तिकीट काढता काढता त्याने जमवले चक्क २०० जणांचे लग्न

अजित कुलकर्णी
Monday, 2 March 2020

पोटात शिरुन बोलण्याच्या खुबीमुळे एसटी खात्यासह समाजातही एक वेगळी ओळख. नोकरीच्या निमित्ताने सांगली स्टॅंडपासून ते सिटी बसच्या फेऱ्या जिथंपर्यंत जातात, त्या प्रत्येक मार्गावर हा माणूस पोहचलाय. ३३ वर्षांच्या सेवेत मामांनी एक दोन नव्हे तर २०० जणांची लग्ने जमवलीत.

सांगली : लग्न म्हणजे दोन जिवाचं मिलन. दोन कुटुंबीयांचा मिलाफ. पण हा मिलाफ सहजासहजी जुळत नसतो. त्यासाठी अनेक कसोट्यातून जावे लागते. कधी रंग-रूप तर कधी सोने-नाणे तर कधी देण्या-घेण्यावरून जुळत आलेली सोयरिक मोडण्याचे प्रकार सर्रास घडतात. सध्याच्या हायटेक जमान्यात तर विवाह जुळणे ही एखादी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे बनले आहे. एजंटांनी तर फसवणूक, गंडा घालण्याचे प्रकार नित्याचे आहेत. मात्र एसटीमध्ये वाहक असणाऱ्या एका अवलियाने तिकीट काढता काढता दोनशे जणांचा विवाह जुळवला. या भन्नाट माणसाची गोष्टच न्यारी आहे. 

त्यांचे नाव बाळकृष्ण पांडुरंग पाटील ऊर्फ मामा. कोरेगाव येथील हा माणूस तसा मोकळाढाकळा. पोटात शिरुन बोलण्याच्या खुबीमुळे एसटी खात्यासह समाजातही एक वेगळी ओळख. नोकरीच्या निमित्ताने सांगली स्टॅंडपासून ते सिटी बसच्या फेऱ्या जिथंपर्यंत जातात, त्या प्रत्येक मार्गावर हा माणूस पोहचलाय. ३३ वर्षांच्या सेवेत मामांनी एक दोन नव्हे तर २०० जणांची लग्ने जमवलीत. प्रवाशांशी अदबीने वागण्याची सवय व बोलक्‍या स्वभावामुळे प्रत्येकाला हा माणूस आपला घरचाच वाटतो. शिक्षणाच्या निमित्ताने खेड्या-पाड्यातून येणाऱ्या तरुणाईशी जाम मैत्री. त्यामुळेच अनेक मुलींच्या केवळ स्वभावाची पारख करुन त्यांची योग्य ठिकाणी सोयरिक जमवली आहे. मुलगी किंवा मुलगा कसा आहे, त्याचे वर्तन, स्वभाव, राहणीमान या गोष्टींचा अंदाज घेत मामा त्याच्या आई-वडीलांशी सोयरिकीबद्दल बोलत. पालकांचाही तितकाच गाढ विश्‍वास असल्याने ‘मामा म्हणतील तसं’ हाच ठेका.

पै-पाहुणे जमले, वधू-वर एकमेकांना पसंत असले की बस्स. तेथून पुढे मामाचे काम सुरु होते. देणे-घेणे, सोने-नाणे यावरुन एकही लग्न मोडले नाही. जमवलेल्या सोयरिकीत भांडण, वादामुळे विभक्‍त, घटस्फोटाची एकही तक्रार आजवर नाही. स्वत:च्या लग्नापूर्वी त्यांनी दुसऱ्याची ५ लग्ने जमवली होती. नि:स्वार्थी व निरपेक्ष भावनेने काम केल्याचे फळ म्हणून दोन जीवघेण्या अपघातातून बचावल्याचे ते सांगतात. सेवेत असताना समाजसेवेचा व्याप असतानाही एकदाही त्यांच्या नावावर बिनपगारी रजा अथवा लेटमार्क नसल्याने ‘काटा पाटील’ म्हणूनही त्यांची ओळख आहे.

पत्रिका, कुंडलीपेक्षा कर्तृत्व पहा...

कोरेगावातील प्रत्येक समाजात सोयरिक जमवत गावची नाळ कायम राखली आहे. परिस्थिती नसलेल्या स्थळांना प्रसंगी स्वत:चे सोने, आर्थिक मदत देऊन संसार उभारले आहेत. पत्रिका, कुंडली यापेक्षा मुला-मुलींचे कर्तृत्व बघून विवाह होण्यासाठी ते आग्रही आहेत. स्वत:चे लग्नही किरकोळ गोष्टींवरून अडण्याची चिन्हे दिसताच त्यांनी घरच्यांचा विरोध मोडून केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा छंद अव्याहत सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News