अभियांत्रिकी क्षेत्र का निवडाव? विद्यार्थी म्हणतात...

स्वप्नील भालेराव
Wednesday, 16 September 2020

जगातील टॉप 10 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भारतीय वंशाचे आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे.

मुंबई : जगभर अभियांत्रिकी क्षेत्राला स्कोप आहे. त्यामुळे तरुणाईचा कल इंजिनिअरींग क्षेत्र निवडण्याकडे आहे. जगातील टॉप 10 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भारतीय वंशाचे आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे असे भाकीत ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वाटर्समन यांनी केले. तरुणांनी अभियांत्रिकी क्षेत्र का निवडावे? याविषयी इंजिनिअर्सनी महत्त्व सांगितले.

बळीराजाच्या वावराला यंत्राची पावर देणारा आणि स्वप्नातल्या घराला वास्तविक इमारतीची जोड देणारा अभियंता आज अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे चाक बनला आहे. स्मार्ट फोन कडून स्मार्ट शहराकडे होणारा प्रवास असो वा द्रुतगती मार्गाची निर्मिती करून विस्तारलेल्या जगाला आणखी जवळ आणण्याचे काम अभियंता नेटाने करतो आहे. मूलभूत गरजेपैकी निवारा हा आजही अभियंताच पुरवतो, म्हणूनच की काय सजिवांचा इंजीनियर ते निर्जीवांचा डॉक्टर ही ओळख येथे सार्थ ठरते.
- विशाख कऱ्हाळे, स्थापत्य अभियंता

परिवर्तन हा जरी जगाचा आणि  निसर्गाचा मूलभूत सिद्धांत असला तरी हे आपोआप किंवा सहजरीत्या घडत नसतं, तो बदल घडवून आणण्यामागे अनेक अदृश्य हात असतात, आणि त्यातील अतिशय महत्वाचा मोलाचा हात असतो तो अभियंत्याचा. जगात अनेक टप्प्यांवर दशकानुदशके अनेक समस्या उद्भवल्या पण त्याला समर्थपणे तोंड देण्याची धमक वेळोवेळी अभियंत्यांनी दाखविली व पुन्हा एकदा जगाचा संसार सुरळीत केला, आज संपूर्ण जग कोव्हीड 19 विषाणूमुळे ग्रासलेला असताना नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावत आहे. अभियांत्रिकीच शिक्षण घेताना आयुष्याला नवा आयाम मिळवणाऱ्या प्रत्येक अभियंत्याला अभियांत्रिकी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- धनंजय रामराव बोबडे, यंत्र अभियंता

साधारण एका वर्षापूर्वी, अभियंता दिनाच्या दिवशी एका मित्राने "बेरोजगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असा मजकूर त्याचा सोशल मीडिया वर टाकला, मला त्याच्या या विचारसरणीने विचार करायला भाग पाडलं. खरंच आम्ही अभियंते इतके कमी आहोत का? मुलाला जन्म आई देते. ती आपल्या मुलाला जगात येण्या अगोदर पासून ९ महिने ओळखत असते. बाहेरच्या जगात आल्यावर, वडील, नातेवाईक, मित्र, सहकारी, परिवार त्याला घडवत असतो. पण आईलाच फक्त त्या मुलाच्या सर्व गोष्टी ठाऊक असतात. तसेच असते इंजिनिअर हा आपल्या प्रोजेक्टला मुला सारखा जपतो आणि त्याला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो. बाकीचे राहिलेले लोक मग नातेवाईक मित्रमंडळी या मध्ये मोडतात. इंजिनिअर नोकरी मिळवू पण शकतो आणि देऊ पण शकतो. म्हणून या वर्षीचा अभियंता दिवस "बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" अस म्हणत साजरा करण्यास काही हरकत नाही अस मला वाटते.
- महेश दशरथ दळवी, यंत्र अभियंता.

अभियांत्रिकी क्षेत्र जीवनाच्या प्रत्येक क्षणी, चालता-बोलता, प्रत्येक गोष्ट अनुभवायला, गरज पडली तर संशोधन करायला प्रवृत्त करते आणि तंत्रज्ञानामार्फत जगाच्या उद्धाराची भूमिका समर्थ बजावायला भाग पाडते, समस्या कुठलीही असो, आपल्या सर्जनशील कौशल्याने त्यावर अचूक तोडगा काढताना अभियंता आपल्याला अनेक टप्प्यांवर दिसतो, प्रत्येकाच जगणं सुखकर करून, जगाला दिशा दाखविणाऱ्या अभियंत्यांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
- योगेश्वर महादेव ढेपे, विद्युत अभियंता

प्रत्येक देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे ‘अभियंता दिन’ व्यापकार्थाने व परीपूर्ण पद्धतीने साजरा होण्याची आज आवश्यकता आहे. अभियांत्रिकी क्षेत्र हे खर्‍या अर्थाने सर्वव्याप्त क्षेत्र आहे. जगातील प्रत्येकजण या क्षेत्राशी निगडित आहे, त्यामुळे प्रत्येकानेच हा संकल्प घेण्यास हरकत नाही की, संशोधन आणि इनोव्हेशन यात स्वतःला गुंतवून घ्यावे, शालेय जीवनातच याची सुरुवात झाली, तर जपान आणि चिन या देशांसारखी आपली देखील आर्थिक स्वयंसिद्धता आणि समृद्धी विकासाचे पुढील शाश्वतमार्ग मोकळे करत जातील. सर विश्वेश्वरैय्या यांचे सश्रद्ध संस्मरण अर्थपूर्ण करण्याचा संकल्प यापेक्षा उत्तम राहू शकणार नाही. 
- विवेक पवार पाटील, इलेक्ट्रॉनिक्स 

आपली आई आपल्या शर्टला ज्या सुईने बटण लावते त्या सुई-बटण पासून ते विमानापर्यंत सगळ्या वस्तू  इंजिनिर्स शिवाय बनुच शकत नाहीत. इंजिनिर्स हे कोणत्याही क्षेत्रात नाव गाजवू शकतात, उद्योग, राजकारण, खेळ, गायन, लेखन, अभिनय किंवा नागरी सेवा अश्या प्रत्येक क्षेत्रात इंजिनिर्स नाव गाजवत आहेत आणि या सर्व गोष्टींचा आपल्या अभिमान असायला हवा. मित्रांनो इंजिनिर्स झाल्यानंतर काही नाही तर एक समाजात चांगला माणूस म्हणून तरी आपण बाहेर पडू शकतो, एक चांगलं जीवन जगण्याची कला तरी आपल्याला प्राप्त होऊ शकते.
- मच्छिंद्र भागीनाथ जेठे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News