'खेलो इंडिया' स्पर्धेत मुंबईच्या जुळ्या जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

मुंबई विद्यापीठाने ३ सुवर्णपदकांसह दहा पदके जिंकत पदक क्रमवारीत सातवा क्रमांक मिळवला आहे. मुंबईची दहापैकी नऊ पदके जलतरणातील आहेत. मुंबईने जलतरणात तीन सुवर्णपदकांसह १ रौप्य आणि ५ ब्राँझ जिंकली आहेत. मुंबईने मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. ते निर्णायक लढतीत मद्रास विद्यापीठाविरुद्ध पराजित झाले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ सात सुवर्णपदकांसह १४ पदके जिंकली आहेत.

मुंबई : ज्योती आणि आरती या जुळ्या पाटील भगिनींनी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या दोन दिवसांच्या पदकात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्यात कायम स्पर्धा असते, त्यामुळेच आपली कामगिरी उचावते, असे त्यांनी सांगितले.

मुलींनी ऑलिंपिक जलतरणात पदक जिंकावे, हे स्वप्न बघत वडील बाजीराव पाटील यांनी त्यांना अगदी लहान वयात जलतरणाचे धडे दिले. त्यांनी चौथ्या वर्षीच गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग हे अंतर विक्रमी वेळेत पार केले. हाच धडाका कायम राखत आता त्यांनी जलतरणात पहिल्या दिवशी एकंदर चार पदके जिंकली आहेत. अधिकाधिक पदके जिंकण्याचा त्यांचा इरादाही आहे.

स्पर्धेपूर्वी येणारे दडपण दूर करण्याचा आमचा एक उपाय आहे. तो कोणाला सांगणार तर नाही, असे ज्योती सांगते आणि पुढे म्हणते, तमिळ चित्रपटांचा आनंद घेऊन सगळे टेन्शन दूर करतो. अर्थात स्पर्धा असली की तेच कुटुंबीयांचे आउटिंगही होते, असे आरतीने लगेच सांगितले.खेलो इंडिया पुणे स्पर्धेत ज्योतीने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुवर्ण; तर १०० मीटर शर्यतीत रौप्य जिंकले होते. ती स्पर्धा हुकल्याची अजूनही आरतीला हुरहूर आहे; मात्र त्यामुळेच माझी या स्पर्धेत कामगिरी उंचावली, असे आरतीने सांगितले.

या दोघींनी गेल्या काही वर्षांत शंभरहून अधिक पदके जिंकली आहेत. आम्हाला पदके किती जिंकली, शर्यतीत कितवा क्रमांक आला, यापेक्षा कामगिरी कशी झाली, यास जास्त महत्त्व द्यायचे, हे वडिलांनी शिकवले आहे. सातत्याने सर्वोत्तम कामगिरी होत राहिली की यश येत राहते, हे आरती सांगत असताना ज्योती तिच्याशी सहमती दाखवते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News