तुमचे ही बॉस असेच आहेत म्हणे...

राजेश अग्निहोत्री,नाशिक
Wednesday, 27 February 2019

बॉस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते स्वभावाने कडक असलेल्या व्यक्तीची प्रतिमा.! प्रसंगी कठोर, आपलंच म्हणणं खरं करणारा वगैरे वगैरे. असो. पण मला मात्र बॉसचा एक आगळाच आलेला अनुभव या लेखाद्वारे आज शेअर करतोय. 

बॉस म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते स्वभावाने कडक असलेल्या व्यक्तीची प्रतिमा.! प्रसंगी कठोर, आपलंच म्हणणं खरं करणारा वगैरे वगैरे. असो. पण मला मात्र बॉसचा एक आगळाच आलेला अनुभव या लेखाद्वारे आज शेअर करतोय. 

बरोबर दहा वर्षापुर्वीचा किस्सा आहे. मी एका कंपनीत ब्राँच ट्रेनिंग मॅनेजर या पदावर कार्यरत होतो. स्टाफचे आणि आमच्या वितरकांचे ट्रेनिंग घेणे हे माझे दररोजचे काम असायचे. मी परमनंट कर्मचारी असल्यामुळे मला पगाराव्यतिरिक्त अन्य सुविधाही होत्या. जसे स्वतःचा जीवन विमा आणि पत्नी व मुलांसाठी आरोग्यविमा. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा आमच्या कंपनीने आगामी आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या पालकांचा देखील आरोग्यविमा उतरविण्याचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढे ठेवला होता. तोदेखील अगदी वाजवी दरात. याबाबतचे ई-मेल्स सर्व कर्मचाऱ्यांना आले होते आणि आणि ही सुविधा हवी आहे की नाही हे संबंधित ब्रांच मॅनेजरला आठवडाभरात कळवायचे होते. असो.

एके दिवशी सकाळी मी आमच्या स्टाफचे ट्रेनिंग घेत होतो आणि मला निरोप आला की ब्राँच मॅनेजर साहेबांनी त्वरीत भेटायला बोलावलं आहे. मी लगेच सरांच्या केबिनमध्ये दाखल झालो आणि आश्चर्यचकीत झालो. माझ्यापेक्षा पदाने आणि वयानेही सिनियर असलेल्या सरांनी मला चक्कं विनंती केली होती की त्यांच्या आईचे कलकत्याला मोठे ऑपरेशन करावयाचे आहे. ताबडतोब पंचवीस हजार रुपयांची सोय होईल का म्हणुन ते विचारत होते. थोडे पैसे कमी पडताहेत असंही त्यांनी सांगितलं. हा प्रश्‍न ऐकुन मी प्रथम ते माझी थट्टाच करत आहेत असे समजलो. मी नाराजीच्या सुरात त्यांना सांगितले की माझ्याजवळ तर इतके पैसे आत्ता नाहीत. पण मी कुठून व्यवस्था झाली तर नक्की सांगतो; आणि मी अनेकांशी संपर्क करुन पैशाबाबत विचारणा सुरुही केली. परंतु दिवसभर कुठुनच काही व्यवस्था होऊ नाही शकली. मी खुप खजील झालो.

बिचारे सर मला दर एक तासाने 'झाली का व्यवस्था?' हे विचारणारे एसएमएस करत होते. संध्याकाळी शेवटचीही आशा जेव्हा मावळली तेव्हा मी त्यांच्यासमोर खाली मान घालून उभा राहिलो. त्यांच्या लक्षात आले की माझ्याकडून पैशाची काहीही सोय होऊ शकलेली नाही. मला त्यांच्या डोळ्यात बघून बोलण्याचे धाडस होत नव्हते परंतु ते माझ्याकडे रोखुन बघत असल्याचे जाणवत होते. बॉसने कधीनवत थोडे सहकार्य मागितले होते परंतु तिथे मी कमी पडलो या गोष्टीचा मला खेद होत होता. असो. बॉसने मला समोर बसवले. पाणी प्यायला दिले आणि स्पष्टपणे सांगितले की राजेश, मला एकाही रुपयाची गरज नाही. 

हे ऐकुन मी मात्र चाट झालो. मग कशाकरता दिवसभर याबाबत पाठपुरावा चालु होता? असा विचार डोक्‍यात आला. मग मला त्यांनी चांगलेच खडसावले. केवळ साडेतीन हजार रुपयांत उपलब्ध असणाऱ्या पालकांच्या आरोग्यविम्यासाठी मी बॉसला ईमेल वरुन नकार कळवला होता. कारण काय? तर माझ्या आईवडीलांनी जरी साठी ओलांडली असली तरी ते दोघेही एकदम तंदुरुस्त आहेत. साडेतीन हजार रुपये कशाकरता वाया घालवायचे? बॉसने याबद्दल माझी चांगलीच कानउघडणी केली आणि समजावले की तू या संस्थेचा परमनंट कर्मचारी आहेस म्हणुन तुला इतक्‍या कमी दरात पालकांसाठी पाच लाखांचा आरोग्यविमा मिळतोय; आणि वेळ काही सांगून येत असते का? सांग बरं तू दिवसभरात पंचवीस हजार रुपये तरी जमा करू शकलास का? उद्या काही झाले तर काय करणार आहेस? 

मित्रहो, हे ऐकत असतांना माझी बोलतीच बंद झाली होती. मला ही बाब कँज्युअली घेण्याची चुक चांगलीच उमजली होती. मी बॉसचे मनापासुन आभार मानले..!
आजही या प्रसंगाची आठवण झाली की माझे मलाच हसू येते. परंतु अनिश्‍चितता हिच जीवनातील एक निश्‍चित गोष्ट आहे हे मनावर कोरलं जाऊन त्यासाठी आवश्‍यक ती तरतुद केलीच पाहिजे हे शहाणपण मात्र मला या घटनेमुळे आलं.
थँक यू व्हेरी मच बॉस....! 
 
post.rajeshagni@gmail.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News