#world_cup - एबीची अनुपस्थिती आफ्रिकेला झटका देणारी असणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • डिव्हिलर्सने आधीच निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे तो या स्पर्धेत खेळण्याचा प्रश्नच नव्हता.
  • मात्र आफ्रिका सलग दोन सामन्यांत हरल्यानंतर त्याची उणीव जाणवायला लागली आहे.
  • तशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या पातळीवर व्यक्त होत आहेत.

नॉटींगहॅम - ख्रिस गेलने पाकिस्तानविरुद्ध एक विक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा हा उच्चांक होता, जो आधी एबी डिव्हिलर्सच्या खात्यात होता. डिव्हिलर्सने आधीच निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे तो या स्पर्धेत खेळण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र आफ्रिका सलग दोन सामन्यांत हरल्यानंतर त्याची उणीव जाणवायला लागली आहे. तशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या पातळीवर व्यक्त होत आहेत.

वय वाढत असल्याने आणि टी20 स्पर्धांना प्राधान्य देण्याचे ठरविल्यामुळे डिव्हिलर्सने निवृत्ती घेतली, पण त्याआधी तो आपल्या पसंतीनुसार कोणती मालिका खेळायची, कोणती नाही हे ठरवायचा. ते संघाच्यादृष्टिने योग्य नव्हते अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे संघात एकटे पडल्याची स्थिती निर्माण झाली. वास्तविक आपल्या कारकिर्दीत कदापी स्वतःचा नव्हे तर सदैव संघाचाच विचार केला, असे असताना अशी वेळ येणे योग्य नव्हते. अखेरीस निवृत्ती जाहीर करावी लागली असे त्याने अलिकडेच आयपीएलनंतर सांगितले. त्यावेळी प्रत्यक्षात या वर्ल्ड कपनंतर गुडबाय करण्याची इच्छा होती, असेही त्याने बोलून दाखविले. खरोखरच तसे झाले असते तर चांगले झाले असते, असे आता अनेक चाहत्यांना वाटू लागले आहे.

इंग्लंडविरुद्ध 104, तर बांगलादेशविरुद्ध 21 धावांनी हरलेल्या संघात 360 डिग्री कौशल्याचा सुपरमॅन असला असता तर... असे अनेकांना राहूनराहून वाटते आहे. मागील वर्षी मे महिन्यात त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याचा हा निर्णय तेव्हाच अनपेक्षित ठरला होता. 15 वर्षांच्या कारकिर्दीत 114 कसोटींत 8765 धावा, 228 वन-डे सामन्यांत 9577 धावा अशी त्याची कामगिरी आहे. कसोटीत 50.66, तर वन-डेमध्ये 53.50 असे अॅव्हरेज आहे. प्रदिर्घ कारकिर्द घडविलेल्या आणि दोन्ही प्रकारांत 50 पेक्षा जास्त अॅव्हरेज असलेल्या निवडक खेळाडूंत त्याचा समावेश आहे. असा खेळाडू आफ्रिकेसाठी बहुमोल ठरला असता. दक्षिण आफ्रिका संघाचा हॅशटॅग #ProteaFire असा आहे. सुपरमॅनच्या गैरहजेरीत या संघाला दोन पराभवांच्या माध्यमातून 440 व्होल्टचे दोन झटके बसले आहेत. जो संघ पेटून खेळेल असे त्यांचा हॅशटॅग सांगतो तोच संघ चीतपट होतो आहे.

टी20 लीगमुळे खेळाडूंनी आपले धोरण ठरविणे नवे नाही. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांच्यावर यावरून बरीच टीका होते. या दोघांच्या क्रिकेट मंडळाने आणि निवड समितीने मात्र तोडगा काढून दोघांना संघात पाचारण केले. दक्षिण आफ्रिका मात्र यातून मार्ग काढू शकली नाही. एबी डिव्हिलर्स या वर्ल्ड कपचे आकर्षण ठरला असता यात शंका नाही, तो नसणे मात्र स्पर्धेसाठी नव्हे तर एकूण समीकरणात आफ्रिकेलाच महाग पडते आहे असे दोन निकालांवरून दिसते. अशक्यप्राय चेंडूवर अशक्यप्राय स्थितीतून अशक्यप्राय शॉट मारत चौकार-षटकार खेचण्याच्या क्षमतेमुळे ज्या खेळाडूला 360 डिग्री असे बिरूद लाभले तो नसणे एखाद्या संघाला कसे काय परवडू शकते असा प्रश्न रास्त ठरतो. अशावेळी एबी डिव्हिलर्स नसताना #ProteaFire हा हॅशटॅग सार्थ ठरविण्याचे आव्हान फाफ डूप्लेसी आणि त्याच्या संघासमोर निर्माण झाले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News