तरूणाईचे व्यक्‍तिमत्व खुलविणाऱ्या "यिन समर यूथ समीट"ला दिमाखात सुरवात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • ऊर्जेने पूर्ण असलेल्या तरूणाईचे आत्मविश्वास वाढविणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
  • उद्योजक विकासासाठीचा मुलमंत्र देणाऱ्या टिप्स्‌
  • एमएच 15 द बॅण्ड यांचे धमाकेदार सादरीकरण

नाशिक: ऊर्जेने पूर्ण असलेल्या तरूणाईचे आत्मविश्वास वाढविणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. उद्योजक विकासासाठीचा मुलमंत्र देणाऱ्या टिप्स्‌ यांसह एमएच 15 द बॅण्ड यांचे धमाकेदार सादरीकरण करुन तरूणाईचे वैक्‍तिमत्व खुलविणाऱ्या "यिन समर यूथ समीट-2019'ला गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात सुरवात झाली. 

उद्‌घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांच्यासह "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, कम्युनिटी नेटवर्कचे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी उपस्थित होते. काही तरी वेगळे करण्याची उमेद घेऊन आलेल्या तरूणाईची सकाळपासून सभागृह परीसरात लगबग बघायला मिळाली. प्रारंभी एमएच 15 द बॅण्डच्या कलावंतांनी प्रसिद्ध हिंदी गाण्यांचे सादरीकरण करतांना युवक-युवतींचे निखळ मनोरंजन केले. 

उद्‌घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने म्हणाले, की रोजगारनिर्मितीविरहीत विकासामुळे बेरोजगारसह अन्य विविध संकटाचा सामना तरूणाईला करावा लागतो आहे. परंतु संकटाचे रूपांतर संधीत करून, या संधीवर स्वार होऊन यश गाठायला हवे. स्वत:पासून बदलाला सुरवात केल्यास आपोआप देशाची परीस्थिती बदलेल. असा बदल घडविण्यासाठी राज्यातील अडीच हजरहून अधिक महाविद्यालयात पोहचलेले "यिन' व्यासपीठ महत्वाची भुमिका बजावत आहे.

सुनील पाटील म्हणाले, की उन्हाळी सुट्यांमध्ये अन्य विद्यार्थी विश्रांती घेत असतांना "यिन समर युथ समिट'मध्ये सहभागी युवक मात्र कल्पकतेच्या दृष्टीने वाटचाल करता आहेत. संघर्षातून मार्ग काढून जीवनात यशस्वीतेकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. चीफ मॅनेजर तेजस गुजराथी यांनी आभार मानले. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजित आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी (नाशिक) प्रस्तुत हे समीट बारामती ऍग्रो लिमिटेड यांच्या सहयोगाने व मराठा विद्याप्रसारक समाज संस्था यांच्या विशेष सहकार्याने होत आहे.

जेएपीएम पॉवर्डबाय असणाऱ्या या समीटचे असोसिएट्‌स स्पॉन्सर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ (पुणे), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स (पुणे), सृजन कॉलेज ऑफ डिझाइन (पुणे) आणि रांका ज्वेलर्स प्रा. लि. (पुणे) आहेत. नित्यानंद अनुभूती फाउंडेशन, पिनॅकल एज्युकेशन यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. 

न्यूनगंड नको, जिद्दीतून मिळवा यश : मंडलेचा 
मराठी माध्यमातून शिकलेल्या, ग्रामीण भागातील युवकांनी मनात न्यूनगंड बाळगायला नको. जिद्द व चिकाटीच्या जोरावर जीवनात यश मिळवा, असे आवाहन संतोष मंडलेचा यांनी केले. सुचलेल्या संकल्पनेना पुढे नेण्यासाठी मित्र, मार्गदर्शनकांसोबत त्यासंदर्भात चर्चा केली पाहिजे. मनात भिती न बाळगता आत्मविश्वासाने परीस्थितीला सामोरे जाण्याची खुनगाठ बांधल्यास आयुष्यात कुठलेही धेय्य प्राप्त करू शकतो, असे श्री.मंडलेचा म्हणाले. 

 प्रशासकीय क्षेत्रातून समाज सेवेची संधी :पाटील 
सध्याची तरूणाई संवेदनशील असून समाज सेवेची प्रचंड आवड युवकांमध्ये दिसते. प्रशासकीय सेवेतून चांगले करीअर घडवितांना समाज सेवेची संधी युवकांना उपलब्ध असल्याने अधिकाधिक तरूणाईने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांनी केले. ते म्हणाले, की बोर्ड, विद्यापीठाच्या परीक्षेपेक्षा स्पर्धा परीक्षांचे स्वरूप वेगळे असते. हे स्वरूप समजून घेत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. बॅंकींगसह अन्य विविध क्षेत्रात नोकरीच्या संधींची माहिती त्यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News