बोर्डाच्या ऑनलाइन नियोजनाचा उडाला फज्जा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

औरंगाबाद विभागात बारावीचे एकूण ४०६ परीक्षा केंद्रे आहेत. त्यापैकी अजूनही ५ ते ७  जणांनी अद्यापही नोंदणीच केलेली नाही.

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकराची माहिती ऑनलाइन भरण्याच्या सूचना आहेत. औरंगाबाद विभागात सर्रास कॉपी प्रकरणे समोर येत आहेत. केंद्र संचालकांना कॉपी प्रकरणाची माहिती ऑनलाइन भरण्याची सूचना दिली असताना अनेक केंद्र संचालकांकडून माहिती भरण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे उशिरापर्यंत बोर्डाकडे कॉपी प्रकरणाची माहितीच येत नाही. त्यामुळे बोर्डाच्या या ऑनलाइन नियोजनाचा फज्जा उडाला आहे. 

यंदापासून बोर्डाने सर्व केंद्र संचालकांकडून परीक्षा केंद्रावर घडणाऱ्या गैरप्रकारांची ऑनलाइन माहिती मागविली आहे. मात्र, अनेक केंद्रसंचालकांकडून ही माहिती वेळेवर भरली जात नसल्याने विभागात किती गैरप्रकार घडले, किती कॉपी प्रकरणे झाली याची माहितीच बोर्डाकडे उपलब्ध नाही. जी आकडेवारी आहे त्यातही मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. परीक्षांदरम्यान कॉपी आणि गैरप्रकरणाची माहिती सर्व केंद्र संचालकांकडून ऑनलाइन पद्धतीने राज्य मंडळाने मागवली आहे. त्यासाठी प्रथम केंद्र संचालकांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

औरंगाबाद विभागात बारावीचे एकूण ४०६ परीक्षा केंद्रे आहेत. त्यापैकी अजूनही ५ ते ७  जणांनी अद्यापही नोंदणीच केलेली नाही. शिवाय ज्या केंद्रांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे त्यांनी सकाळ सत्रातील पेपर मधील गैरप्रकाराची माहिती १ ते ३ या वेळेत, तर दुपारच्या सत्रातील पेपरमध्ये घडलेल्या गैरप्रकाराची माहिती ५ ते ७ यावेळेत ऑनलाइन अपडेट करणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक केंद्रे ही माहिती उशिराने किंवा पाठवतच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बोर्डातील अधिकाऱ्यांकडेच विभागात घडलेल्या गैरप्रकारांची तसेच कॉपी केसेसच्या आकडेवारीत घोळ दिसत आहे. 

असाही घोळ

सोमवारी बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरला केवळ १२ कॉपी केसेस झाल्याची माहिती बोर्डाकडून सायंकाळी देण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद विभागातील परभणी जिल्ह्यात एका केंद्रावर ३५, तर दुसऱ्या केंद्रावर ३६ असे तब्बल ७१ गैरप्रकार घडल्याचे समोर आले. याची उशिरापर्यंत बोर्डाकडे माहितीच उपलब्ध नव्हती. केंद्रसंचालकांची ऑनलाइन माहिती अपडेट न केल्याने हा घोळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News