स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा योगा

डॉ. अंजली जोशी 
Wednesday, 24 April 2019

अलीकडील आकडेवारीप्रमाणे भारतात तीस करोड व्यक्ती स्मार्टफोन वापरतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार  भारतीय व्यक्ती साधारणपणे स्मार्टफोनवर दररोज तीन तास खर्च करतात. महाविद्यालयीन विद्यार्थी याहून अधिक काळ दररोज फोनवर घालवतात. अधिक प्रमाणात स्मार्टफोनवर  अवलंबून राहिल्यामुळे चिंता, तणाव, नैराश्‍य, आक्रमकता, अनिद्रा, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार होऊ शकतात.
 

अलीकडील आकडेवारीप्रमाणे भारतात तीस करोड व्यक्ती स्मार्टफोन वापरतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार  भारतीय व्यक्ती साधारणपणे स्मार्टफोनवर दररोज तीन तास खर्च करतात. महाविद्यालयीन विद्यार्थी याहून अधिक काळ दररोज फोनवर घालवतात. अधिक प्रमाणात स्मार्टफोनवर  अवलंबून राहिल्यामुळे चिंता, तणाव, नैराश्‍य, आक्रमकता, अनिद्रा, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार होऊ शकतात.
 
बसताना किंवा उभं राहताना आपले कान खांद्यांच्या वर एका सरळ रेषेत असायला हवेत. फोनच्या अधिक वापरामुळे डोके खांद्यांच्या थोडे समोर राहते.  याशिवाय सतत मान खाली घालून फोनकडे बघितल्यामुळे मानेच्या मणक्‍यांवर अतिरिक्त ताण पडतो व त्यामुळे मान दुखू लागते. याला ‘टेक्‍स्ट नेक’ असे नाव दिलेले आहे. हे टाळण्यासाठी फोन डोळ्याच्या पातळीवर ठेवावा, त्यामुळे मानेवर जास्त ताण येत नाही. वारंवार ब्रेक घ्यावेत आणि काही सौम्य स्वरूपाचे स्ट्रेचिंग करावे. 

उपयुक्त योगाभ्यास 
स्मार्टफोनचे दुष्परिणाम जरी आधुनिक जीवनशैलीमुळे असले तरी प्राचीन योगशास्त्र त्यावर प्रभावी उपाययोजना ठरते. योगासनांच्या सरावाने आपण आपले डोके आणि पाठीचा कणा परत सरळ रेषेत आणू शकतो, तसेच पाठीच्या कण्याची लवचिकता आणि नैसर्गिक वक्रता टिकवून ठेवू शकतो.
   
दिवसभरात सर्वांत जास्त ताण मान आणि खांदे या भागात साठवला जातो. हळुवारपणे केलेले ग्रीवा संचालन बऱ्याच प्रमाणात मानेचे अवघडले स्नायू मोकळे करतात. खांद्यांची हालचाल, स्कंध संचालनही हा ताण कमी करतात. 

टचस्क्रीनच्या अधिक वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेन्सिल पकडण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, असे आढळून आले आहे. मनगट व हातांच्या बोटांचे सूक्ष्म व्यायाम अधिक वेळ फोनवर टाईप केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवू शकतात. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा हे सोपे व्यायाम प्रकार करण्यास हरकत नाही.

योगासनांमध्ये मत्स्यासन, मार्जारासन, उत्तान मंडुकासन, अधोमुख श्‍वानासन, मर्कटासन, भुजंगासन ही आसने मान, खांदे व पाठीच्या स्नायूंना बळकट करतात आणि पाठीच्या कण्याची रचना सुधारतात. फोन अधिक वेळ वापरल्यास डोळ्यांवरही ताण पडतो. प्रत्येक वीस मिनिटांनी डोळ्यांना वीस सेकंद विश्रांती द्यावी. पापण्यांची उघडझाप, डोळ्यांचे व्यायाम तसेच दोन्ही हातांचे तळवे घासून हलकेच डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अपरिहार्य असला तरी स्मार्टफोनचा सुयोग्य वापर निश्‍चितपणे आपल्या आयुष्यास अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण करेल, यात शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News