जगात कोरोनाची पहिली लस यशस्वी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी जगातील सर्व देशांत अथक प्रयत्न सुरू असतानाच रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लसीच्या क्‍लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या असून, कोरोनावरील ही जगातील पहिलीच लस आहे.

मॉस्को :- कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी जगातील सर्व देशांत अथक प्रयत्न सुरू असतानाच रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लसीच्या क्‍लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या असून, कोरोनावरील ही जगातील पहिलीच लस आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या सहा महिन्यांत जगभरात एक कोटी २० लाखांहून अधिक लोकांना संक्रमित केले असून, पाच लाखांपेक्षा अधिक जणांचा बळी गेल्याने या नव्या संशोधनामुळे जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलेल्या माहितीनुसार चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी (ता.१५) डिस्चार्ज देण्यात येणार असून, दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजीचे संचालक वदिम तारासोव्ह यांनी सांगितले. रशियाच्या गेमली इन्स्टिट्यूट ऑफ ऍपिडेमियोलॉजी ऍण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्‍लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरू केल्याचे तारासोव्ह यांनी सांगितले.

सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोना विषाणूविरोधातील तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत, असे तारासोव्ह यांनी सांगितले. सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स या देशांमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. चीनमध्ये सिनोवॅक बायोटेक या लसीची सर्वांत जास्त प्रगती असून, भारतानेही ही लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

लस पूर्णपणे सुरक्षित

विद्यापीठातील ट्रॉपिकल ऍण्ड व्हेक्‍टर बॉर्न डिसीज इन्स्टिट्यूटचे संचालक अलेक्‍झांडर लुकाशेव यांनी सांगितले, की मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे की नाही हे तपासण्याचा या चाचणीमागील हेतू होता. हा हेतू साध्य झाला आहे. कोरोनाविरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या विषाणूची जटिलता लक्षात घेता लसीचे उत्पादन करण्यासाठी धोरणात्मक पावले टाकण्यात येत असल्याचे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News