युथच्या आत्मविश्‍वासाचे ‘हाय हिल्स’ कल्चर!

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019
  • तरुणींपासून ते वयात आलेल्या महिलाही हाय हिल्सच्या प्रेमात पडल्याचे दिसून येतात. एक काळ असा होता, की हाय हिल्स वापरणे ही केवळ मॉडेल्स आणि उच्चभ्रू घरातील महिलांची मक्तेदारी समजली जात असे.

शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकत अधिक ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ पादत्राणांना त्यामुळेच अधिक मागणी असते. अगदी तरुणींपासून ते वयात आलेल्या महिलाही हाय हिल्सच्या प्रेमात पडल्याचे दिसून येतात. एक काळ असा होता, की हाय हिल्स वापरणे ही केवळ मॉडेल्स आणि उच्चभ्रू घरातील महिलांची मक्तेदारी समजली जात असे. मात्र, आता हे चित्र बदलू लागलं आहे.

सौंदर्य किंवा रूप उपजत किंवा नैसर्गिक असून चालत नाही. रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींतून ते खुलवावे लागते. चेहऱ्यापासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सौंदर्याचा साज चढवणे गरजेचे ठरते. त्याचा अतिरेक झाला तर सुंदर व्यक्तीला बटबटीतही बनवतो आणि प्रमाणबद्ध वापर सौंदर्य खुलवतो. या सौंदर्याला विशिष्ट लय देण्याचं काम पादत्राणे करतात. त्यामुळे सौंदर्यशास्त्रात विशेषत: स्त्रिया पादत्राणांना महत्त्व देतात. ही पादत्राणे केवळ सुंदर असून चालत नाहीत, तर चालताना, वावरताना प्रत्येक पावलागणिक आत्मविश्वास जाणवला पाहिजे. असाच आत्मविश्वास देण्याचं काम ‘हाय हिल्स’ची पादत्राणे चोख बजावतात.

‘टिक टॉक टिक टॉक’ असा आवाज करत मोठ्या ‘स्टिलेटोज’ किंवा ‘हाय हिल्स’ घालून रस्त्यावरून चालणे अनेक मुलींसाठी अभिमानाची गोष्ट ठरत असते. टोकदार स्टिलेटोज घालून फिरणे तर अधिकच प्रभावी ठरू लागले आहे. आत्मविश्वास दाखवणाऱ्या या हाय हिल्समधील चालण्यामुळे जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असाही दावा केला जातो. पार्टीला किंवा कार्यक्रमाला जाताना ‘हिल्स’ घातल्या तर एक फॅशनेबल लूक मिळतो, असा समज सध्या दृढ होत चालला आहे. त्यासाठी काही जणी स्वत:बरोबर एक फ्लॅट सॅंडलसोबत ठेवतात आणि मग इव्हेंट, पार्टीला गेलं की त्या काढून ‘हाय हिल्स’ घालतात. त्यामुळेच ‘हाय हिल्स’चे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत.

डिटॅचेबल शूज..
बऱ्याच मुलींना प्रत्येक ड्रेस, कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला लागतात. ड्रेसवर काही वेगळे, पार्टीसाठी हाय हिल्स, फिरायला जाताना आणखी वेगळा प्रकार, पण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी चपलांची खरेदी करणार तरी किती, हा प्रश्न असतो. प्रत्येक वेळी चपला बदलल्याने खर्च बजेटच्या बाहेर जाण्याची शक्‍यता असते. अशा मुलींसाठी डिटॅचेबल शूज हा पर्याय उपलब्ध आहे. डिटॅचेबल चपलांचा पर्याय अगदी उत्तम आहे.

डिटॅचेबल शूजचा म्हणजे तुम्ही या सॅंडल्सचा वरचा किंवा विशिष्ट भाग हव्या असलेल्या रंगात बदलू शकता. समजा, तुमच्याकडे हाय हिल्स आहेत त्याची डिटॅचेबल शूजमध्ये सोबत अटॅचमेंट करून त्याला हवा तो लुक देता येतो. काहींमध्ये सॅंडल्सचे रंगीबेरंगी बेल्टही उपलब्ध असतात. तुम्ही कपड्याच्या रंगात ते बेल्ट्‌स बदलू शकता. काहींसोबत वेगवेगळ्या आकारातले आणि रंगातले पॅटर्न असतात. पण यासाठी तुम्हाला जास्तीची किंमत मोजावी लागेल, हे मात्र नक्की. पण वर्षभर वेगवेगळ्या चपलांच्या प्रकारांना खर्च करण्यापेक्षा इथे एकदाच खर्च केलेला बरा.

