तरुणाईला रोजगार देण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणार: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 April 2020
शरद पवारांनी 'मित्रो' असे बोलून आपल्या संवादाची सुरुवात केली... व्हॉटसअप मेसेज अफवांचा घेतला समाचार... अर्थकारणावर जे काही विपरीत परिणाम आहेत. जे बेरोजगारी व तत्सम प्रश्न निर्माण होतील यातून बाहेर पडण्यासाठी एकप्रकारचा 'टास्कफोर्स' नेमावा...

मुंबई: लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले, उद्योगावर अवलंबून असणाऱ्या अनेक नोकऱ्या जातील, देशात बेरोजगारी वाढेल त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही, त्याचा थेट परीणाम भारतीय व्यवस्थेवर होणार होईल. त्यामुळे बेरोजगारी कशी कमी करता येईल आणि तरुणांच्या हाताला काम कसे देता येईल यावार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहीजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

आपण गेले १३ दिवस कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जी खबरदारी पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री असोत यांनी घेण्याच्या सूचना केल्यात त्या आपण पाळुयात व येणाऱ्या काळातही पाळून कोरोनाचा सामना यशस्वीतेने घालवून जिंकतो हा इतिहास करुया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी जनतेशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी 'मित्रो' असे बोलून आपल्या संवादाची सुरुवात केली. आज सर्व सामाजिक स्तर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये असे आवाहन करतानाच टेलिव्हिजनवर बघतो त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत आणि काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ५ मेसेज आले तर त्यापैकी ४ मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज देवून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची काळजी घेतली जात आहे आणि काही वास्तव चित्र पुढे आले त्याबद्दलची पुन्हा पुन्हा मांडणी करून गैरसमज निर्माण करण्याचे कुणाचे आयोजन आहे का? याची शंका निर्माण होत आहे असेही शरद पवार म्हणाले.

दिल्लीतील निजामुद्दीनचा झालेला प्रकार. ते संमेलन होते. खरंतर अशाप्रकारचे संमेलन घ्यायलाच नको होते. या संमेलनाला ज्यांनी कुणी परवानगी दिली असेल ती परवानगी देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात काही ठिकाणी अशाप्रकारचे संमेलन घेण्याबाबतची विनंती धार्मिक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. परंतु राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचार करून परवानगी नाकारली त्यामुळे अशी खबरदारी दिल्लीत घेतली असती तर अशी विचारणाही शरद पवार यांनी केली.

दरम्यान टेलिव्हिजनवर पुन्हा पुन्हा एखाद्या घटकाचं, एखाद्या समाजाचं चित्र वेगळया पध्दतीने मांडण्याचे प्रयत्न करुन त्यातून सांप्रदायिक ज्वर वाढेल की काय अशाप्रकारची परिस्थिती निर्माण केली जातेय ती करण्याची संधी मिळाली नसती असेही शरद पवार यांनी सांगितले. सोलापूर जिल्हयातील एका गावात बैल आणि घोड्याच्या शर्यती ठेवण्यात आल्या होत्या. हजारो लोक यावेळी जमणार होते. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आज सोलापुरात जी तत्परता दाखवली गेली त्यामुळे तिथले प्रकार तिथेच थांबले तसे आज तशी तत्परता जर दिल्लीत दाखवली असती तर आज जे काही घडतंय त घडलं नसतं. आणखी एक गोष्ट जे दिल्लीत घडलं ते रोज टेलिव्हिजनवर दाखवायची गरज आहे का? रोज रोज दाखवून कोणती परिस्थिती निर्माण करू पहातो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे असा सवाल करतानाच यातील जाणकार लोक याबाबतची खबरदारी घेतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

आज खरी गरज काळजी घेण्याची आहे आणि त्यानंतर दोन स्टेजेस फार महत्वाचे आहेत. एक संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर होणारा विपरीत परिणाम व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. या दोन गोष्टींमुळे काही गोष्टी घडतील असे दिसतंय. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे बरेच दिवस उद्योग व व्यवसाय बंद राहिले. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल आणि हे निव्वळ देशाच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या अर्थकारणावर परिणाम करणार आहे असे सांगतानाच रिझर्व्हं बँकेचे माजी गव्हर्नर के राजन यांनी या परिस्थितीनंतर जी संकटं येणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक मोठं संकट हे रोजगार कमी होवून रोजगार बुडण्याचे आहे. हे वाचनात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान या बुडणाऱ्या रोजगाराला तोंड कसं द्यायचं याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, अर्थकारणाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करण्यासाठी काही जाणकार लोकांना आपण बोलवुया. ज्यांनी या सर्व क्षेत्रात काम केले आहे अशा लोकांचा सल्ला घेवूया आणि पुढचे सहा महिने, वर्षभर महाराष्ट्रात कशापध्दतीने पाऊल टाकून कोरोनामुळे अर्थकारणावर जे काही विपरीत परिणाम आहेत. जे बेरोजगारी व तत्सम प्रश्न निर्माण होतील यातून बाहेर कसं पडायचं याची काळजी घेण्यासाठी एकप्रकारचा 'टास्कफोर्स' नेमणं उपयुक्त आहे हे सांगितले.

