महाराष्ट्राच्या राहुल आवारेची ब्राॅंझपदकाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

या आशियाई कुस्ती स्पर्धेची आज सांगता झाली. काही भारतीय मल्लांनी सुवर्णपदकापर्यंत मजल मारली, परंतु अंतिम फेरीचा अडथळा आजही पार करता आला नाही.

नवी दिल्ली :  रिपेजेसमधून ब्राँझपदकाची लढत खेळण्याची संधी मिळालेल्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ब्राँझपदकास गवसणी घातली. या लढतीत त्याने इराणच्या दस्तून आलमचा ५-२ असा पराभव केला. जितेंदर कुमारला सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दीपक पुनियानेही राहुलप्रमाणे ब्राँझजिंकले.

या आशियाई कुस्ती स्पर्धेची आज सांगता झाली. काही भारतीय मल्लांनी सुवर्णपदकापर्यंत मजल मारली, परंतु अंतिम फेरीचा अडथळा आजही पार करता आला नाही.
२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक आणि २०१९ मधील आशियाई आणि जागतिक स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या राहुलने मात्र ६१ किलो गटात ब्राँझपदकाचा आपला लौकिक आशियाई स्पर्धेतही कायम ठेवला. उपांत्यपूर्व फेरीत किर्गिजिस्तानच्या झोल्दोशेबेकोवकडून ३-५ अशी निसटती हार झाल्यामुळे राहुलला रिपेजेसमधून ब्राँझपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली. 

या लढतीत पहिले मिनीटभर राहुलने दस्तानची ताकद आणि क्षमता आजमावली, त्यात त्याने एक गुण गमावला असला, तरी लगेचच आपला पवित्रा बदलत त्याने दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर २-२ अशा बरोबरीनंतर राहुलने प्रथम बचाव भक्कम केला आणि कुस्ती जसी पुढे जात राहिली, तसे आक्रमण केले. अखेरच्या क्षणी पूर्ण ताकद लावून दस्तानला निरुत्तर केले आणि ५-२ अशी बाजी मारली.

जितेंदरचे सुवर्ण हुकले

७४ किलो गटात अंतिम फेरी गाठणाऱ्या जितेंदरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. गेल्या तीन दिवसांनंतर आज तरी भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु कझाकस्तानच्या किसानोव दानियरकडून जितेंदरची १-३ अशी हार झाली. जितेंदर पहिल्याच मिनिटात ०-२ असा पिछाडीवर पडला होता. 

रिपेजेसमधून ब्राँझपदकाची लढत खेळणाऱ्या दीपक पुनियाने इराकच्या अल ओबिदीला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. पहिल्या दोन मिनिटांत ६-० अशी आघाडी घेत तीन मिनिटांतच १०-० असा विजय मिळवला. अल्‌ ओबिदीला मॅटवर उभे न ठेवण्याची आक्रमकता दीपकने दाखवली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News