आणि 'ती' ठरली देशातील पहिली मराठी लेफ्टनंट जनरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

डॉ. कानिटकर यांनी ३७ वर्षे लष्करात सेवा केली. त्या पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) विद्यार्थिनी आहेत.

पुणे : मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरलपदावर पदोन्नती देण्यात आली. नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाचे उपप्रमुख म्हणून (सीडीएस-वैद्यकीय) त्यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली. लष्करातील या उच्च पदावर पोचलेल्या त्या पहिल्या मराठी अधिकारी ठरल्या आहेत.

डॉ. कानिटकर यांची गेल्या वर्षी लेफ्टनंट जनरलपदावर बढती करण्यात आली होती. पण, जागा रिक्त नसल्याने त्यांनी शनिवारी या पदाचा कार्यभार सांभाळला. वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी डॉ. कानिटकर यांना या पदाची ‘रॅंक’ बहाल केली. या वेळी त्यांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त) उपस्थित होते.

नवी दिल्ली येथील ‘सीडीएस-वैद्यकीय’ विभागाची सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. लष्कर, नौदल आणि हवाईदल या तीनही संरक्षण दलांबाबत केंद्राला सल्ला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. लेफ्टनंट जनरल हे पद मिळविण्याऱ्या डॉ. कानिटकर या देशातील तिसऱ्या, तर पहिल्या मराठी अधिकारी ठरल्या.

डॉ. कानिटकर यांनी ३७ वर्षे लष्करात सेवा केली. त्या पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) विद्यार्थिनी आहेत. त्या वेळी त्यांना राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते. त्यांनी बालरोग या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. ज्या महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तेथेच त्या २०१७ मध्ये अधिष्ठाता पदी रुजू झाल्या. त्यानंतर त्यांना उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांचे पतीदेखील लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल या पदासाठी तीन स्टार असतात. असे पद नौदलात व्हाइस ॲडमिरल, तर हवाईदलात एअर मार्शल या पदांना असते. पुनीत अरोरा या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News