विश्वकरंडक स्पर्धेत फलंदाज अद्यापही अपयशी

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 3 June 2019
  • वेगवान, उसळत्या चेंडूवर आफ्रिका, पाक, श्रीलंका फलंदाजांची भंबेरी

  • विंडीज-पाकिस्तान लढत एकंदरीत ३५.२ षटकांची. त्यात २१३ धावा होताना १३ फलंदाज बाद​

लंडन - पाकिस्तानची सपेशल शरणागती, हाशिम आमलास उसळत्या चेंडूवर झालेली दुखापत, हे बघता विश्वकरंडक स्पर्धेसाठी तयार झालेले फलंदाजांचे नंदनवन कुठे आहे, हाच प्रश्न पडतो. खेळपट्टी फलंदाजीस अनुकूलच असणार, असे गृहीत धरलेल्या संघांची अवस्था बिकट झाली आहे, असेच चित्र आहे.

स्पर्धेतील सलामीच्या सामन्यावेळी खेळपट्टीवरून चेंडू उसळेल, याची कल्पनाही करण्यास आफ्रिकेचे मध्यमगती गोलंदाज तयार नव्हते; त्यामुळे ते प्रयोग म्हणून चेंडू कट करीत होते किंवा हळुवार टाकत होते. त्यामुळेच अननुभवी; तसेच जिगरबाज जोफ्रा आर्चरने चेंडू उसळल्यावर आफ्रिकेचे फलंदाज मानसिकदृष्ट्या खच्ची झाले. हाशिम आमलाच्या दुखापतीने आफ्रिकेच्या प्रतिकाराच्या आशाच संपवल्या असेच चित्र होते. 

आर्चरच्या उसळत्या चेंडूपासून जणू वेस्ट इंडीजने प्रेरणा घेतली. त्यांनी पाकिस्तानला उसळत्या चेंडूवर चुका करण्यास भाग पाडले. इंग्लंडच्या अनेक गोलंदाजांनी शिवणीची बाजू तिरकी करून चेंडूचा लेदर भाग खेळपट्टीवर आपटला होता आणि त्याद्वारे चेंडू अधिक उसळवत आफ्रिकन फलंदाजांवर दडपण आणले होते. हाच कित्ता विंडीज गोलंदाजांनी गिरवला.

न्यूझीलंडने तर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या वेळी डावाच्या सुरवातीस कसोटीस साजेशी क्षेत्ररचना केली. हिरव्यागार खेळपट्टीचा प्रथम फायदा घेताना त्यांनी फलंदाजांभोवती स्लीपचे कडे रचले. कसोटीचा अनुभव पणास लावत करुणारत्नेनेच याचा सामना केला. अनुकूल खेळपट्टीच अपेक्षित असल्यामुळे चेंडू उसळवला की फलंदाज चाचपडत आहेत. आंद्रे रसेलने दहा चेंडूंत सहा शरीरवेधी चेंडू टाकत पाकला हादरवले आणि त्यातून ते सावरलेच नाहीत. त्या तीन षटकांनंतर रसेलला ब्रेक देण्याची चाल विंडीज खेळले. 

स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांत
तीनशे धावांचा सहज पाठलाग होईल, असे समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत सुरवातीला आफ्रिकेचा डाव ३९.५ षटकांत संपुष्टात
विंडीज-पाकिस्तान लढत एकंदरीत ३५.२ षटकांची. त्यात २१३ धावा होताना १३ फलंदाज बाद
न्यूझीलंड-श्रीलंका लढत एकंदर ४५.३ षटकांची. त्यात २७३ धावा 
पराजित संघ पूर्ण ४० षटकेही खेळण्यात अपयशी
वेगवान, उसळत्या चेंडूवर आफ्रिका, पाक, श्रीलंका फलंदाजांची भंबेरी

आम्हाला भरपूर धावा करणाऱ्याच खेळपट्ट्या तयार करण्याची सूचना आहे; पण त्याचवेळी सर्वांनी स्पर्धा पन्नास दिवसांची आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. कोरड्या ठणठणीत खेळपट्ट्या सुरवातीस असतील आणि गतवर्षीसारखा उन्हाळा असेल, तर स्पर्धा संपेपर्यंत खेळपट्ट्या ब्रेक होतील. त्या फिरकीलाच साथ देतील. त्यामुळेच तर आता तुम्हाला गवत दिसत आहे; तसेच चेंडू उसळताना दिसत आहे. 
- विश्वकरंडक स्पर्धेसाठी नियुक्ती ग्राउंड्समन

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News