'रक्तदान' करून विद्यार्थ्याने साजरा केला वाढदिवस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • सध्याच्या स्वार्थी युगात प्रत्येक व्यक्ती हा आपला स्वार्थ साधत असतो.
  • या गोष्टींना तिलांजली देत मित्रासाठी रक्तही द्यायला तयार होणारे मित्र पाहून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मळनेर : अनेक व्यक्ती वाढदिवसावर विनाकारण खर्च करीत असतात. मात्र, दहिवद येथील रोशन मावळे या विद्यार्थ्याने आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. त्याने काळाची पाऊले ओळखत रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे मित्रांनीही भेटवस्तू देण्यापेक्षा स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.  

रोशन हा जळगाव येथील दर्जी फाउंडेशनमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. रोशन मावळेने वाढदिवसाचे औचित्य साधत मित्रांसह रक्तदान करण्याचे ठरवले. रोशन मावळेसह सागर पाटील, समाधान मानकर, अमोल शेलार, पंकज गायकवाड, जयेश वाघ, कुणाल चौधरी, अमोल बागुल यांनी रेडप्लस ब्लड बँक येथे रक्तदान करून तेथे वाढदिवस साजरा केला. जीवाला जीव देणारे मित्रही भरपूर असतात मात्र, आपल्या मित्रासाठी रक्तदान करणारे मित्र फार कमी असतात.

सध्याच्या स्वार्थी युगात प्रत्येक व्यक्ती हा आपला स्वार्थ साधत असतो. अशा या गोष्टींना तिलांजली देत मित्रासाठी रक्तही द्यायला तयार होणारे मित्र पाहून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. रोशन हा लोकसंघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे खानदेश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे व दहिवद गावाच्या प्रथम आदिवासी महिला सरपंच नंदाबाई मावळे यांचा पुत्र आहे. त्याच्या या अनोख्या कृतीचे लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व दर्जी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी कौतुक केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News