देशातील 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी दिले वर्क फ्रॉम होम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केले होते.
  • परंतु आरपीजी कंपनीने कामकाजाच्या धोरणात मोठा बदल केला तो म्हणजे कर्मचाऱ्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम दिले आहे.

मुंबई :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केले होते. परंतु आरपीजी कंपनीने कामकाजाच्या धोरणात मोठा बदल केला तो म्हणजे कर्मचाऱ्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम दिले आहे. हा बदल करणारी ही देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे. ४ बिलियन डॉलर मूल्य असलेल्या या ग्रुपची टायर, आयटी, आरोग्य, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि प्लांटेशनमध्येही उपस्थिती आहे. सेल्स विभागाचे सर्व कर्मचारी कायमस्वरुपी घरातून काम करतील, असे धोरण आरपीजीने तयार केले आहे. ऑफिसला येणारे कर्मचारीही ५० टक्के काम घरातून करतील. तर विशेष परिस्थितीमध्ये हे काम ७५ टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ शकते.

ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला येणं आवश्यक आहे, त्यांना दोन आठवडे घरातून काम करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. तर विशेष परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन आठवडेही ऑफिसला न येता काम करता येईल. सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण कर्मचारी वर्ग घरातून काम करत आहे. त्यामुळे या समुहानेही आपली कार्यालये बंद ठेवली आहेत.

नवीन आरपीजी रिमोट वर्किंग पॉलिसी १ सप्टेंबरपासून लागू होत आहे. आरपीजीच्या जगभरातील कंपन्यांसाठी हे धोरण लागू आहे. कारखाने आणि प्लांटेशनमध्ये जे कर्मचारी मशिनवर काम करत नाहीत, त्यांचाही या धोरणात समावेश करण्यात आला आहे.

आरपीजी इंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी एका वृत्तपत्रात सांगितले की, 'पारंपरिक कामकाज पद्धतीला फाटा देत वर्कस्पेस आणि उत्पादकक्षमता केंद्रीत हे नवं धोरण आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मशिनसंबंधी काम नाही आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये ग्राहकाशी संवाद साधावा लागत नाही, ते करोनानंतरही त्यांना हवे तिथून काम करू शकतात.'

आरपीजीने सीएट, आरपीजी लाइफ सायन्स, केईसी इंटरनॅशनल, हॅरिसन्स मल्याळम, आरपीजी इंटरप्रायजेसच्या जगभरातील ३० हजार कर्मचाऱ्यांना संदेश दिला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढवणारे हे धोरण स्वीकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून काम करण्याची परवानगी दिल्यामुळे कर्मचाऱ्याची गुणवत्ता आणि व्यवसायाची उत्पादनक्षमता वाढेल, असे या नोटमध्ये म्हटले आहे.

 

गेल्या काही महिन्यात उत्पादनक्षमता वाढली असल्याचे दिसून आले आहे. कंपनीने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर हे धोरण राबवणे शक्य होत असल्याचे समुहाचे एचआर प्रमुख व्यंकटेश यांनी सांगितले. हे धोरण आखताना कंपनीने युवा कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती, ज्या समितीकडून शिफारशी करण्यात आल्या. यानंतर एका उपसमितीकडून यावर आधारित धोरण आखण्यात आले.

 

परंतु, या कंपनीच्या धोरणामुळे इतर कंपन्याही वर्क फ्रॉम होम धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. भारतात कॅविनकेअरने आपली कॉर्पोरेट कार्यालये बंद करत जूनमध्ये वर्क फ्रॉम होमचा स्वीकार करावा. जगभरात ट्विटरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना हव्या तेवढ्या कालावधीपर्यंत वर्क फ्रॉम होमची निवड करण्याचा पर्याय दिला आहे. गुगल आणि फेसबुकनेही वर्क फ्रॉम होम वाढवले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News