तर विश्‍वकरंडक महिला क्रिकेट सामना का नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

विश्‍वकरंडक महिला ट्‌वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत खेळाडूंची कामगिरी नव्हे तर पाऊस निर्णायक ठरणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

सिडनी : विश्‍वकरंडक महिला ट्‌वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत खेळाडूंची कामगिरी नव्हे तर पाऊस निर्णायक ठरणार अशीच चिन्हे दिसत आहेत. त्यात उपांत्य लढती असूनही राखीव दिवस न ठेवल्यामुळे पाऊस हा भारत आणि दक्षिण आफ्रिका या गटविजेत्यांच्या पथ्यावर पडणार, अशीच चिन्हे दिसत आहेत.

सिडनीत एकाच दिवशी दोन्ही उपांत्य लढती आहेत. त्यातील भारत-इंग्लंड लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता आहे, तर ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका लढत दुपारी १.३० वाजता. गुरुवारी म्हणजेच सामन्याच्या दिवशी २० मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीपूर्वी म्हणजे सकाळच्या सत्रात नऊ मिमी पाऊस होईल, तर लढतीच्या कालावधीत किमान सहा मिमी पावसाचा अंदाज आहे, तर ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका या प्रकाशझोतातील सामन्याच्यावेळी पाच मिलिमीटर पाऊस होऊ शकेल.

बिग बॅश लीगची लढत होते, तर विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील का होणार नाही, अशी विचारणा केली जात आहे. बिग बॅश लीग झालेल्या आठवड्यात १८० मिलिमीटर पाऊस झाला होता, याची आठवण करून दिली जात आहे. कितीही पाऊस झाला तरी पाऊण तासात मैदान खेळण्यायोग्य करण्यात येईल, अशी ग्वाही येथील ग्राऊंडस्‌मन देत आहेत. ग्राऊंडस्टाफने त्याचवेळी येथील ड्रेनेज व्यवस्थेची नव्याने तपासणी केली

.

राखीव दिवसाची मागणी फेटाळली

यजमान ऑस्ट्रेलियाने पावसाची शक्‍यता पाहून उपांत्य लढतीसाठी राखीव दिवस देण्याची मागणी केली, पण स्पर्धा नियम सांगत आयसीसीने ही विनंती फेटाळली. भारताने गटविजेतेपद जिंकताना ऑस्ट्रेलियास मागे टाकले होते, तर दक्षिण आफ्रिकेने गटात अव्वल ठरताना इंग्लंडला मागे टाकले. अर्थातच उपांत्य लढत वाया गेल्यास प्रतिस्पर्ध्यात गटात अव्वल असलेला संघ विजयी घोषित होईल, असे ठरले आहे. त्यामुळे पावसाने लढती न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी लढतील.

भारत वि. इंग्लंड लढतीपूर्वी

 गेल्या पाच सामन्यांत भारताचे चार विजय, तर इंग्लंडचे तीन
 विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- २० स्पर्धेतील भारताविरुद्धच्या पाचही लढतीत इंग्लंडची सरशी आहे. सिडनी मैदानाची खेळपट्टी फिरकीस अनुकूल, पण पावसामुळे मध्यमगती गोलंदाजीस साथ देण्याची शक्‍यता आहे. शफाली वर्माचा या स्पर्धेतील स्ट्राईक रेट १६१. या स्पर्धेत सर्वाधिक आहे. सोफी एकलस्टनचा इकॉनॉमी रेट ३.२३, या स्पर्धेत सर्वोत्तम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News