बेरोजगार वाढीला जबाबदार कोण ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत
  • तरुणांची क्रियाशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही

मुंबई : संपुर्ण जगात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. तरुणांची क्रियाशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढतोय. 'या बेरोजगार वाढीला जबाबदार कोण? सरकार, शिक्षण व्यवस्था की तरुणाई' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक गृपमध्ये आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

बेरोजगारीला सरकार आणि चुकीची शिक्षण पद्धत जबाबदारी आहे. सरकारने शिक्षण पद्धतीकडे लक्ष नाही दिले. आणि आमच्या देशातील शिक्षण हे फक्त प्रमाणपत्रातील गुणांवर लक्ष देते. मुलांकडे कोणता गुण चांगला आहे याकडे लक्ष दिले जात नाही. दहावी पास करून विद्यार्थी इमारत ठेकेदार होतो. असे अनेक इमारतचे ठेकेदार आहेत ज्यांना सिविल इंजिनीअरची गरज नाही. त्यांना त्याबद्दल पूर्ण ज्ञान असते, पण आपल्या देशातील शिक्षण पद्धतीमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं.
- दौलत कणबरकर

बेरोजगारीला कोणी एक जबादार नाही. देशातील लोकसंख्या वाढीमुळे कदाचित बेरोजगारी वाढली असेल असे अनेकांना वाटेल हे कितपत योग्य आहे? भारताच्या तुलनेत  चीनची लोकसंख्या अधिक आहे.  भारतप्रमाणे बेरोजगारी दर चीनमध्ये आढळत नाही? कारण आपल्याकडे आई वडिलांच्या जीवावर जगणे, स्वकर्तुत्व सिद्ध करण्यात कचुराई करतात. आईवडील सुद्धा मुलाला/ मुलीला करेल आज नाही उद्या या शब्दांनी लाड करतात. एवढंच नव्हे  तर काही मंडळी अक्षरश: मुलाला  बजावून सांगत की तुला या क्षेत्रात एवढे मार्क मिळायला पाहिजे मग काहीही होओ.  मुलाला आवड नसताना त्या क्षेत्राकडे वळवतात. याचा परिमाण म्हणजे आवड  नसताना क्षेत्राकडे वळल्यावर उरत फक्त अपयश. ज्याला आपण  बेरोजगारी अस गोंडस नाव सुचवलेलं आहे. पाल्यांना नोकरी पाहिजे तर सरकारीचं अस म्हटल्या जाते आणि समाज सरकारीच क्षेत्रात असण्याऱ्या युवकांना पसंदी दर्शवतात!  एकंदरीत सर्वानाच कोणतं न कोणत काम करावंच लागत. त्यामुळे प्रत्येक कामाकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलल पाहिजे. 

संतांच्या दोन ओळी मला इथे नमुद कराव्य वाटतात. 
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जण व्हावे लहानाहूनी लहान 

कामाची लाज न बाळगता ज्याला त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे काम केलं पाहिजे, जेवढ मोठं काम असेल तेवढ्याच त्या कामासाठी यातना सोसाच्या लागतात. म्हणून लहान बना व बिनधास्त जीवन जगा. लोकसंख्येचा विचार करता  शासनाला दोष देऊन चालणार नाही,  कामाची कमतरता या देशात नाही तर युवकाच्या अंगी त्या कामाची जबाबदारी पेलण्यातची कुवत नाही. थोडा साधा दृष्टिकोन अंगी बाळगा बेरोजगारीची समस्या टाळता येता येईल? 
- कपिल राठोड

चुकीची शिक्षण पद्धती हे कारण ठरेल असं मला वाटतं. कारण बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर प्रॅक्टिकल शिक्षण जास्त दिलं जातं आणि गोष्टी पाठ करून लक्षात ठेवण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात ठेवायला शिकवल्या जातात.
- साक्षी साळुंखे

