#worldcup2019 - यामुळे जेपी ड्यूमिनी ठरला सगळ्यात मोठा कलंक...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

चोकर्सचा कलंक पुसून टाकण्याच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ दोन झटके बसले.

नॉटींगहॅम : चोकर्सचा कलंक पुसून टाकण्याच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ दोन झटके बसले. दोन्ही वेळा पाठलाग करताना त्यांना शरणागती पत्करावी लागली. यात एका फलंदाजावर सर्वाधिक टीका होत आहे. तो म्हणजे जेपी ड्यूमिनी.

हा डावखुरा फलंदाज अनुभवी आहे. त्याची कारकिर्द दीड दशकाची आहे. मुख्य म्हणजे या वर्ल्ड कपनंतर तो गुडबाय करणार आहे. त्यामुळे त्याने प्रेरीत होऊन खेळणे अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात तो अपेक्षाभंग करतो आहे.

दोन्ही सामन्यांत बेजबाबदार शॉट मारून आऊट झालेल्या ड्युमिनीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर हाईटच केली. आधी त्याने सुविचार सांगितला.

तो असा : खास करून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भागिदाऱ्या नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतात.

मग त्याने पराभवाची कारणमीमांसा केली : पुढाकार घेऊन शतक ठोकणारे खेळाडू तुम्हाला लागतात. आमचे पहिल्या सहा क्रमांकाचे फलंदाज हे करू शकले नाहीत. प्रत्येक जण 30-40 धावा करून परतला, जे पुरसे ठरणार नव्हते.

मग त्याने सहकाऱ्यांना खेळ उंचावण्याचे आणि अपयशी प्रारंभातून सावरण्याचे आवाहन केले. ड्युमिनी म्हणतो की, प्रामाणिकपणा हा आमचा नेहमीच महत्त्वाचा गुण राहिला आहे. आम्ही कोणत्या बाबतीत प्रगती करू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आम्हाला 21 धावा कमी पडल्या. फलंदाजी की गोलंदाजी यापैकी कशात कमी पडलो याची छाननी आम्ही करू शकतो. आम्हाला केवळ एक चांगला विजय मिळण्याचा अवकाश आहे, मग आम्ही फॉर्मात येऊ.

दक्षिण आफ्रिकी चाहत्यांना हे अर्थातच पसंत पडलेले नाही. अत्यंत अनुभवी असूनही त्याने मारलेले खराब शॉट त्यांच्या संतापाचे मुख्य कारण आहे. इंग्लंडविरुद्ध तो केवळ आठ धावा काढून परतला. तेव्हा 3 बाद 123 धावसंख्येवर हशीम आमला याला जोफ्रा आर्चरचा बॉल लागल्याने मैदान सोडावे लागले. अशावेळी आफ्रिकेची अवस्था एका अर्थाने 4 बाद 123 अशीच होती. ड्युमिनीवर मदार होती, पण तो केवळ आठ धावा काढू शकला, मोईन अलीच्या चेंडूवर त्याने लाँग-ऑफला बेन स्टोक्सकडे कॅच दिला.

मग बांगलादेशविरुद्ध त्याने कामगिरी उंचावली होती. तो सेट झाला होता. 47व्या ओव्हरमध्ये त्याने महंमद सैफुद्दीनला सलग दोन चौकार मारले होते. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये मुस्तफीझूर रेहमानविरुद्ध त्याने विकेट फेकली. पहिलाच बॉल मुस्तफीझूरने हुशारीने टाकला. बाऊन्सरच पण किंचीत कमी वेगाचा होता. त्यावर ड्युमिनी चकला. पुल करण्याच्या प्रयत्नात तो टायमिंग साधू शकला नाही. बॅटला लागून स्टम्पवर बॉल ओढवून घेत त्याचे आऊट होणे आफ्रिकी समर्थकांना अजिबात आवडले नाही.

इंग्लंडविरुद्ध संघ हरताच ड्युमिनीवर टीका झाली होती. संघातून ज्याची हकालपट्टी व्हायला हवी असा एक खेळाडू म्हणजे ड्यूमिनी होय, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. आणखी एका चाहत्याने तर म्हटले आहे की, इतक्या सुंदर देशात, जेथे गुणवत्ता ठासून भरली आहे, तेथे जेपी ड्युमिनीची जागा घेऊ शकेल असा एकही खेळाडू आपल्याला अद्याप मिळू शकलेला नाही. तो कधीच चागंला खेळाडू नव्हे तर, नेहमीच बिनकामाचा खेळाडू ठरला आहे.

जो ड्यूमिनी भागिदारीचे मोल जाणतो, सहकाऱ्यांना खेळ उंचावण्यास सांगतो, त्याने खास करून बांगलादेशविरुद्ध तरी विजयाची संधी असताना असे आऊट व्हायला नको होते. त्यातच त्याचे सामन्यानंतरचे वक्तव्य बघता कसला आलाय हा डोंबल्याचा ड्युमिनी असेच म्हणावे लागेल.

दोन सामने हरल्यानंतर आफ्रिकेला संघाच्या स्वरुपाचे पोस्टमार्टेम करावे लागेल. अशावेळी ड्युमिनीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. डावखुरा असणे आणि अष्टपैलू क्षमता तसेच अनुभव असे गुण असले तरी त्याची दोन सामन्यांतील कामगिरी त्यास न्याय देणारी नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News