जागतिक पर्यावरण दिन: ग्रीन सिटीसाठी वृक्षप्रेमी तरुणांची कृतिशील चळवळ! 

परशुराम कोकणे 
Wednesday, 5 June 2019
  • ग्रीन सिटीसाठी कृतिशील तरुण, संस्थांच्या कामाचा हा आढावा...|
  • ​​पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची
  • जीव धोक्‍यात घालून वृक्ष संवर्धन
  • वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनासाठीही प्रयत्न

सोलापूर : आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होतोय... व्हॉट्‌सअॅप, फेसबुकवर आलेल्या मेसेजमुळे तुम्हाला हे कळालेच असेल! सोशल मीडियावर हौशी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढत असतानाच काही मंडळी मात्र लाईक आणि कॉमेंटची अपेक्षा न करता झटत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीसोबतच त्याचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. 

ग्रीन सिटीसाठी कृतिशील तरुण, संस्थांच्या कामाचा हा आढावा... 
सोलापुरात पूर्वभागातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास यन्नम हे वृक्षारोपण आणि संवर्धनसाठी झटत आहेत. अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीनिवास व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. दुभाजकातील रोपे जगावित यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न होत आहेत. रस्त्यावरून जाताना कोणत्याही ठिकाणी झाडं तोडताना दिसली की ते थांबतात. हातातले काम बाजूला ठेवून चौकशी करतात. परवानगीशिवाय वृक्षतोड होत असेल तर तत्काळ महापालिका वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार करतात. अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बोलावून झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडतात. श्रीनिवास यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला दखल घ्यावी लागत आहे. 

जीव धोक्‍यात घालून वृक्ष संवर्धन
जुळे सोलापुरातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी पंकज चिंदरकर यांनी झाडं वाचविण्यासाठी अनेकदा स्वत:चा जीव धोक्‍यात घातला आहे. कोणत्याही ठिकाणी वृक्षतोड होत असल्याची माहिती कळाली की ते धाव घेतात. अनेकदा लाकडांची वाहतूक करणारी वाहनेही त्यांनी अडवली आहेत. परवानगीशिवाय वृक्षतोड, लाकडांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा कायमचा पाठपुरावा चालू असतो. या कारणावरून महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत अनेकदा वादही होतात, पण हेतू चांगला असेल तर मागे हटायचे नाही, असे पंकज यांचे म्हणणे आहे. 

वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनासाठीही प्रयत्न
"अलीकडे सोशल मीडियावर पर्यावरणाविषयीचे अनेक मेसेज न वाचताच फॉरवर्ड केले जात आहेत. लोकांनी पर्यावरणासाठी काय करावे, काय करू नये याचे उपदेश सोशल मीडियावरून केले जात आहे. कोणीतरी कौतुक करावं म्हणून आम्ही पर्यावरण संवर्धनाचं काम करीत नाही. वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. 
- श्रीनिवास यन्नम, अतुल्य सेवा प्रतिष्ठान 

 
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची
"तापमान वाढल्याने साऱ्यांनाच अस्वस्थता जाणवत आहे. यावर झाड लावणं आणि ती जगवणं हा एकच उपाय आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम करताना प्रसिद्धीच्या मागे न लागता प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. जर तुम्हाला कृती करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर जी मंडळी पर्यावरण संवर्धनासाठी झटत आहेत त्यांना मदत करावी, प्रोत्साहन द्यावे. 
- पंकज चिंदरकर, पर्यावरणप्रेमी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News