#WorldCup2019 कांगारूंचा हा होता 'सक्सेसफूल गेम ऑफ दी थ्रोन'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

वर्ल्ड कप 2019 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील ज्या खेळाडूच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला पाचारण करण्यात आले तो म्हणजे नॅथन कुल्टर-नाईल...

वर्ल्ड कप 2019 - आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील ज्या खेळाडूच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला पाचारण करण्यात आले तो म्हणजे नॅथन कुल्टर-नाईल. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाठदुखीची स्कॅन टेस्ट होण्यापूर्वीच संघ निवडला म्हणून निवड समितीवर नाराजी व्यक्त करणारा खेळाडू म्हणजे नॅथन कुल्टर-नाईल. कांगारूंच्यावतीने वर्ल्ड कपमध्ये शाब्दिक रणशिंग फुंकणारा खेळा़डू म्हणजे नॅथन कुल्टर-नाईल. हाच नॅथन कुल्टर-नाईल वेस्ट इंडिजविरुद्ध सामनावीर ठरतो म्हणजे तो कांगारूंचे सिक्रेट वेपन म्हणावा लागेल.

चर्चा नॅथन सोडून इतरांची
गतविजेते या नात्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा आढावा घेताना सर्वप्रथम चर्चा होती ती डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथची. गेले वर्षभर संघात नसूनही त्यांच्याविषयी सर्वाधिक चर्चा होणे स्वाभाविक होते. गोलंदाजीत डावखुरा मिचेल स्टार्क-पॅट कमिन्स हे वेगवान वीर, नेथन लायन-अॅडम झम्पा हे स्पीनर्स यांच्याकडे लक्ष होेते. एक्स फॅक्टरवाला खेळाडू म्हणून ग्लेन मॅक्सवेल याचे नाव आघाडीवर होते. अशावेळी केवळ कागदावर अष्टपैलू क्षमता असलेला, पण मैदानावर तशी कामगिरी न केलेला नॅथन कुल्टर-नाईल नामक कांगारू विंडीजविरुद्ध हिरो ठरला. खरे तर तो चेंडू स्विंग करतो आणि इंग्लंडमध्ये उपयुक्त ठरेल म्हणून त्याला निवडण्यात आले होते.

 

गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत दणका
या पार्श्वभूमीवर नॅथनच्या कामगिरीबद्दल आणखी आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे त्याने गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत दणका दिला. तो आठव्या नंबरवर उतरला होता. या नंबरवर त्याने वर्ल्ड कपमधील 92 धावांची विक्रमी खेळी केली. एकूण वन-डेमधील इंग्लंडच्या ख्रिस वोक्सचा 95 धावांचा उच्चांक मोडण्याची त्याची संधी हुकली, पण तो सामनावीर ठरणे काही कमी सनसनाटी नाही. त्याच्या शेवटच्या चार चेंडूंवर अॅश्ले नर्सने चार चौकार मारले, पण तरिही कांगारूंची 15 धावांनी सरशी झाली.

फलंदाज म्हणून आधीची कामगिरी यथा-तथा
नॅथनला गोलंदाजीत त्याला 70 धावांचे मोल द्यावे लागले. मात्र त्याच्या 92 धावा विंडीजच नव्हे तर खुद्ध नॅथनसाठीही अनपेक्षित ठरल्या. याचे कारण त्याची आधीची कामगिरी अष्टपैलू म्हणून उल्लेखनीय नव्हती. 29 सामन्यांत 48 विकेट अशी कामगिरी नक्कीच समाधानकारक आहे, पण फलंदाजीत यथा-तथा अशीच कामगिरी झाली होती. यापूर्वी 28 सामन्यांत 18 डावांत फलंदाजी, दोन वेळा शून्यावर बाद, सर्वोच्च धावा 34, केवळ पाच वेळा डबल फिगरमध्ये अशी त्याची कामगिरी होती. त्यामुळे नॅथन कुल्टर-नाईल याचा फलंदाज म्हणून होमवर्क कुणी करण्याची गरज नव्हती.

