युवकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

तरुणाच्या आकांक्षा मोठ्या आहेत; परंतु वास्तव जीवनात प्रवेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यासाठी त्यांनी ध्येय, धीर, संयम ठेवणे आवश्‍यक आहे.

सावंतवाडी : राजकारण्यांमुळेच जिल्ह्यात मंजूर झालेले कित्येक प्रकल्प माघारी गेले. राजकारणी एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न असतात व नुकसान आपल्या युवकांचे होते. या वृत्तीमुळे हे सर्व प्रकल्प स्थगित करण्यात आले. परिणामी, याचा फटका जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. 

माझा हा पहिलाच रोजगार मेळावा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सर्वांचीच मदत घेऊन जिल्ह्यात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या व मोठमोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. युवकांनीही नोकरीसह व्यवसायाचीही संधी सोडू नये, असे मत आज येथे नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.

राज्य शासन दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान, सावंतवाडी नगरपरिषद, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने येथील बॅ. नाथ पै सभागृहात स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींच्या रोजगार मेळावाचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्‌घाटन नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती मानसी धुरी, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेविका भारती मोरे, नगरसेवक आनंद नेवगी, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सभापती पंकज पेडणेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, नगरसेवक राजू बेग, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी नामदेव सावंत, व्यवस्थापक एकनाथ पाटील, जिल्हा उद्योग केंद्र के. जी. तांदळे, विविध महंमडळांचे अधिकारी, नंदकिशोर साळसकर, शंकर चाटे, सिद्धेश पवार आदी उपस्थित होते. 
उपनगराध्यक्ष कोरगावकर म्हणाल्या, पूर्वी रोजगाराची नोंदणी करायची व शेकडो मैल रोजगारासाठी जावे लागत होते; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता आपल्या दारात कंपन्या आलेल्या आहेत, तुम्ही पॅकेज बघू नका, हे संघर्षचे व काहीतरी शिकण्याचे दिवस आहेत. पालकांच्या अपेक्षा मुलांकडून वाढल्या आहेत. ही जबाबदारी मुलांनी ठराविक वयात  स्वीकारली पाहिजे. मिळालेल्या नोकरीत पगाराचे गणित न घालता त्यातून शिकायला कस मिळेल हे बघावे, असे सांगितले. 

मुख्याधिकारी संतोष जिरगे म्हणाले, ‘‘युवकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. रोजरासाठी प्रसंगी आपलं शहर, जिल्हा सोडून बाहेर जाण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. तरुणाच्या आकांक्षा मोठ्या आहेत; परंतु वास्तव जीवनात प्रवेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यासाठी त्यांनी ध्येय, धीर, संयम ठेवणे आवश्‍यक आहे. आताचा जमाना फास्ट फूडचा आहे. त्यामध्ये रोजगार हे एक साधन आहे; परिणामी कौशल्य वाढवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडले पाहिजे.’’

नोकऱ्या नाहीत म्हणून निराशा नको
परब म्हणाले, ‘‘जिल्ह्यात प्रकल्पांच्या माध्यमातून नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या होत्या. याचा परिणाम जिल्ह्यातील बेरोजगारांना सोसावा लागत आहे. या ठिकाणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, ती थांबवण्यासाठी पुढील काळात सर्वांच्या मदतीने स्थानिक पातळीवर मोठमोठ्या कंपन्या व चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. जिल्ह्यात नोकऱ्या नाहीत म्हणून निराश होऊ नये. पुढच्या वेळी नक्कीच रोजगाराच्या संधी उपलब्ध करू देऊ.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News