कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'वर्क फ्रॉम व्हिलेज'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020
  • मराठी उद्योजक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे मत

मुंबई : शहरांचे विकेंद्रीकरण करून वर्क फ्रॉम व्हिलेज पद्धती वापरली तर आपण कोरोनासारख्या साथींवरही सहज मात करू. एकत्र येऊन नवा आत्मनिर्भर भारत घडवू, असा विश्‍वास केंद्रीय मनुष्यबळ विकास व माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.

मराठी चेंबर ऑफ बिझनेस ऍण्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्यातर्फे रविवारी (ता. 5) वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मराठी उद्योजक परिषदेत धोत्रे बोलत होते. मराठी उद्योजकांसमोरील अडचणी व नव्या संधी शोधण्यासाठी तसेच माहितीची, अनुभवाची देवाणघेवाण करण्याच्या हेतूने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारमध्ये राज्यभरातील तसेच अमेरिका, सिंगापूर येथील मराठी उद्योजकांनीही आपले अनुभव मांडले.

भारतातील लघु व मध्यम इलेट्रॉनिक्‍स उद्योजकांच्या मालांचे ब्रॅंडिंग केले तर त्यांना निर्यातवाढीला मदत होईल यावर केंद्र सरकारने विचार केला आहे. उद्योगांच्या क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा तोच उद्देश आहे, पण त्याचबरोबर आपण एकत्र येऊन काम केले तर क्रांती घडवू शकतो. एक भारतीय हा दोघा जपानी माणसांएवढे काम करतो, पण दोन भारतीय एकत्र आले तर ते अर्ध्या जपानी माणसाएवढे काम करतात असे म्हटले जाते. त्यामुळे एकत्रित काम करावे. अजूनही सरकारकडे अनुदाने, सवलती मागण्याकडे अनेक उद्योजकांचा कल असतो, पण प्रत्येक गोष्टीत सरकारी यंत्रणा आली तर परमिटराज, इन्स्पेक्‍टर राज यांचा वरचष्मा होईल. त्यापेक्षा उद्योजकांनीच एकत्र येऊन सामायिक सोयी कराव्यात, असेही धोत्रे यांनी दाखवून दिले.

भारतात काहीही करताना लोकशाही पद्धतीत विरोधकांचा विरोधही सहन करावा लागतो. आपल्याकडे कामात वैयक्तिक भर असतो; तर चीन, तैवान, सिंगापूर येथे सामूहिक कामावर भर दिला जातो. हा आपल्यात व त्यांच्यात फरक असतो, असे सिंगापूर येथील उद्योजक संजय देसाई म्हणाले. उद्योजक संघटनांनी महिलांना व्यासपीठ देण्याची नितांत गरज आहे. कोरोनाच्या काळात अमेरिकेतील एका महिलेने फणसातील पोषक द्रव्ये शोधून त्यावर आधारित व्यवसाय सुरू केला. तो आता अत्यंत जोमात चालत आहे, असे अमेरिकेतील उद्योजक प्रिया सामंत यांनी दाखवून दिले. कोरोनाच्या काळात आता नैसर्गिक-सेंद्रीय खाद्यपदार्थांवर लोकांनी भर दिला असून तेच आता शोधले जात आहेत. अशा संधींचा शोध घ्यायला हवा, असे अकोल्याचे उद्योजक प्रकाश पोरे म्हणाले.

चीनशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याकडेही सरकारने तशी पावले उचलली पाहिजेत. उद्योजकांनी स्वस्त जमीन वा सवलती दिल्या पाहिजेत. किंबहुना, उद्योजक संघटनांनीही तशा योजना सरकारला दिल्या पाहिजेत. परदेशी उद्योग संघटनांशीदेखील आपले सहकार्य हवे व महत्त्वाचे म्हणजे आपण एकत्र येऊन कामे केली पाहिजेत, असे पुण्याच्या बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे म्हणाले. उद्योग यशस्वी करण्यासाठी उद्योजकाने त्याच्या मनातील भीती, अहंकार काढला पाहिजे. यात कठोर परिश्रम व चिकाटीला पर्याय नाही, धोका पत्करण्याची व आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी, असे पुण्याचे केदार चौधरी, सॅन फ्रॅन्सिस्कोचे तुषार धायगुडे आदींनी सांगितले. मराठी उद्योजकांचा दबावगट तयार करून त्यांच्यासाठी तसेच उद्योगांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी दिली.

कोरोनाशी लढ्यात उद्योजकांचा सिंहाचा वाटा

कोरोनाचा फैलाव आणि टाळेबंदीचा काळ आव्हानांचा, आत्मपरीक्षणाचा तसेच संधींचा आहे. शहरांच्या प्रगतीत खेड्यांचा म्हणजेच तेथील कष्टकऱ्यांचा असलेला वाटा आपल्याला दिसून आला आहे. त्यामुळे अजूनही आपण शहरांचे विकेंद्रीकरण केले तर आपल्याला अशा साथींचा फटका बसणार नाही. या संधीकडे उद्योजकांनी लक्ष दिले तर आत्मनिर्भर भारत शक्‍य आहे. अशा अनेक बाबींना चालना देण्याची गरज आहे व आजच्यासारख्या या परिषदांमुळे त्यांना बळ मिळेल. आपण सर्व एकत्र येऊन कोरोनाशी लढा देऊ शकू व आत्मनिर्भर भारत घडवू. त्यात उद्योजकांचा सिंहाचा वाटा असेल, असेही संजय धोत्रे म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News