स्त्रीजन्म 'ही'

सुहास टिल्लू
Monday, 24 February 2020

रात्री ललिता खोलीत येताच त्याने तिला ह्या प्रकरणा बद्दल जेव्हा विचारलं तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते खरोखरच तिच्या वैचारिक प्रगल्भतेची उंची दाखवत तर होतंच पण त्याहून जास्त तिच्यात असलेल्या देवत्वाचा साक्षात्कार करून देत होतं .

ही सत्यकथा आहे ललिताची ! उत्तर प्रदेश मधली ! मुळात यु.पी. हा सामाजिक सुधारणांच्या बाबतीत फारच मागासलेला ! त्यातसुद्धा जस-जसं पूर्वेकडे बिहारच्या दिशेने जावं तसतसं हे मागासलेपण अधिकच वाढत जातं. मोघलांनंतर ब्रिटिशांनी शंभर वर्षे राज्य केलं पण ह्या भागात आपण फिरलो तर आजही आपण मोघलकाळांत आहोत असं वाटतं !

ललितादेवी, ही लहानपणापासूनच जरा वेगळी होती. दिसण्यात ' बेताची ' म्हणणं पण जड जावं , अशी ! देवाने रूप दिलं नाही पण त्या ऐवजी बुद्धी मात्र भरपूर दिलेली ! घराणं घरंदाज राजपूत ! घरची आर्थिक परिस्थिती सुबत्तेची ! अशा ह्या मुलीत माया, ममत्व व प्रेम मात्र पुरेपूर ठासून भरले होते.

तिची शिक्षणाची आवड पाहून, 'मुलींना जरूरी पुरतंच शिक्षण द्यायचे ' ह्या रिवाजाला मोड घालून , घरच्यांनी तिला हवं तितकं शिक्षण घेण्याची मुभा दिली होती. ललिताने देखील ह्याचा भरपूर फायदा करून घेतला होता .तिने एम.ए. एम. एड पर्यंत भरारी मारली होती व घेतलेल्या शिक्षणाचा सद्उपयोग व्हावा म्हणून तिने शिक्षिकेची नोकरी पत्करली होती.

तिच्या अंगभूत गुणांमुळे ,विषय सोपा करून समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे आणि विद्यार्थ्यांशी खेळीमेळीचे वातावरण ठेवत असल्याने , ती विद्यार्थीवर्गात खूपच पॉप्युलर होती. लवकरच तिला प्रमोशन मिळाले व तिची शेजारच्या तालुक्याच्या गावी बदली झाली .

एव्हाना ललिताने तिशी पार केली होती तरी ,' एकट्या मुलीला नोकरीच्या जागी कसं ठेवायचं ,' हा प्रश्न तिच्या आईवडिलांना पडला.

बदलीच्या गावी ललिताच्या घराण्याशी दूरचे नाते असलेले श्री. धनसिंग राजपूत रहात होते .जागिरदार घराणं होतं ,त्यांची भली मोठी हवेली गावात होती .ललिताची सोय त्यांच्याकडे बिनदिक्कत होऊन गेली होती.

धनसिंगना चार आपत्ये होती . चारही पुत्रच होते सगळे लष्कराच्या नोकरीत होते . नोकरीच्या निमित्ताने दूरवर पांगले होते. मोठ्या तिघांची लग्ने झाली होती . मुलंबाळं होती . एकंदर मोठा कुटुंबकबिला होता.

सगळ्यात धाकटा भैरवसिंग हा एअरफोर्स मधे पायलट ऑफिसर होता . शॉर्टसर्विस कमिशन संपेपर्यंत त्याला लग्न करायचं नव्हतं.

ते संपल्यावर मात्र वयाच्या पस्तिसाव्या वर्षी तो चतुर्भुज झाला होता व वर्षभरात दोन जुळ्या मुलांचा बाप देखील झाला होता. घरच्या जमीन जायदादीकडे त्याने लक्ष घातलं होतं.

ललिता त्याच सुमारास त्या घरी रहायला आली होती . जुळ्यांना सांभाळता सांभाळता त्यांच्या आईची नाकीनऊ होत असे .मुळात लहान मुलांची आवड असल्याने तिने मुलांच्या आईचं काम हलकं केलं होतं.

अशातच भैरवसिंगच्या पत्नीस पुन्हा दिवस गेले .मुळातच तिची प्रकृती खूपच तोळामासा होती डॉ.,अबॉर्शनची रिस्क घ्यायला तयार नव्हते. तिला यथावकाश कन्यारत्न झाले मात्र, तिची परवरीश करण्याचं भाग्य त्या अभागी मातेला मिळालं नाही .अवघ्या चार महिन्यांत ती स्वर्गवासी झाली .

जेमतेम दोन वर्षे वयाचे जुळे मुलगे व भरीला त्यांची चारपाच महिन्यांची बहिण ! भैरवसिंग व त्याच्या कुटुंबावर जणू आकाश कोसळलं होतं .सगळेच हतबल झाले होते मात्र एकटी ललिता खमकी होती . अगदी समर्थपणे ती मुलांचा व सर्व कुटुंबाची देखभाल करू लागली होती .

भैरवसिंगला दुसरं लग्न करणे भाग होते. त्याचं मित्रमंडळ ललिताचा कामाचा उरक व तोसुद्धा शाळेची जबाबदारी सांभाळून, पहात होतं. त्यांनी भैरवसिंगला ललिताशी लग्न करण्याचा सल्ला दिला.

जेव्हा ललिताचे आईवडील ह्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते तेव्हा सर्वकाही ठरलं व साधेपणाने लग्न पार पडलं .