केंद्रसरकारकडेही काही गोष्टींची अपेक्षा निश्चितपणे केली पाहिजे असे सांगतानाच केंद्र सरकारने या सर्व राज्यांना या अर्थकारणातून बाहेर काढण्यासाठी एक आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. याशिवाय देशातील शेती व्यवसायालासुध्दा एकप्रकारचे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून केली.

आपल्या देशात गव्हाचे प्रमाण उत्तर हिंदुस्थानात जास्त आहे तर तांदळाचे दक्षिणेकडे जास्त आहे. रब्बी हंगाम संपत आला आहे. गहू, तांदूळ अशी पीकं वर आली आहेत. मात्र ही पीकं अजूनही शेतातच आहे. त्यात हरभरा, गहू आहे ही सर्व पीकं वेळीच काढली नाही तर त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर होईल अशी भीती व्यक्त करतानाच पुढच्या दहा बारा दिवसात हा रब्बी हंगाम कशापध्दतीने घ्यायचा याप्रकारचे मार्गदर्शन केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सर्व भाषेत सर्व राज्यात टेलिव्हिजन व अन्य मार्गाने करण्याचा कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे याचा विचार निश्चितपणे केला जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आपण बघतो आहोत की, काही कार्यक्रम आज पुन्हा पुन्हा लोकांना एकत्रित येण्यासाठी कारणं ठरतील की काय आणि ती जर असतील तर त्याची खबरदारी आतापासूनच घेतली पाहिजे. आज महावीर जयंती आहे. महावीरांनी सत्य अहिंसेचा संदेश दिला. माझी खात्री आहे महावीरांबद्दल आस्था असलेला प्रत्येक घटक या कोरोनाचे संकट लक्षात घेऊन महावीरांबद्दलचा आदर आपल्या घरात, कुटुंबातील लोकांना घेऊन व्यक्त केला आहे. अशाप्रकारचा प्रसंग उद्याच्या ८ एप्रिलला येणार आहे. मुस्लिम समाजात कुटुंबातील व्यक्ती हयात नाही त्याचे स्मरण कब्रस्तानमध्ये जावून तिथे नमन करणं यासाठी शब ए बारात सारखा कार्यक्रम राबवला जातो. माझी या सर्व घटकांना आग्रहाची विनंती आहे यावेळची शब ए बारात घरातच थांबून कुटुंबातील हयात नसलेल्या लोकांसाठी स्मरण करावं आपली भावना व्यक्त करा. तर ११ एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा व एकतेचा संदेश दिला. त्यामुळे महात्मा फुले जयंतीच्या दिवशी ज्ञानाचा दिवा लावून 'एक दिवा ज्ञानाचा' याप्रकारचा संदेश या माध्यमातून देण्यासाठी हा अतिशय योग्य दिवस आहे.

तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती जवळपास महिनाभर या ना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते. मात्र यावेळची बाबासाहेबांची जयंती आपण' एक दिवा संविधानासाठी' लावून साजरी करुया मात्र उत्सवाचं स्वरूप येता कामा नये असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

आजचा १३ वा दिवस लॉकडाऊनचा आहे. अजून ८ दिवस काढायचे आहेत. पंतप्रधान यांनी जाहीर केलेला कार्यक्रम त्या पुर्णतेला अवकाश आहे. ज्या काही सूचना व मार्गदर्शन केले आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आज जगातील चित्र आपल्या पेक्षा भयावह आहे. दिवसेंदिवस माहिती मिळतेय त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय असे चित्र आहे. जी काही माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने बाहेर जाहीर केली त्यानुसार आपल्या देशात आज रोजी ४ हजार ६७ केसेस कोरोनाच्या आहेत. यामध्ये ३ हजार ६६६ या केसेस अॅक्टीव्ह आहेत. त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी काळजी प्रामाणिकपणे व कष्टाने घेत आहेत. आतापर्यंतची माहिती मिळते त्यामध्ये ११८ जणांचे देशात मृत्यू झाले आहेत एकंदर कोरोनामुळे आजारी असलेले ३२८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत त्यामुळे ज्या काही सूचना देण्यात आल्या आहेत त्याची पुर्तता कटाक्षाने केली पाहिजे ही आजची गरज आहे असेही आवाहन शरद पवार यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News