यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिन व्हर्च्युअल माध्यमातून साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी मोठ्या हर्ष उल्हासात साजरा केला जातो.
  • देशपातळीवर, राज्यपातळीवर, विद्यापीठ तसेच शाळांतर्गत विविध क्रीडा सामान्यांचे आयोजन या दिवशी केले जाते. हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळाचे जादूगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मेजर द्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.

मुंबई :- भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी मोठ्या हर्ष उल्हासात साजरा केला जातो. देशपातळीवर, राज्यपातळीवर, विद्यापीठ तसेच शाळांतर्गत विविध क्रीडा सामान्यांचे आयोजन या दिवशी केले जाते. हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळाचे जादूगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मेजर द्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनाचा फटका हा इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. बॅडमिंटन, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस यासारखे काही खेळ वगळता इतर खेळांमध्ये खेळाडूंचा शारीरिक संपर्क जास्त असल्याने  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक खेळाडूंना मैदानात सरावासाठी देखील येता आलेले नाही. आता काही प्रमाणात लॉकडाऊनचे निर्बंध हे शिथिल केले असले तरी देखील खेळण्यासाठी मैदाने मात्र अजूनही खुली करण्यात आलेली नाहीत. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे अवचीत्य साधून दरवर्षी भारत सरकारकडून क्रीडा विश्वातील अनेक नामांकित पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते. परंतु देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाचा पुरस्कार सोहोळा देखील व्हर्च्युअल माध्यमातून साजरा केला गेला. 

मुंबई येथे देखील २०२०चा राष्ट्रीय क्रीडा दिन ऑनलाईन पद्धतीनेच साजरा केला जात आहे. शाळा महाविद्यालये कोरोना काळात बंद असली तरी त्यांचे शिक्षण हे ऑनलाईन माध्यमातून सुरु आहे. तेव्हा शाळा महाविद्यालयांना ऑनलाईन माध्यमातून खेळात येतील अश्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थी देखील हे ऑनलाईन पद्धतीने खेळणारे खेळ काही प्रमाणात एन्जॉय करत असले तरी देखील मैदानावर जाऊन खेळता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीही आहे. मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्याच्या परिस्तिथीमध्ये गर्दी टाळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे यंदाचा क्रीडा दिन हा मोजक्या अधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्तिथीत साजरा केला जाईल. तसेच मुंबई परिसरातील सर्व शाळांना ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात उपस्तिथ राहावयाचे निर्देश देण्यात आले आहे. 

केंद्र सरकारतर्फे क्रीडा दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या फिट इंडिया फ्रिडम रन या व्हर्च्युअल रनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणाऱ्या या क्रीडा उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या फिट इंडिया फ्रिडम रन  मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे फरताडे यांनी सांगितले. फिट इंडिया फ्रिडम रन मध्ये सहभागी होण्याकरीता धावपटूंना आपल्या पसंतीच्या ठिकाणी दिलेले अंतर धावत अथवा चालत पूर्ण करायचे आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अधिक माहिती करीता fitiindia.gov.in  या संकेत स्थळाला भेट द्यायची आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News