बास्केटबॅाल स्पर्धेत बीएनएस, एसएसबीए, आर्चिड संघाचा विजयी डंका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात मिलेनियम प्रशाला, बीएनएस, ऑल स्टार्स ‘अ’, एसएसबीए, अभिनव आणि आर्चिड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.

पुणे :  पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित तेरा वर्षांखालील गटाच्या राजाभाऊ चितळे स्मृती करंडक बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात मिलेनियम प्रशाला, बीएनएस, ऑल स्टार्स ‘अ’, एसएसबीए, अभिनव आणि आर्चिड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मिलेनियम प्रशालेने ब्लू हॉक्‍स संघाचा एकतर्फी सामन्यात २४-२ असा २२ गुणांनी पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा श्‍लोक चोपडाचा (८ गुण) होता. मिलेनियमने मध्यंतरास २०-० अशी मोठी आघाडी घेतली होती.  

शिव वाडियाने २४ गुण नोंदविताना केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर एसएसबीए ‘अ’ संघाने सरदार दस्तूर संघाचा ५८-४० असा अठरा गुणांनी पराभव केला. मध्यंतरास एसएसबीएच्या खेळाडूंनी ३०-१७ अशी तेरा गुणांची मिळविलेली आघाडी वाढवत नेत विजयावर शिक्कामोर्तब केले. सरदार दस्तूरच्या मोहंमद साबीनने (१७ गुण) केलेली खेळी अपुरी पडली.      

बीएनएस संघाने एबीसी ‘ब’ संघाचा रंगतदार सामन्यात ३१-३० असा एक गुणाच्या फरकाने निसटता पराभव केला. मध्यंतरास बीएनएस संघाच्या खेळाडूंनी १७-१४ अशी तीन गुणांची मिळविलेली आघाडी महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या आर्यन प्रजापती, तर पराभूत संघाकडून राघव व्यासने (८ गुण) सुरेख खेळ केला.

ईशान यादवने (९ गुण) उत्तरार्धात केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर अभिनव संघाने सेंट मेरीज ‘ब’ संघावर २२-१४ असा आठ गुणांनी विजय मिळविला. मध्यंतरास दोन्ही संघ ८-८ असे बरोबरीत होते. सेंट मेरीजच्या ऑगस्टिन राजपूतने केलेली खेळी अपुरी पडली.

ऑल स्टार्स ‘अ’ संघाने एसएसबीए ‘ब’ संघाला २५-७ असे अठरा गुणांनी हरविले. मध्यंतरास ऑल स्टार्सने १४-७ अशी सात गुणांची आघाडी मिळवली होती. या वेळी विजयी संघाकडून गोडल आत्मजित (७ गुण), तर पराभूत संघाकडून आदित्य गायकवाडने (५ गुण) जोरदार खेळ केला.

अर्जुन पाटीलने (९ गुण) केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर ऑर्चिडने मिलेनियम क्‍लबचा ३१-४ असा २७ गुणांनी पराभव केला. मध्यंतरास त्यांनी  २३-० अशा मोठी आघाडी मिळवली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News