'चांद्रयान २' साठी २२ जुलै हाच मुहूर्त का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019
  • पहिले पाऊल चंद्रावर पडून ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच दरम्यान भारताच्या ‘चांद्रयान २’च्या उड्डाणाची नवीन तारीख जाहीर झाली आहे.
  • उड्डाणासाठी ५६ मिनिटे बाकी असताना ही मोहीम स्थगित करण्यात आली. आता २२ जुलै रोजी चांद्रयान २ आकाशात झेपावणार आहे.

पहिले पाऊल चंद्रावर पडून ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच दरम्यान भारताच्या ‘चांद्रयान २’च्या उड्डाणाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निमित्ताने चंद्राचे अनेक नवीन पैलू मानवापुढे येतील. या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुरेश नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

आपले ‘चांद्रयान २’ हे १५ जुलैला अवकाशात झेपावणार होते. पण, उड्डाणासाठी ५६ मिनिटे बाकी असताना ही मोहीम स्थगित करण्यात आली. आता २२ जुलै रोजी चांद्रयान २ आकाशात झेपावणार आहे.

पण, २२ जुलै ही तारीख निश्‍चित केली नसती तर मात्र आपल्याला सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली असती. चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर हे त्यामागचे एक कारण आहे. हे अंतर सतत कमी- जास्त होत असते. हे अंतर जास्त असेल तर त्यासाठी इंधनाची गरज वाढते. दुसरे कारण, चंद्रावर सोडण्यात येणारा ‘रोव्हर’ चौदा दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणे आवश्‍यक आहे. तो सौरऊर्जेवर काम करतो. त्यामुळे २२ जुलै ही तारीख चुकली असती, तर सप्टेंबरपर्यंत परत तशी ‘विंडो’ मिळाली नसती.

अग्निबाणाच्या दोन बाजूचे बूस्टर हे सॉलिड स्टेजचे असतात. मधली स्टेज असते, त्यात द्रवरूप इंधन असते. त्याच्या वरचा तिसरा टप्पा हा क्रायोजिनक आहे. या क्रायोजिनक स्टेजमध्ये दोन टाक्‍या आहेत. एक टाकी आहे ती द्रवरूप ऑक्‍सिजनची, तर दुसऱ्या टाकीत द्रवरूप हायड्रोजन असतो. द्रवरूप हायड्रोजन हे इंधन आहे. द्रवरूप ऑक्‍सिजन हे ‘ऑक्‍सिडायजर’ आहे. या दोघांच्या ज्वलनाने अतिशय ‘हॉट गॅसेस’ तयार होतात. ते अग्निबाणाच्या मागच्या नळकांड्यातून वेगाने बाहेर पडतात. त्यातून प्रक्षेपकाचे उड्डाण होते. यासाठी क्रायोजेनिक इंजिन वापरतात. 

‘चांद्रयान २’च्या मोहिमेसाठी दोन्ही टाक्‍यांमध्ये द्रवरूप इंधन भरण्यात आले. या द्रवरूप इंधनाचे वहन होण्यासाठी त्यावर हेलियम गॅस भरला जातो. त्याच वेळी अग्निबाणातील इंधनगळती लक्षात आली, त्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. अशीच समस्या ‘चांद्रयान १’ उड्डाणाच्या वेळी दोन तास आधी लक्षात आली होती. पण, त्या वेळी तातडीने दुरुस्ती करून ठरलेल्या वेळी उड्डाण झाले. परंतु या वेळी मोहिमेची व्याप्ती मोठी आहे. या वेळी अग्निबाण मोठा आहे, त्यामुळे कोणताही धोका न पत्करता त्यांनी ही मोहीम स्थगित केली. त्यातील दोष दूर केले आणि आता २२ जुलै ही उड्डाणाची तारीख निश्‍चित केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News