बायको माहेरी गेली आणि

सुचिता गावडे
Monday, 3 June 2019

लग्न झाल्यानंतर बायको माहेरी गेल्यावर पुन्हा बॅचलर लाईफ जगायला मिळणे ही एक सुवर्णसंधी असते. बायको माहेरी गेल्यावर एक वेगळं स्वातंत्र्य मिळते, हे सगळेच नवरे एकमुखाने मान्य करतील. अख्ख्या बेडवर लोळणे यातही एक गंमत असते, कुलरचे तोंड स्वतःकडे ठेवणे, एसी चे तापमान स्वतःसाठी अनुकूल ठेवणे, या गोष्टीही सुखद वाटतात.

लग्न झाल्यानंतर बायको माहेरी गेल्यावर पुन्हा बॅचलर लाईफ जगायला मिळणे ही एक सुवर्णसंधी असते. बायको माहेरी गेल्यावर एक वेगळं स्वातंत्र्य मिळते, हे सगळेच नवरे एकमुखाने मान्य करतील. अख्ख्या बेडवर लोळणे यातही एक गंमत असते, कुलरचे तोंड स्वतःकडे ठेवणे, एसी चे तापमान स्वतःसाठी अनुकूल ठेवणे, या गोष्टीही सुखद वाटतात. ऑफिसला जातांना उठा, लवकर उरकून घ्या, किती वेळ लावताय, ऑफिसची बस जाईल ? ही भुणभुण नसते. जो मिळेल तो ड्रेस चढवून निघता येते, लंच बॉक्स इत्यादी लटांबर नसते.

काल वापरलेले जुने सॉक्स परत वापरता येतात. दाढीच सामान बेसीन वर तसेच ठेवता येते. टॉवेल वैगरे गोष्टी कुठेही फेकल्या तरी तिरपे कटाक्ष नसतात. असे खूप आनंदाचे क्षण साजरे करता येतात. ऑफिसवरून परत घरी येतांना भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे गोष्टी घेऊन येण्याची सक्ती नसते. घरी आल्यावर शूज काढून रॅक मध्ये ठेवायची गरज नसते, सॉक्स चे बोळे असतील तिथे पडून राहिले, तरी काही फरक पडत नाही.

टीव्हीचा रिमोट फक्त स्वतःकडे असणे, ही एक अतीव आनंदाची गोष्ट असते. बातम्या, क्रिकेट, साऊथ व हॉलिवूड चे हिंदी डब सिनेमे विनाअडथळा सलग बघणे हा आनंद तर निव्वळ अफाट. वरच्या परिच्छेदात नमूद केलेले स्वातंत्र्य दोन तीन दिवस यथेच्छ उपभोगल्यावर मात्र खरी परवड सुरू होते. रोज ऑफिसमधून निघतांना अनिवार ओढीने घराकडे निघणारे पाय आपसूक थिबकतात ? घरी जाऊन काय करायचे ?

बायको पोरं माहेरी असले की हसतं खेळतं घर - रुसलेलं असते. रोज घरी आल्यावर पायाला लोबंकळणारी दोन्ही बछडी घरी नसली की, घर खऱ्या अर्थाने अबोल होतं. दोन तीन दिवस उपभोगलेल्या स्वातंत्र्याने घराचा उकिरडा झालेला असतो. जेवणाच्या पार्सलचे कव्हर उरलेलं जेवण, वापरलेले कपडे, बेसिनमध्ये न धुतलेल्या प्लेट्स, बाकी घरभर अस्ताव्यस्त पसरले पेपर, न आवरलेले कपाट अश्या कितीतरी गोष्टी ज्यांच्यामूळे घराला घरपण येत त्या सर्व गोष्टी सापडत नाहीत. बायको म्हणजे काय असते. ही जेव्हा ती घरात नसते तेव्हा कळते. घरात किती काम असू शकते, याची जाणीव बायको घरात नसते तेव्हा नक्कीच होते.

बायको म्हणजे बायको असते.घरातल्या घरात एक गजबलेलं गाव असते. नवरोबांचा जो काही थाट असतो, त्यात बायकोचा महत्वाचा वाटा असतो. घरातील मुलं, आई-वडील, बायको यांसोबत जो टीव्ही बघण्याचा जो आनंद असतो, तो एकटं बघण्यात नसतो. महिलांना मालिका बघायच्या असतात, मुलांना कार्टून - तर पुरुषांना बातम्या क्रिकेट बघायचे असते. ह्या खेळात सगळे थोडे थोडे बघितले जाते. त्यात एक वेगळाच आनंद असतो. रिमोट पळपळवी अन् रिमोट लपविणे हेही सुखद असते. बायको माहेरी जावीच पण जास्तीतजास्त दोन/चार दिवस त्यामुळे दोघांनाही पुरेसा Space मिळतो. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस बायको माहेरी गेली की, घर रुसून बसते. घराला घरपण देणारी फक्त,फक्त आणि फक्त बायकोच असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News