'या' शाखेच्या प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

यंदा वाणिज्य शाखेचा निकाल वधारला असल्याने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जोरदार चुरस पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई:  बारावी निकालानंतर आता मिशन ऍडमिशनसाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होणार आहे. यंदा वाणिज्य शाखेचा निकाल वधारला असल्याने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जोरदार चुरस पाहण्यास मिळणार आहे. काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याने यंदाही या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या निकालात यंदा वाढ झाली आहे. तसेच, अनेक नामांकित महाविद्यालयांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. यातच 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढल्याने वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाकडे वाढला आहे. त्यामुळे सेल्फ फायनान्स व कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यंदा मुंबई मंडळाचा निकाल 89.35 टक्के लागला असून यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल 88.80 टक्के इतका लागला आहे.

यामुळे प्रवेशासाठी चढाओढ
मुंबई विभागीय मंडळातून वाणिज्य शाखेतून 1 लाख 76 हजार 414 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 27 हजार 378 विद्यार्थी 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत; तर 52 हजार 518 विद्यार्थ्यांनी 60 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांचा अधिकाधिक कल सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम निवडण्याकडे असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे. 60 टक्‍क्‍यांहून कमी गुण असलेले विद्यार्थी हे वाणिज्य शाखेतील पारंपरिक अभ्यासक्रम निवडतात. मात्र प्रवेशाची हमी नसल्याने अनेक विद्यार्थी दोन्ही पर्याय निवडतात. त्यामुळेही यंदा प्रवेशात चुरस राहणार आहे.

अधिक गुण मिळालेले विद्यार्थी नामांकित महाविद्यालयातील सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाना प्रवेश घेतात. यंदा निकालही अधिक लागल्याने प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. काही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्यास ते दूर व मुक्त अध्ययन संस्थेत प्रवेश घेतात.
- गिरीश साळवे, उपप्राचार्य, चेतना महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News