शाब्दिक तोफ डागण्यापासून प्रारंभ
खरे तर नॅथनच्या अनपेक्षित आक्रमणाची सुरवात रणशिंग फुंकण्यापासून झाली होती. पहिल्या लढतीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानच्या फलंदाजांना आखूड टप्याचे चेंडू टाकून जेरीस आणले होते. त्यावेळी विंडीजचा वेगवान मारा चर्चेचा विषय ठरला होता. अशावेळी नॅथनने विंडीजची वेगवान मात्रा त्यांच्यावरच उलटविण्याचा इशारा दिला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर तो म्हणाला होता की, ख्रिस गेल आणि कंपनीने बाऊन्सर्सचा सामना करण्यास सज्ज व्हावे. आम्ही त्यांचीच मात्र त्यांच्याविरुद्ध वापरणार आहोत. हनुवटापर्यंत उसळणाऱ्या चेंडूंना सामोरे जाण्यास त्यांनी तयार राहावे. विंडीजविरूद्ध तुम्हाला हेच करावे लागते, अन्यथा ते पकड मिळवितात आणि तुमची कोंडी करतात. षटकामागे दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी असते आणि त्यानुसार तुम्ही वापर केला पाहिजे. आम्ही विंडीजविरुद्ध हे करूच आणि प्रत्येक संघाविरुद्धही हेच धोरण असेल. मैदाने छोटी आहेत, तर खेळपट्ट्या ठणठणीत. अशावेळी शक्य होईल तेव्हा तुम्हाला बाऊन्सर्सचा वापर केला पाहिजे.

गेलविरुद्ध थेट वक्तव्य
नॅथनने शाब्दिक चकमक छेडताना गेलविरुद्ध थेट वक्तव्य केले होते. आमचा स्टार्क त्याची दांडी उडवेल. त्याच्यासाठी सोप्पे आहे ते, अशी सुरवात करून तो म्हणाला होता की, गेल तुमच्या चांगल्या चेंडूंवर चौकार मारतो, तर खराब चेंडूंवर षटकार खेचतो. आम्ही शक्य तेवढे चांगले चेंडू टाकायचा प्रयत्न करू आणि काही उसळवू. त्याच्याविरुद्ध आक्रमक मारा करावा लागतो. तरिही तो फटकेबाजी करतो, पण तो आता म्हातारा होत चालला आहे. त्याने अलिकडे स्टार्क आणि कमिन्सचा पुरेसा सामना केला आहे का हे मला ठाऊक नाही, पण आता हे दोघे आणखी वेगवान मारा करीत आहेत. अशावेळी सुरवातीला त्यांना गेल कसा सामोरे जातो हे आपल्याला पाहावे लागेल.

नशीबाची साथ
या पार्श्वभूमीवर नॅथन गोलंदाज म्हणूनच आक्रमण करेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात फलंदाजीत प्रथम संधी मिळताच त्याने विंडीजला दणका दिला. त्याला नशीबाचीही साथ मिळाली.  त्याला दोन जीवदाने मिळाली, पण यातील पहिले 61 धावांवर मिळाले होते. नर्सच्या गोलंदाजीवर शिम्रॉन हेटमायरने त्याचा झेल सोडला. त्यानंतर 67 धावांवर कॉट्रेलच्या चेंडूवर ब्रेथवेटने झेल सोडला. त्यावेळी षटकारही गेला.

असे केले आक्रमण
34व्या षटकात ओशेन थॉमसला दोन चौकार
35व्या षटकात आंद्रे रसेलला एक चौकार
37व्या षटकात आंद्रे रसेलला एक चौकार
39व्या षटकात रसेलला एक षटकार
41व्या षटकात कार्लोस ब्रेथवेटला एक चौकार
43व्या षटकात ब्रेथवेटला षटकार
44व्या षटकात अॅश्ले नर्सला एक चौकार
46व्या षटकात शेल्डन कॉट्रेलला लागोपाठ दोन षटकार
47व्या षटकात ब्रेथवेटला लागोपाठ दोन चौकार

पक्का कांगारू
कांगारू क्रिकेटपटूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते संघासाठी-देशासाठी झोकून देत खेळतात. मुख्य म्हणजे गोलंदाजी-फलंदाजी-क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात ते सर्वस्व पणास लावतात. नॅथन कुल्टर-नाईल याला दुखापती, कांगारूंच्या संघातील स्थान मिळविण्यासाठीची चुरस अशा कारणांमुळे 2013 पासून सुमारे सहा-साडेसहा वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 29 वन-डे आणि 28 टी20 सामन्यांत संधी मिळाली आहे. अशावेळी या वर्ल्ड कपमधील सामनावीर पुरस्कार त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरेल हे नक्की.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News