...यामुळे दुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग वाढेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  • अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांचे मत 

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर अनेकांना ट्रेकिंगचे वेध लागतात. सह्याद्रीचे सौंदर्य पाहण्याची ओढ निर्माण होते आणि आपोआपच पाय गड-किल्ल्यांकडे वळतात, परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन ट्रेकर आणि पर्यटकांनी पावसाळी भटकंती टाळावी. घरीच बसून सुरक्षित राहावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसताना पावसाळी भटकंती करणे योग्य नाही. त्यामुळे सर्वांनी भटकंतीचे नियोजन स्थगित करा. अजून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, अशा दुर्गम भागांत भटकंती करताना तेथे विषाणू पोहोचण्याची शक्‍यता आहे. पर्यटकांनी दोनतीन महिने पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आदी भागांत जाऊ नये, असे आवाहन गिर्यारोहक महासंघाने केले आहे. ठाणे, पुणे आणि आणखी काही जिल्ह्यांतील पावसाळी भटकंतीला चाप लावण्यात आला आहे. जवळच्या ठिकाणी भटकंतीसाठी गेल्यास स्थानिकांशी संपर्क येणार याची काळजी घ्या. प्राथमिक आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या दुर्गम भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास संकट आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे भटकंती टाळावी, अशी सूचना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी केली आहे.

कोरोनाचे संकट टळल्यानंतर...

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही भटकंती व ट्रेकिंगसाठी गेल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्या वेळीही ग्रामस्थांशी संपर्क टाळावा. स्वतःच्या वस्तू स्वतःसाठीच वापरा. पाणी, खाणे, ताट, वाटी, कप, चमचा सोबत ठेवा. कागदाच्या प्लेटचे वाटप करताना, विल्हेवाट लावताना अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे स्वतःच्या वस्तू वापरण्यावर भर द्यावा, असा सल्ला गिर्यारोहक महासंघाने दिला आहे. ट्रेकला जाताना 15 जणांचा समूह असावा. शक्‍यतो एकमेकांशी परिचय असावा. प्रमुखाला प्रत्येक सदस्याची वैद्यकीय माहिती असणे आवश्‍यक आहे. गरज भासल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र मागवून घ्यावे. शक्‍य झाल्यास ग्रुपमध्ये एखादा डॉक्‍टर असावा. भटकंतीमध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्यास सदस्याने स्वतःहून माघार घ्यावी. गर्दीची ठिकाणे टाळा, कोणाच्याही घरी मुक्कामी थांबू नका. प्रथमोपचाराची पेटी सोबत ठेवा. ग्रामस्थ, प्रशासनाने भटकंतीसाठी आलेल्या प्रत्येकाची नोंद करून ठेवावी, अशा सूचनाही गिर्यारोहक महासंघाने केल्या आहेत.

पावसाळ्यात अगदीच भटकंतीची इच्छा झाली, तर माहिती असलेल्या ठिकाणीच एक दिवसापुरते जावे. अनोळखी स्थळी जाऊ नये. गडाची तटबंदी, कड्यापासून दूर राहावे. पावसाळ्यात अनेक वाटा निसरड्या होतात. त्यामुळे अधिक दक्षता घ्यावी. कोरोनाच्या परिस्थितीत रेस्क्‍यू करणे कठीण आहे. त्यामुळे भटकंती टाळावी.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News