योग करण्यापूर्वी या गोष्टींची खबरदारी घ्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 26 August 2019

आजकालच्या आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला फिट ठेवण्याचा पर्याय निवडत असतो. त्या दृष्टीने आजकाल योग करण्याचा पर्याय खूपच लोकप्रिय होत आहे.

आजकालच्या आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला फिट ठेवण्याचा पर्याय निवडत असतो. त्या दृष्टीने आजकाल योग करण्याचा पर्याय खूपच लोकप्रिय होत आहे. ह्याचे मुख्य कारण असे, की योगासने हा व्यायाम कोणालाही, कोणत्याही वयामध्ये करता येण्यासारखा आहे. पण योग करण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. जर योग करीत असताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या नाहीत, तर त्यातून शरीराला अपाय होण्याची शक्यता उद्भवू शकते.

वार्मअप करणे
व्यायामापूर्वी ज्या प्रकारे वार्मअप करणे आवश्यक असतं त्याच प्रकारे योगामध्ये देखील वार्मअप आवश्यक आहे. योगासने सुरु करण्यापूर्वी हलका व्यायाम करावा, जेणेकरून शरीरातील स्नायू जरा लवचिक होतील. आपण हलका व्यायाम किंवा सूक्ष्म आसन देखील करू शकता. योगासने करण्यापूर्वी आपल्यासाठी कुठली आसने योग्य ठरतील ह्याचा सल्ला योग प्रशिक्षकांकडून घेणे आवश्यक आहे. 

जेवण झाल्यावर योग योग्य नाही
सकाळ असो वा संध्याकाळ जेवण झाल्यावर योग करणे योग्य नाही. संध्याकाळी योग करत असाल तर आहार आणि योगात तीन तासाचा अंतर ठेवणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी योगासने करून त्यानंतर अर्ध्या तासाने भोजन करणे हा पर्यायही अवलंबिला जाऊ शकतो.

थंडगार पाणी पिणे टाळा
योगासने करताना जर सतत तहान लागत असेल, तर थंडगार, फ्रीजमधील पाणी पिऊ नये. सामान्य तापमान असलेले पाणी घोट घोट पिणे चांगले. तसेच एका वेळी खूप पाणी पिऊ नये. थंडगार पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. योग दरम्यान शरीर उष्ण होत अशात गार पाणी पिण्याने सर्दी, कफ आणि ऍलर्जी सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून योग केल्यानंतर सामान्य पाणी पिणे योग्य ठरेल.

थट्टा नको
योगासन करताना मोबाइल ऑफ करावा तसेच लक्ष केवळ योगावर असावे कारण चुकीची स्टेप धोकादायक ठरू शकते. योगासने करताना इतरांशी गप्पा मारणे, फोन वर बोलणे, फोनवरील मेसेजेस पहाणे आवर्जून टाळायला हवे.

आजारात योग योग्य नाही
आपण गंभीर आजारात असाल, किंवा वेदना, ताप असल्यास योग करणे टाळावे.

मूत्र विसर्जन टाळा
योग दरम्यान मूत्र विसर्जन टाळावे कारण यात शरीराचं पाणी घामाद्वारे बाहेर पडणे अधिक गरजेचं आहे.

लगेच अंघोळ घोळ नको
योगासनानंतर लगेच अंघोळ करणे टाळावे. कारण व्यायामानंतर शरीर उष्ण झाल्यामुळे लगेच अंघोळीने विपरित परिणाम होऊ शकतात. योग केल्याच्या एका तासाने अंघोळ करणे योग्य ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News