रंगणार बहारदार ‘विच्छा माझी पुरी करा’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • रंगनाथ नाट्य महोत्सवात आज रंगणार ‘फुलाला सुगंध मातीचा’ प्रयोग 
     

कोल्हापूर - गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाट्यप्रयोगाने शनिवारी  तमाम कोल्हापूरकर रसिकांना हसवता हसवता अंतर्मुखही केले. निमित्त होते, ‘सकाळ-मधुरांगण’ आयोजित रंगनाथ हॉस्पिटल, गोकुळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत रंगनाथ नाट्य महोत्सवाचे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुगुण नाट्य संस्थेच्या कलाकारांनी हा बहारदार प्रयोग सादर केला. महोत्सवात सोमवारी (ता.२४) मुंबईच्या विदुला संस्थेचा ‘फुलाला सुगंध मातीचा’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. 

दरम्यान, संगीत नाटकांची परंपरा बदलत्या काळातही नेटानं पुढे सुरू ठेवणाऱ्या मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचचा महोत्सवात गौरव झाला. न्यू एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांना प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीतज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे, ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, डॉ. रागिणी हेंद्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रभाकर हेरवाडे, गोविंद पैठणे, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.  

वसंत सबनीस लिखित नाटकाचे दिग्दर्शन सुनील घोरपडे यांचे होते. अंकुश कुलकर्णी यांची प्रकाशयोजना, सन्मती घोरपडे यांचे पार्श्‍वसंगीत, रोहन घोरपडेचे नेपथ्य होते. याज्ञसेनी घोरपडे (मैनावती), समीर भोरे (राजा), सचिन मोरे (प्रधान), सुनील घोरपडे (कोतवाल), रोहन घोरपडे (शिपाई), अभिषेक खाडे (सख्या), सुधीर जोशी (शाहीर), मुजीब मुल्ला (हवालदार) यांच्या भूमिका होत्या. 

‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, ‘‘रंगनाथ नाट्य महोत्सवाला कोल्हापूरकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. स्थानिक रंगकर्मींचा आविष्कार यानिमित्ताने अनुभवायला मिळतो आहे.’’ डॉ. प्रवीण हेंद्रे, नितीन वाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री देसाई यांनी संयोजन केले. 

प्रवेशिका आवश्‍यकच 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री नऊला प्रयोगाला प्रारंभ होईल. महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका अगोदरच वितरित केल्या आहेत. प्रवेशिकांशिवाय कुणालाही नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही. रात्री उशिरा नाटक संपत असल्याने उपनगरातील रसिकांसाठी कळंबा आणि कसबा बावडा मार्गावर मोफत बससेवा उपलब्ध आहे. 
रंगनाथ-‘गोकुळ’विषयी... 

ताराबाई पार्कातील हॉटेल पर्लच्या पिछाडीस असलेल्या रंगनाथ हॉस्पिटलचे गोकुळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर जोखमीच्या बाळंतपणासाठी आश्‍वासक पाऊल ठरले आहे. पुरुष व महिला वंध्यत्व चिकित्सा व उपचार, आययुआय, सुपर आययुआय, आयव्हीएफ, ईक्‍सी, ओव्हम डोनेशन प्रोग्राम, स्पर्म बॅंक आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत. वंध्यत्व निवारण, गर्भाशय बीजकोषाच्या गाठी काढणे, पित्ताशयाचे खडे काढण्याच्या दुर्बीण शस्त्रक्रियाही येथे होतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News