ऐसा क्या है उसमें, जो मुझमें नहीं है...  

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Saturday, 19 September 2020
  • ऐसा क्या है उसमें जो मुझमें नही है... हा डायलॉग चक दे इंडियाच्या आधीपासून ते आजपर्यंत अनेक फिल्म्समध्ये या ना त्या स्वरुपात हमखास ऐकायला मिळतो... सौंदर्याच्या बाबतीत म्हणा नाही तर बुद्धिमत्तेच्या, फॅशनेबल कपड्यांपासून ते गाडी, मोबाईलपर्यंत, एकीकडे कोणीतरी हिरॉईन किंवा बिनधास्त गर्ल आणि दुसरीकडे साधी भोळी मुलगी अशी ही तुलना ठरलेलीच...

ऐसा क्या है उसमें जो मुझमें नही है... हा डायलॉग चक दे इंडियाच्या आधीपासून ते आजपर्यंत अनेक फिल्म्समध्ये या ना त्या स्वरुपात हमखास ऐकायला मिळतो... सौंदर्याच्या बाबतीत म्हणा नाही तर बुद्धिमत्तेच्या, फॅशनेबल कपड्यांपासून ते गाडी, मोबाईलपर्यंत, एकीकडे कोणीतरी हिरॉईन किंवा बिनधास्त गर्ल आणि दुसरीकडे साधी भोळी मुलगी अशी ही तुलना ठरलेलीच... पण अशी तुलना फक्त चित्रपटातच होते असे नाही... घरात, कॉलेजच्या कट्ट्यावर, रस्त्यावरून सहज फिरताना, लग्न समारंभात असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये अशी सर्वत्र घडणारी ही गोष्ट आहे. उघडपणे नाही झाली तर मनातल्या मनात तर नक्कीच होते. ही तुलना अयोग्य की योग्य? स्वतःची तुलना इतर मुलींबरोबर करत बसण्यापेक्षा स्वत:मध्ये काय वेगळेपण आहे हे ओळखण्यात वेळ घालवला तर? खरंच आयुष्यात काहीतरी करायचे असेल, स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर ही तुलना करत राहणं कितपत फायद्याचं आहे?

कसला ड्रेस घातला आहे गं तिने? तिने हा हेअरकट असा नव्हता करायला पाहिजे... काय चॉईस आहे तिचा? तिने हा बॉयफ्रेंड कसा पटवला असेल? या आणि अशा अनेक कॉमेंट्स आपण कट्ट्यावर, वर्गात, घरात किंवा बाहेर रस्त्यावरून फिरताना सहजपणे करतो किंवा दुसऱ्याच्या ऐकतो.

काही घरांमध्ये त्यांच्या मुलींची तुलना शेजारी राहत असलेल्या मुलींशी किंवा नातेवाईंकाच्या मुलींशी केली जाते. बघ ती शेजारची मुलगी घर संभाळून अभ्यास करून देखील तिने पहिला नंबर काढला आहे, नाही तर तू घरातलं एक काम नको करायला आणि तरी तुझा नंबरही येत नाही. एवढंच बोलून घरातले गप्प बसत नाहीत. बघ जर शिक तिच्याकडून काही तरी हा अगदी फुकटचा सल्लाही दिला जातो.

लहानपणापासून सतत तुलना होत असल्यामुळे अनेकांच्या मनात ते बिंबवलं जातं. म्हणूनच त्या मुली मोठ्या झाल्यावर तशाच वागतात. हा परिणाम फक्त स्वतःच्या वागण्यापुरता मर्यादित राहत नाही तर स्वतःची तुलना इतर मुलींबरोबर करण्याची सवय त्यांना लागते. म्हणजेच त्यांना ही सवय लागण्यास कारणीभूत त्यांचे कुटुंबियच अधिक असतात असं म्हणायचं का?

