... या परीक्षांवरून पुन्हा वाद का सुरू आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा या रद्द करण्याच निर्णय घेतला आहे तर काही परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यावरून अनेक वाद होत आहेत. 

नवी दिल्ली :- कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा या रद्द करण्याच निर्णय घेतला आहे तर काही परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून अनेक वाद होत आहेत.  IIT आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या या परीक्षा मे महिन्यात होणार होत्या. आधी त्या जुलैपर्यंत आणि मग सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र इतक्यात ही परीक्षा होऊ नये, अशी काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.

पण वेळापत्रकात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात नकार दिला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मागणे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. तर काही विद्यार्थ्यांनी या परीक्षा ठरल्या वेळेतच व्हाव्यात, पण सोशल डिस्टंसिंग पाळले जाईल याची खात्री द्यावी असं मत मांडले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय नेते मंडळींनी उचलून धरली असून त्यात राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि सुब्रमण्यम स्वामी तसंच आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. हे सगळं प्रकरण नेमके काय आहे? त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांची मतं काय आहेत? हे आम्ही जाणून घेतले.

JEE आणि NEET परीक्षा काय आहेत?

JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE-Mains आणि JEE-Advanced अशी दोन टप्प्यांत होणारी ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्येही या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.

तर NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. यंदा साधारण सोळा लाख विद्यार्थ्यांनी NEET साठी अर्ज केले असून, JEE-mains परीक्षेसाठी नऊ ते दहा लाख विद्यार्थांनी नाव नोंदवलं आहे. एप्रिल-मे महिन्यांत या परीक्षा होणार होत्या. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोनदा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.

सध्याच्या वेळापत्रकानुसार JEE-mains परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार असून, JEE-Advanced परीक्षा 27 सप्टेंबरला होणार आहे. तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला घेतली जाईल.

परीक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये दुमत

देशभरात अनेक ठिकाणी कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढत असताना परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही, असं अनेक विद्यार्थी आणि पालकांना वाटतंय. तर अनेकजण आता ठरल्याप्रमाणे एकदाची परीक्षा घेऊन टाका, असंही म्हणतायत. पुण्यात राहणारा आकाश सावंत, NEET साठी तयारी करतो आहे. त्यानं गेल्या वर्षी ड्रॉप घेतला होता, आणि आता परीक्षा झाली नाही, तर हेही वर्ष जाईल अशी शक्यता त्याला वाटते. आकाश सांगतो, "माझ्यासारखी अनेक मुलं आहेत, काहीजण पहिल्यांदाच ही परीक्षा देणार आहेत. आम्हाला वाटतं जुलैतच परीक्षा झाली असती तर बरं असतं. आता किमान तेरा सप्टेंबरला तरी ती व्हावी असं मला वाटतं. कारण परीक्षा जितकी लांबेल तितका तणाव वाढतो आणि अभ्यासावरही परिणाम होतो."

श्रीरामपूरचे डॉ. भूषण देव हे बालरोगतज्ज्ञ असून त्यांचा मुलगा अथर्व NEET साठी तयारी करतोय. सरकारनं आता परीक्षा घ्यायलाच हव्यात असं त्यांना वाटतं. "एक पालक म्हणून मला वाटतं, की परीक्षेला फार उशीर झाला, तर पुढच्या प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होत जाईल. बालरोगतज्ज्ञ म्हणून मला मुलांच्या मानसिकतेचीही चिंता वाटते. मुलं आता कंटाळली आहेत. परीक्षा होणार, नाही होणार याविषयी जास्त काळ मुलांना धाकधूक वाटत राहणार नाही, याची काळजी सरकारनं घ्यायला हवी."

'कोव्हिडसह जगावं लागेल' असं सरकारनेच म्हटलं असल्याची आठवण ते करून देतात. "कोव्हिडचं संकट कधी संपेल याची खात्री नाही, आपल्याला त्याच्यासोबत जगायचं तर तशी तयारी सरकारनंही करायला हवी. आता एसटी बसेसही सुरू झाल्या आहेत, त्यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसं पोहोचायचं, हा प्रश्नही येऊ नये. व्यवस्थित काळजी घेतली, तर तीन तासांसाठी केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यात काही अडचण येणार नाही," असं ते म्हणतात. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या प्रशांत कुमार मिश्रा याला मात्र परीक्षा केंद्रापर्यंत आपण कसं पोहोचणार अशी काळजी वाटते. प्रशांत सांगतो, "माझं परीक्षाकेंद्र प्रयागराज शहरात आहे आणि मी तिथून पन्नास किलोमीटरवर माझ्या गावी आलो आहे. मी सुरक्षित प्रवास करू शकेन, अशी कुठलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, माझ्याकडे वाहनही नाही. असे अनेक विद्यार्थी आहेत. आम्ही परीक्षा कशी द्यायची? प्रयागराजच्या केंद्रात जास्त विद्यार्थी येतात, तिथे संसर्गाचा धोकाही मोठा आहे असं मला वाटतं."

सोशल डिस्टंसिंग पाळता यावं यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी परीक्षा केंद्र असायला हवीत, असं प्रशांत सांगतो. तर बिहारच्या प्रियांशूला परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंग अशक्य आहे असं वाटतं. तो म्हणतो, "परीक्षेसाठी नियम तर केले आहेत, पण ते पाळले जातील का? मी काही दिवसांपूर्वीच COMEDK ही परीक्षा दिली होती, त्यावेळी परीक्षा केंद्रावर गर्दी उसळली होती. मास्क आणि ग्लव्ह्ज घालून, कोंदट हवेत तीन तास बसून लिहिणं हे कठीण जातं. त्याचा परिणाम आमच्या परीक्षेतील कामगिरीवरही होऊ शकतो." परीक्षा घ्यायचीच असेल तर नियम पाळले जातील याची शासनानं ग्वाही द्यायला हवी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

राजकीय प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या या मागण्या समोर आल्यावर नेतेमंडळींनीही त्याविषयी आपली भूमिका समोर मांडली आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सर्वच परीक्षांवर विचार व्हायला हवा आणि पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.

"जगभरात जिथे जिथे शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तिथे कोरोनाचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं आहे. विविध परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. माझी नम्र विनंती आहे की, शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलावेत. आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावं, म्हणजे, कुणीही विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार नाही", असं आदित्य ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.

 

 

 

काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, "आज लाखो विद्यार्थी काहीतरी सांगत आहेत. सरकारनं NEET, JEE परीक्षांविषयी विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकायला हवी आणि यातून मार्ग काढायला हवा."

 

 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ही परीक्षा सुरक्षित वातावरण निर्माण होईपर्यंत पुढे ढकलली जावी असं म्हटलं आहे.

 

 

 

तर भाजपचेच खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामीही परीक्षा पुढे ढकलावी, या मताचे आहेत. "मी शिक्षण मंत्र्यांसी बोललो असून NEET आणि बाकीच्या परीक्षा दिवाळीनंतर घ्याव्यात असा सल्ला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा कधी घ्यावी हे सरकारवर सोपवलं आहे. मी आत्ताच पंतप्रधानांना पत्र पाठवत आहे," असं ते शुक्रवारी ट्विटरवर म्हणाले होते.

 

 

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मात्र यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News