मुलं आक्रमक का होतात?

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Saturday, 1 June 2019

मुलं एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे, आपल्या मनासारखी झालीच पाहिजे यासाठी आक्रमक होतात किंवा मग दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी.

खरं तर प्रत्येक मुलात (प्रत्येक माणसात) काही प्रमाणात आक्रमकता असतेच... पण ती प्रमाणातच असावी लागते. ठामपणा आणि आक्रमकता यात फरक असतो. कुणी खेळणं घेतलं तर ‘हे माझं खेळणं आहे, तू घ्यायचं नाहीस,’ हा ठामपणा झाला. पण त्याला मारून त्याच्या हातातून ते हिसकावून घेणं हा आक्रमकपणा झाला.

मुलं एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे, आपल्या मनासारखी झालीच पाहिजे यासाठी आक्रमक होतात किंवा मग दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी. आक्रमक होण्यामागं अर्थातच राग ही भावना प्रकर्षानं असते. रागाचं निराकरण करणं जमलं नाही, तर त्याचं रूपांतर आक्रमकतेत होतं. मुलांच्या मनात हा राग कुठून येतो?

आक्रमण आक्रमकतेचं या लेखात मीना शिलेदार यांनी यामागची काही महत्त्वाची कारणं दिली आहेत, ती अशी.
चिंता व भीती या दोन्ही भावनांच्या मिश्रणातून आक्रमकता येऊ शकते.

विफलता ः मुलं वयानुसार वेगवेगळ्या (काही वेळा अगदी छोट्या छोट्या) कारणांनीही नाउमेद होत असतात. एखादी गोष्ट करता येत नाही, जमत नाही म्हणून किंवा मनातलं बोलून दाखवता येत नाही म्हणून.

नाकारलं जाण्याची भावना ः पालक मुलांना पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत, तर आपण दुर्लक्षित झाल्याची भावना येते - ती तीव्र झाली तर आक्रमकता वाढते.

अनुकरण ः पालक आक्रमक असतील तर अनुकरणानं मुलंही आक्रमक होतात. वडील व्यसनी असतील, आक्रस्ताळे असतील तर तसंच शाळेतले शिक्षक आक्रमक असल्यास.

अतिस्वातंत्र्य ः लहान भावाला मारणं, वस्तू फेकणं/फोडणं अशा कृतींकडे पालक दुर्लक्ष करत असतील तर.

कठोर पालक ः मुलाला पट्ट्यानं मारणं, चटके देणं अशा शिक्षा मुलांना दिल्या गेल्यास मुलं तशाच प्रकारे इतरांशी वागू शकतात.

माध्यम प्रभाव ः मुलांना दूरदर्शन वा चित्रपटातील दृश्‍यं व खरंखुरं जीवन यामध्ये भेद न करता आल्यानं तीही तसं वागू/बोलू पाहतात.

असुरक्षितता ः लहान भावंड आल्यावर मोठ्याकडं दुर्लक्ष झालं तर ते भावंड एकटं सापडेल तेव्हा तो आक्रमक होऊ शकतो. काही वेळा दुसरं भावंड अधिक हुशार असल्यास ईर्षा उत्पन्न होऊन.

पालकांचे अतिलाड ः अतिलाडामुळं मुलाच्या मागण्या वाढत जातात. नंतर मनाविरुद्ध गोष्ट घडली की मूल आक्रमक होऊ पाहतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News