शिक्षणाबद्दल तर घरोघरी सारखीच परिस्थिती आहे. डॉक्टर, इंजिनिअर होण्याची जबरदस्ती केली जाते, त्यासाठी सायन्सला प्रवेश घेण्याची धडपड, पण मुलीला आवड असते विज्ञान सोडून वाणिज्य किंवा अन्य शाखेची... तिचे काही सायन्समध्ये लक्ष लागत नाही. मग त्या मुलींची चिडचिड होऊ लागते... त्यानंतर मग हे काही जमत नाही म्हणून घरी सांगतिले तर घरचे बोलतात नाही तुला करावे लागले तुझ्या प्रवेशासाठी एवढे पैसे भरले आहेत. या दबावाखाली अनेक मुली एकतर कुटुंबियांपासून दूरावतात किंवा नको तो निर्णय घेण्याच्या मनस्थितीत येतात.

ठाण्यातील के जी बेडेकर महाविद्यालयातील प्राजक्ता सुर्वे म्हणाली, "मी माझी तुलना दुसऱ्या सोबत करत नाही. पण माझी एक सवय आहे. ती म्हणजे मला नेहमी असं वाटतं की, त्या व्यक्तीला जे जमलं ते मला सुध्दा जमेल. त्यात काय कठीण आहे. उलट तिच्यापेक्षा मला खूप चांगले जमेल अस मला सतत वाटते. मला असं वाटतं कारण माझ्यात तसा आत्मविश्वास आहे. माझ्यात तेवढी जिद्द आहे की, मी जे ठरवते ते मी पूर्ण करतेच."

ठाण्याच्या न्यू कळवा महाविद्यालयात शिक्षण घेतलेली पल्लवी भोईर म्हणाली, "काही मुली आपले आयुष्य बिनधास्त जगत असतात. त्यांना पाहिजे तसं त्या वागतात, बोलतात. त्यांच्याकडे पाहून वाटतं की ती किती मस्त आहे. ती तिला पाहिजे तस करते. तिला तिचे अस्तित्व आहे. पण तशी हिंमत किंवा धाडस मी दाखवू शकत नाही. त्यामुळे साहजिकच मनामध्ये स्वतःची आणि अन्य मुलींची तुलना सुरू होतो."

डोबिंवलीच्या एसएनडीटी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेली तृप्ती भुजबळ म्हणते, "मी काही प्रमाणात माझी तुलना दुसऱ्या मुलींबरोबर करते. कारण त्यांचे शिक्षण जास्त झाले असते. माझे शिक्षण कमी झाले आहे. त्यामुळे माझ्या विचारात आणि त्यांच्या विचारत फरक पडतो. त्या एखादा निर्णय पटकन घेऊ शकतात तसा मी घेऊ शकत नाही. उच्चशिक्षित मुलींचे मत विचारात घेतले जाते, अगदी ते विरोधातले असले तरीही. कारण आपले मत कसे योग्य आहे हे आपल्या कुटुंबियांना पटवून देणे त्या मुलींना जमते. या गोष्टी मला जमल्या नाही. अशा प्रसंगांमुळे नकळतपणे आपली तुलना अन्य मुलींबरोबर केली जाते असा माझा अनुभव आहे."

पॉझिटिव्ह थिंकिंग

मला असं वाटतं की स्वतःची तुलना इतर मुलींबरोबर करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय येतं याचा विचार करावा. आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा विचार करणे केव्हाही योग्य आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचे काहीतरी वेगळेपण दडलेलं असतं. पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. कारण त्याला ते समजून घेण्यापेक्षा दुसऱ्याकडे काय आहे, ते माझ्याकडे का नाही याकडे अधिक लक्ष असते. मला तर वाटत की, तुम्ही असा विचार करावा की, जे मला जमते ना ते कोणाला जमणार नाही. मग तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण जाणवेल आणि तेव्हा तुमच्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. तुमची समजात नव्याने ओळख होईल आणि तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण कराल. तुम्ही ज्या व्यक्तीपासून प्रेरणा घेता त्या गुणधर्म असलेल्या महिलांचे निरीक्षण करणे नेहमीच आश्चर्यकारक असते. आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांच्याकडून शिका. स्वत:ची इतर मुलींशी तुलना करू नका, त्याऐवजी त्या काय करतात ते पाहा. या गोष्टींसाठी तिने कसे कार्य केले ते पहा आणि नंतर तुमचे ध्येय निश्चित करा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News