्यात येतील.

अशोका बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’, सौरऊर्जा, आवारात प्लॅस्टिकचा वापर थांबविणे, ‘ग्रीन वेलकम’ अशा आपल्या उपक्रमांची माहिती दिली. वसुंधरा क्‍लबचे अमित टिल्लू आणि सुवर्ण भांबूरकर यांनी परीक्षण केले. वसुंधराचे वीरेंद्र चित्राव यांनी प्लॅस्टिकच्या जागतिक प्रदूषणाची माहिती दिली.

या वेळी किर्लोस्कर समूहाचे मकरंद देवधर, राहुल बोरसे, निखिल चमणीकर, स्वप्नील राव आदी उपस्थित होते. श्री. चमणीकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बोरसे यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News