‘खेलो इंडिया’ स्पर्धेत दिशाची सुवर्ण कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020
  • तिच्या या विजयामुळे किनगावसह यावल तालुक्यात व जळगाव शहरात जल्लोष करण्यात अाला.
  • दिशा ही जळगाव येथील पी. एन. लुंकड कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी, तर नीलेश बॉक्सिंग क्लबची खेळाडू आहे.

यावल : किनगाव येथील दिशा विजय पाटील हिने गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया’मध्ये १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आज सुवर्णपदक मिळविले. तिने आज सायंकाळी झालेल्या सामन्यात हरियानाच्या रुद्रिका कुंदू हिचा पराभव केला व महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.

किनगाव येथील महाराष्ट्राची चॅम्पियन व राष्ट्रीय पदकविजेती बॉक्सर दिशा विजय पाटील हिने गुवाहाटी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. १७ वर्षांखालील ६५ वजन गटातून या स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, तर सोमवारी झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत तिने बंगालच्या मोनालिसा दास हिचा पराभव केला. आज सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात तिने हरियानातील बाॅक्सर रुद्रिका कुंदू हिला धूळ चारली व सुर्वणपदकाची कमाई करून दिली. तिच्या या विजयामुळे किनगावसह यावल तालुक्यात व जळगाव शहरात जल्लोष करण्यात अाला. दिशा ही जळगाव येथील पी. एन. लुंकड कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी, तर नीलेश बॉक्सिंग क्लबची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक म्हणून नीलेश बाविस्कर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवडी, एकलव्य क्लबचे डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर आदींचे मार्गदर्शन लाभले. ती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील यांची कन्या आहे.

जिल्ह्याला दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई!

गुवाहाटी येथे १६ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’त जिल्ह्यातील वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी तीन पदके पटकाविली आहेत. यात स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उदय महाजन (रजतपदक), सावदा येथील सूर्या व्यायामशाळेतील प्रशांत कोळी याने ज्युनिअर गटात (कांस्यपदक), रवींद्र मराठे याने सुवर्णपदक मिळविले. किनगावच्या दिशा पाटीलने बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याला दोन सुवर्णांसह चार पदके या स्पर्धेत मिळवून दिली आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News