बॉलिवूड व ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा ‘क्वीन’ का परत गेली ?
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाल्यापासून रोज नवीन गोष्टी उघडकीस येत आहेत. त्यामध्ये रिया चक्रवर्ती हिच्यावरती सुशांतच्या कुटुंबियांनी पैसे हडपल्याचा आरोप केला. त्यानंतर बिहार पोलिस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले. बिहार पोलिसांना मुंबई पोलिस मदत करत नसल्याचा आरोप बिहारच्या राजकारण्यांनी मुंबई पोलिसांवरती केला. काहीनी बिहारमध्ये निवडणुका होणार असल्याने हे प्रकरण अधिक उचलून धरल्याचं म्हटलं. त्यात कंगनाने बॉलिवूडसह अनेकांवरती आरोप केले. कंगनाने महाराष्ट्र राज्य सरकारसहीत मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांवरती आरोप केले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तिच्या बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडलं. त्यावर तिने राज्यपालांची भेट घेतली या सगळ्या घडामोडी घडल्या.
त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राला वाटेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी चांगल्याच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडमध्ये चालणार ड्रग्ज कनेक्शन याबाबत सुध्दा माझ्याकडे माहिती असल्याची कंगना जाहीरपणे बोलली होती. त्याचबरोबर कंगनाने ठाकरे सरकारला महाराष्ट्रात येऊन आव्हान देण्याची भाषा सुध्दा केली होती. मात्र ड्रग संदर्भातली कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच ती परत का गेली? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
बॉलिवूडमधल्या ड्रग माफियाची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड होताच एनसीबी या प्रकरणीची कसून चौकशी करीत होते. त्यावेळी कंगनाने संपुर्ण माहिती पोलिसांना द्यायला हवी होती. परंतु तिने माहिती न देताच मुंबई पोलिसांनी नाहक बदनामी केली. परंतु मुंबई आलेल्या कंगनाने ही माहिती पोलिसांना का दिली नाही यावर सचिन सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
एखाद्या गुन्ह्याची माहिती असताना ते लपवणे हा खूप मोठा गुन्हा आहे. हे सगळं कंगनाला माहित असताना सुध्दा तीने परत हिमाचल प्रदेश गाठलं. यातून कंगनाची नौटंकी दिसून आली आहे. तसेच मुंबईत येऊन तमाशा करून परत गेली असे म्हणायला हरकत नाही असेही सावंत म्हणाले.
कंगनाकडे बॉलिवूडमधील अनेक प्रकरणाची माहिती आहे, पण ती माहिती उघड होऊ नये यासाठी तिला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचा अपमान कंगनाने केला, तसेच मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी केला आणि मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. तिच्या माहिती होती, तर तिने पोलिसांना द्यायला हवी होती. भाजप महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.