किटन हिल्स

उंच स्त्रियांनाही हिल्स घालण्याचा मोह होतो. त्यांच्यासाठी किटन हिल्स हा उपयुक्त प्रकार आहे. कमी उंचीच्या हिल्सचा समावेश या प्रकारामध्ये होत असतो. त्यामुळे उंच महिलांना फॅशनेबल लूक राखण्यासाठी या हिल्सचा वापर करता येतो.

पंप्स
दोन ते तीन इंचाच्या या हिल्सच्या समोरचा भाग हा अत्यंत कमी असतो. त्यामुळे पायाचा खूप कमी भाग झाकला जातो. नखांचा काही भाग यामुळे झाकोळला जातो; अन्यथा संपूर्ण पायाचे दर्शन या हिल्समधून घडते.

स्टेली टोस
हिल्समधील सगळ्यात उंच प्रकारामध्ये या हाय हिल्सचा समावेश आहे. याच्या तळाला सुमारे एक ते दीड इंचाचा पृष्ठभाग असतो. त्यामुळे उंच असूनही त्यावर तोल सावरणे शक्‍य होते.

वेजेस
बोटांपासून टाचांपर्यंत भाग हा जोडलेला असतो. बोटांकडील भाग हा खाली असून टाचेकडील भाग हा उंच असतो. वेजेसचे सॅंडल आणि हिल्स अशा दोन्ही प्रकारामध्ये हे उपलब्ध आहेत.

कोन हिल्स
या हिल्सचा पुढील भाग निमुळता असतो; तर पाठीमागील हिल्स आयस्क्रीमच्या कोनाप्रमाणे असल्याने त्याला ‘कोन हिल्स’ म्हटले जाते.

कन्व्हर्टेबल हिल्स..
उंच टाचा अगदी सहज कमी-जास्त करू शकता. अशा प्रकारच्या सॅंडल्सना तुम्ही कॅट हिल किंवा पॉईंटेड हिल्स करू शकता. सॅण्डल्ससाठी जरा जास्त खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही कन्व्हर्टेबल हिल्सचा विचार करू शकता. जुन्या हिल्स बाजूला काढून ठेवून तुम्हाला हव्या त्या सोईचे सॅण्डल्सचे हिल्स कमी-जास्त करू शकता. शिवाय त्याचा तुम्ही फ्लॅट सॅंडल्स म्हणून वापर करू शकता. थोडक्‍यात तुम्ही तुमच्या सोईनुसार या हिल्स बसवू शकता.

जेल कुशन..
हाय हिल्स वापरणाऱ्यांसाठी दिलासा देणारी वस्तू म्हणजे ‘जेल कुशन’ किंवा ‘शू पॅडिंग’. हाय हिल्स घातल्यानं शरीराचा भार कधीकधी टाचांवर आणि पुढच्या भागावर अधिक येतो. जास्त वेळ जोर दिल्याने पायांच्या तळव्यांची जळजळ होणे, ते दुखणे, सूज पकडणे हे त्रास सुरू होतात. या हिल्सच्या तळव्याचा भागही कडक असतो, त्यातून त्रास अधिक होतो. या सगळ्या त्रासापासून जेल कुशन मुक्त करतात. पायाचे विशिष्ट प्रेशर पॉईंट असतात. त्या प्रेशर पॉईंटच्या ठिकाणी हे जेल कुशन बसवायचे असतात.

टाच, तळवा, पायांची बोटे अशा तीन महत्त्वाच्या प्रेशर पॉईंटवरच्या ठिकाणी लावायला वेगवेगळ्या आकारात या कुशन येतात. या कशा वापरायच्या याचे मार्गदर्शन त्यात केलेले असते. या कुशन पायांचे संरक्षण करतात. या वापरल्यामुळे कोणत्याही एका पॉईंटवर जास्त दाब येत नाही. त्याचप्रमाणे या नरम आणि मऊ असल्याने तळव्यांची जळजळ, सूजही येत नाही. एक कुशन तुम्ही अनेक वेळा वापरू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News