नव्वदीत गारद झाल्यानंतर भारताला हसणारे स्वतःच झाले ८५ मध्ये गारद

सकाळ (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • विश्वविजेत्यांचा  प्रताप 
  • दुबळ्या आयर्लंडने ८५ धावांत गुंडाळले
  • ऍशेस मालिकेआधी इंग्लंडला मोठा धक्का 

लंडन : वर्षाच्या सुरुवातीस झालेल्या भारत आणि न्यूझीलंड मधल्या सामन्यात भारतीय संघ नावाडदित ढेपाळला होता. परंतु याचे दुःख भारतापेक्षा जास्त इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल व्हॉनला झाले होते.

आधुनिक क्रिकेटमध्ये कशी काय एक टीम नव्वदीत गारद होऊ शकते असा टोला त्याने भारताला दिला होता. परंतु आता ह्या विधानाचीच परतफेड त्याच्याच देशाने केली आहे, कारण दुबळ्या आयर्लंड विरुद्ध अगदी १० दिवसांपूर्वीच जगज्जेता झालेला संघ चक्क ८५ धावांत ढेपाळला आहे. ट्विटरवर केलेले त्याचा विधान उचलून धरत आता भारतीय चाहत्यांनीं आठवण करून देत त्याला सळो कि पळो करून सोडलंय !    

अखंड डाव असो वा सुपर ओव्हर असो; न जिंकताच विश्‍वविजेतेपदाची माळ गळ्यात पडलेल्या इंग्लंडच्या फलंदाजीला कसोटी क्रिकेटमध्ये दुबळ्या आयर्लंडकडून वास्तवता स्वीकारावी लागली. आजपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची ८५ धावांत दाणादाण उडाली. विशेष म्हणजे लॉर्डस्‌च्या ऐतिहासिक मैदानावरच हा विरोधाभास घडला.

दहा दिवसांपूर्वी लॉर्डस्‌वर इंग्लंडच्या विजेतेपदाचे नाट्य घडले होते, त्यात त्यांची फलंदाजी बहरली होती. जेसन रॉय, ज्यो रूट आणि बेअरस्टॉ या विजेतेपदातील फलंदाजांनी सपशेल शरणागती स्वीकारली. त्यांच्या अवघ्या तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली; तर मधल्या फळीतील तिघे भोपळेबहाद्दर ठरले. आयर्लंडकडून टीम मर्टाघने पाच आणि मार्क अदिरने तीन विकेट मिळवून नव्या चेंडूसमोर इंग्लंड फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. 

वेगवान गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली; पण हा निर्णय अंगलट आल्याची जाणीव होण्यास फार काळ लागला नाही. इंग्लंडच्या एकदिवसीय संघातील हुकमी खेळाडू जेसन रॉयला कसोटीत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली; पण त्याला अवघ्या पाच धावाच करता आल्या. कर्णधार ज्यो रूट २; तर बेअरस्टॉ शून्यावर बाद झाले. ख्रिस वोक्‍स आणि मोईन अली हे अष्टपैलू खेळाडूही शून्यावर बाद झाले तेव्हा इंग्लंडची ७ बाद ४३ अशी अवस्था झाली होती.

पहिल्या दिवशी चहापानापर्यंत आर्लंडचीही अवस्था पाच बाद १३८ अशी झाली. त्यांच्या अँडी बरनिर्नीने अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडची वाताहत 
(कंसात षटके)
 ४६ (१९.१) वि. वेस्ट इंडीज, 
पोर्ट ऑफ स्पेन १९९४, पराभव
 ५८ (२०.४) वि. न्यूझीलंड, ऑकलंड २०१८, पराभव
 ६१ (१५.४) वि. ऑस्ट्रेलिया, एमसीजी १९०२, पराभव
 ८५ (२३.४) वि. आयर्लंड, 
लॉर्डस्‌ २०१९, सामना सुरू
 १०१ (२२.५) वि. ऑस्ट्रेलिया, एमसीजी १९०४, पराभव

संक्षिप्त धावफक 
इंग्लंड, पहिला डाव : २३.४ षटकांत सर्व बाद ८५ (जेसन रॉय ५, डेन्ली २३, ज्यो रूट २, बेअरस्टॉ ०, सॅम करन १८, ऑली स्टोन १९, टीम मर्टाघ ९-२-१३-५, मार्क अदिर ७.४-१-३२-३, बॉय रॅंकिंन ३-१५-२)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News