बेरोजगारीची ही समस्या खूप वर्षांपासून भेडसावत आहे. खरंतर काहीही झालं तरी त्याचा दोष आपण सरकारला देतो, काही प्रमाणात हे योग्यही आहे. परंतु आपणही या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहोत असं मला वाटतं. कारण हे सरकार आपण दिलेल्या आपल्या बहुमूल्य मतानेच निवडून आलं आहे. तर मग आपणच जन्माला घातलेल्या मुलाने चूक केली तरी त्याला बहुतांशी आपणच कारणीभूत नाही का? आता राहिला प्रश्न बेरोजगारीचा किंवा शिक्षण पद्धती आणि यंत्रणेमध्ये चूक कोणाची याबद्दल विचार करण्याचा? तर किती दिवस आपण आपल्या अपयशाचा दोष इतरांना द्यायचा त्यापेक्षा स्वतःच त्यातून मार्ग काढायला हवा. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून आत्मविश्वास गमावून बसण्यापेक्षा व्यवसायाच्या दिशेने एक पाऊल टाकायला काय हरकत आहे? कारण तरुणांमध्ये मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाची कमी नसते आणि एक यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. असं माझं वैयक्तिक मत आहे. संधी मागून मिळत नाही तर ती शोधावी लागते. अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही.
- नागेंद्र स्वामी

बेरोजगारीच्या समस्येला जितके सरकार जबाबदार आहे, तितकीच ती व्यक्ती जबाबदार असते. शाळेत कोणताही विद्यार्थी नापास झाला किंवा त्याला कमी पडले तर शाळेवर पालक किंवा अन्य कोणी कोणताही मोर्चा काढताना दिसत नाही. परंतु इतर प्रत्येक गोष्टीत मोर्चाचं चित्र दिसतं. बेरोजगारी वाढण्यात शिक्षण कारणीभूत आहे.
- महेश घोलप 

शासनाची धोरण बेरोजगारीला कारणीभूत आहेत. शिवाय आजची शिक्षण पद्धतीही त्याला कारणीभूत आहे. पुस्तकी ज्ञानाचा व्यवसायात फारसा उपयोग होत नाही. आता पर्यंत शासनाने शिक्षणाबाबत जी धोरणे राबवली ती धोरणे युवकांना स्वतःच्या पायावर उभी करू शकली नाहीत. सहकार क्षेत्रात तर नवीन रोजगार बंदी आहे. युवकाने घरच्या शेतीत लक्ष घालावे पण मुळात शेतीतच काही निघत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या युवकांना शेतातील मातीत हात घालायला लाज वाटत आहे. आणि त्यामुळं आजचा बेरोजगार तरुण कुटुंब व्यवस्थेला भार झाली आहेत. 
- प्रदिप अडसुळे 

बेरोजगारीला सरकार आणि शिक्षण पद्धती दोन्ही जबाबदार आहे. त्याच बरोबर आपण स्वतः देखील जबाबदार आहोत. सरकार जबाबदार आहे कारण इतर देशात शिक्षण पद्धती प्रगत आहे पण आपल्याकडे तशी शिक्षण पद्धत उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण पद्धतीचा विचार केला तर त्यात फक्त मुलांना शिकवले जाते. त्यानंतर त्याच्या परीक्षा घेऊन त्याची गुणवत्ता ठरवली जाते. पण या सर्व सोबत मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान दिले जात नाही. एवढेच नाही तर मुलांकडे कोणते कौशल्य आहे याचा देखील विचार करत नाहीत. या दुनियेत निभाव लागायचा असेल तर नुसते अभ्यासी किडा असून चालत नाही. काही गोष्टी प्रात्यक्षिक असणे देखील गरजेचे आहे. जेव्हा विद्यार्थी पदवीधर किंवा उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या  शोधात बाहेर पडतात. तेव्हा त्यांना त्याचा अनुभाव विचारला जातो आणि अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नाही. काही मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच चांगल्या पगाराची आणि चांगल्या पदांची अपेक्षा आणि ते आताच्या परिस्थिती शक्य नाही. त्यांना असे वाटते की, मी एवढे शिक्षण घेऊन फक्त एवढाच पगार का घेऊ म्हणून ते त्या नोकरीला नाही बोलतात. दुसरीकडे नोकरीच्या शोधात वेळ घालवतात. म्हणून मला असे वाटते की, जेवढे सरकार आणि शिक्षण प्रणाली आपल्या बेरोजगारीला जबाबदार आहे तेवढे आपण स्वत: देखील जबाबदार आहे.
- रसिका जाधव

देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे, त्याला सरकार, शिक्षण व्यवस्था आणि तरूणाई कमी अधिक प्रमाणात जबाबदार आहे. देशात रोजगार निर्मितीसाठी सरकार ठोस पावले उचलत नाही. शालेय अभ्यासक्रमात कोवशल्य प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी फक्त उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळवत आहेत. या पदव्यांवर रोजगार मिळणे कठीण झाले.  उच्च शिक्षित तरुणांना हातावाचे व्यवसाय आणि शेती करायला कमीपणा वाटतो. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढत आहे.
- स्वप्नील भालेराव

बेरोजगारीला जबाबदार सरकारची ध्येय धोरणे, यंत्रणा आणि या देशाची चुकीची शिक्षण पद्धती आहे, पण त्याहीपेक्षा दुप्पट आपण स्वतः त्याला जास्त जबाबदार आहोत. कारण  इतर देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिसत नाही. मग भारत देशामध्ये बेरोगरीचे प्रमाण का आढळते, त्याला इथला पालकवर्ग मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. तरुणांचे संपूर्ण निर्णय, कोणतं शिक्षण घ्यायचे, त्याच्या मार्कशीट वरचे गुण, त्याच भविष्य, हे सगळे पालकच ठरवतात. आपल्या मुलाची आवड  कोणत्या क्षेत्रात आहे याचा विचार केला जात नाही. तर शेजारच्या मुलाने हे केलं म्हणून तूलाही तेच करायचं, या अट्टाहासामुळे आणि मुख्य म्हणजे मुलांच्या प्रॅक्टिल कलेपेक्षा शैक्षणिक कागदार असलेले गुण पालकाला जास्त महत्वाचे असतात. आपल्याकडे १०वी, १२वी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध असूनही बहुतेक विद्यार्थ्यांचा कल हा एकाच क्षेत्राकडे जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि म्हणूनच प्रत्येकाला नोकरी मिळणे कठीण झाले आहे. छोटे छोटे व्यवसाय करून सुद्धा चार पैसे कमवता येतात पण आम्हाला चांगल्या पैशाची नोकरी मिळेल ही आस धरून बसतात. त्यामुळेच बेरोजगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे असे मला वाटते.
-शिल्पा नरवडे

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने नुकताच एक अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये त्यांनी अस सांगितलं आहे की, लॉकडाऊन करण्यापूर्वी भारतात 7 टक्के बेरोजगारीचे प्रमाण होते जे लॉकडाऊन झाल्यावर 27 टक्क्यापर्यंत वाढले. राज्याची स्थिती पहिली तर हे प्रणाम 20 टक्के एवढं आहे. हे प्रमाण वाढण्याच नेमकं करण काय तर, बंद पडलेला आर्थिक व्यवहार ज्यामुळे कामगारांना पगार देणे शक्य होत नाही. यामुळे व्यापारी वर्ग कामगार कपातीकडे वळतो आहे. त्यामुळे बेरोजगारीची आकडेवारी दिवसागणित वाढत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या वर्षी लघु तसेच मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी 20 लाख कोटी एवढा निधी जाहीर केला आहे. ज्याच्या लाभ तरुण वर्गाने घेतला पाहिजे. त्याचबरोबर जोपर्यंत तरुण वर्ग स्वतः पुढाकाराने व्यवसायात गुंतत नाही आणि कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा कोणाला तरी हाताखाली काम करण्याची मानसिकता दर्शवत नाही. तोपर्यंत कामगार आणि बेरोजगारी हे चक्र असंच सुरू राहील.
- विनायक पाटील.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News