ह्या लग्नाने दोन्ही घराण्यांना खूप आनंद झाला होता. भैरवसिंगच्या आईवडिलांचं मन तर तिने आधीच जिंकलं होतं. त्यांना भासणारी मुलीची उणीव तिने कधीच भरून काढली होती

ह्या लग्नाच्या आधीच ती भैरवसिंगच्या तीन मुलांची माता झालीच होती .लग्न हे समामाजासाठीचं शिक्कामोर्तब होतं इतकंच !

भैरवसिंगला विशिष्ठ सेवा पदक जाहीर झालं होतं . रिपब्लिक डे परेडच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते ते घेण्यासाठी तो दिल्लीला गेला होता . आठदहा दिवस राहून परत येणार होता .

भैरवसिंग परत आल्या आल्या त्याचा बालपणापासूनचा परममित्र विष्णू श्रीवास्तव त्याला भेटायला आला .विष्णू डॉक्टर होता सरकारी आरोग्य खात्यात सिव्हिल सर्जन होता . आल्या आल्याच त्याने भैरवसिंगची शेलक्या शब्दांत ( व शेलक्या शिव्यांसकट ) खरडपट्टी काढायला सुरुवात केली .कारण त्याच्याच शब्दात सांगायचं तर ,

'तुमने ललिताभाभीको फॅमिलीप्लानिंगके ऑपरेशनकेलिये मजबूर क्यौं किया ? अभी उनकी उमर पैतीससाल ही तो है । क्या उनको अपना बच्चा होनेकी ख्वाईश नाही होगी ? तुम इतने नीच और स्वार्थी कैसे होगये की अपने बच्चोंके खातीर तुमने उनके, एक स्त्रीके जन्मजात अधिकारको ठुकरा दिया ?

भैरवसिंग पार गोंधळून गेला होता. विष्णूच्या ह्या बॉम्बार्डिंग मधून सावरायला त्याला जरा वेळ लागला नी त्याच्या गैरहजेरीत नक्की काय झालं होतं ह्याचं आकलन जेव्हा त्याला झालं तेव्हातर तो आणखीनच गोंधळून गेला कारण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात सुद्धा असा विचार आला नव्हता . उलट चारपाच वर्षांची गॅप घेऊन ललिताला जे आपत्य होईल ,ते कसे असेल ? ह्याचा तो विचार करू लागला होता.

रात्री ललिता खोलीत येताच त्याने तिला ह्या प्रकरणा बद्दल जेव्हा विचारलं तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते खरोखरच तिच्या वैचारिक प्रगल्भतेची उंची दाखवत तर होतंच पण त्याहून जास्त तिच्यात असलेल्या देवत्वाचा साक्षात्कार करून देत होतं .

ललिता म्हणाली , ' जे तुम्हाला कळलं ते खरंच आहे .मी हा निर्णय का घेतला ह्यामागे काही लॉजिक आहे .त्या बाबतीत मी आपणाशी चर्चा केली असती तर तुम्ही ते मला करूं दिलं नसतं ह्याची मला शंभर टक्के खात्री होती म्हणूनच तुम्ही चारपाच दिवस इथे नव्हतात त्या संधीचा मी फायदा घेतला '.

' असं पहा , ह्या तिघांना तर मी माझी मुलं मानलंच आहे .खरंतर शाळेतील सगळ्याच मुलांना मी 'माझी ' समजते .माझी मातृत्वाची आस ह्या मुलांनी पूर्ण केली आहे .त्याबाबत मी मनापासून समाधानी आहे

सद्य परिस्थितीत माझ्यात व ह्या मुलांच्या नात्यात कोणताही आडपडदा नाही . कोणतंही बंधन नाही म्हणूनच हे नातं अगदी निर्भेळ व पारदर्शक आहे .

मी स्वतःच्या मुलांची आई व्हायचं ठरवलं असतं तर कितीही प्रयत्न केला असता तरी नकळतपणे माझ्या व ह्या मुलांच्या नात्यामध्ये एक पडदा निर्माण झाला असता . तो होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला.'

परमेश्वराने मला स्त्री म्हणून जन्माला घालून आपत्यसंभव व आपत्यपालनाची प्रेरणा दिली आहे तिचा वापर मी केवळ स्वतःच्याच मुलांसाठी करायचा असा विचार करणं म्हणजे स्वतःला स्वार्थी व अप्पलपोटी सिद्ध करण्यासारखं आहे.

ह्या मुलांच्या माध्यमातून परमेश्वराने मला पत्निधर्माचं पालन करण्याची संधी दिली , बरोबर ही मुलंही पदरात घातली त्यामुळे मी तृप्त आहे कृतज्ञ आहे.

भैरवसिंग ललिताला बऱ्याच दिवसांपासून पहात होता परंतु लग्नाआधी त्यांच्यात फारसे संवाद झाले नव्हते. एकाच घरात राहून सुद्धा मोकळेपणाने विचारांचं आदानप्रदान करण्याची संधीच त्यांना मिळाली नव्हती त्याने ललिताला पत्नी म्हणून स्वीकारले ते परिस्थितीजन्य गरज म्हणून ! आजवर तो तिचा केवळ बाह्य़ चेहराच पहात आला होता .

भैरवसिंगने आता जेव्हा नव्या दृष्टीकोनातून ललिताला पाहिलं तेव्हा त्याला तिच्या रूपासभोवती एक विलक्षण प्रभा दिसली व त्या प्रभेमधे एक वेगळाच चेहरा त्याला दिसला. तो चेहरा काही सर्वसामान्य चेहरा नव्हता तर, साक्षात जगन्माता पार्वतीदेवीचा चेहरा प्रकटला होता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News