महाराष्ट्रातील केंद्रातून जिम्नॅस्टिक हद्दपार का करण्यात आले ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020
  • महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी यांचा सवाल

औरंगाबाद : जिम्नॅस्टिकच्या प्रत्येक प्रकारात औरंगाबाद आणि पर्यायाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी पदकतालिकेच्या अव्वल तीनमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. असे असताना महाराष्ट्राला नॅशनल सेंटर ऑफ एक्‍सलन्स (एनसीओई) च्या महाराष्ट्रातील केंद्रातून जिम्नॅस्टिक हद्दपार का करण्यात आले, असा सवाल महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी यांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षांत देशभरात झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा, नॅशनल गेम्स, खेलो इंडियासारख्या सर्व स्पर्धांमध्ये औरंगाबादेतील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पदकतालिकेत अव्वल तीनमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रात जिम्नॅस्टिक खोलवर रुजलेला आहे. त्याचे निकालही आता दिसू लागले आहेत. औरंगाबादेत केंद्रात सुमारे तीनशे खेळाडू सराव करतात आणि शहरात हा आकडा दोन हजारांच्या घरात आहे. गत तीन वर्षात येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. औरंगाबादेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढत असताना शहरातील जिम्नॅस्टिक केंद्र बंद करणे, हा येथील जिम्नॅस्ट मंडळींवर अन्याय आहे. निकाल देऊनही आमचे केंद्र बंद का केले जात आहे? याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळालेले नाही. आम्ही यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि स्पोर्ट्‌स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला; पण त्या प्रश्नाचे उत्तर अद्याप आलेले नाही, असे मकरंद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अख्या पश्‍चिम विभागात केंद्र नसणार...

औरंगाबादेतील केंद्र हे पश्‍चिम विभागातील स्पोर्ट्‌स ऑथॉरिटीचे एकमेव जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्र बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे केंद्र बंद झाल्यास अख्ख्या पश्‍चिम विभागात साईचे एकही जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र उरणार नाही. जिम्नॅस्टिक येथील मातीत रुजलेला खेळ आहे. पदकांची आणि खेळाडूंची संख्या आणि उपलब्ध सुविधा पाहता सध्या औरंगाबाद 'साई'चे केंद्र सुरू रहावेच; पण नॅशनल सेंटर ऑफ एक्‍सलन्ससुद्धा औरंगाबादेत जिम्नॅस्टिक देण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे आशियाई जिम्नॅस्टिक युनियन (एरोबिक जिम्नॅस्टिक) चे तांत्रिक समिती सदस्य असलेले डॉ. मकरंद जोशी म्हणाले.

निकालांवर आधारित खेळांचा समावेश व्हावा: उपसंचालक

औरंगाबादेतील 'साई'मध्ये एनसीओईमध्ये सहा खेळ आता आहेत. यात ऑथलेटिक्‍स, तिरंदाजी, तलवारबाजी, हॉकी, बॉक्‍सिंग आणि वेटलिफ्टिंगचा समावेश आहे. या केंद्रातून आता हॅण्डबॉल, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, जुडो, फुटबॉल,व्हॉलीबॉल, कबड्डीसारखे खेळ वगळण्यात आले आहेत. आमच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे की आत्तापर्यंतचे यश, गुणवत्ता, असलेल्या सुविधा यावर आधारित एक-दोन खेळांचा समावेश करावा, असे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News