इरफान खानच्या 'त्या' व्हायरल फोटोमागे काय आहे सत्य? जाणून घ्या..  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 May 2020

दोन दिवसांत बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते जगाला निरोप घेऊन गेले. बुधवारी इरफान खान यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांत बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते जगाला निरोप घेऊन गेले. बुधवारी इरफान खान यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याचवेळी गुरुवारी रोमान्स किंग ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. विशेष गोष्ट अशी आहे की दोन्ही मृत्यूचे कारण कर्करोग होते. इरफानच्या मृत्यूच्या पूर्वीचा रुग्णालयातील असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की मृत्यूच्या आधी अभिनेत्याचा हा शेवटचा फोटो आहे. 

काय आहे व्हायरल मेसेज?
या फोटोमध्ये इरफान अत्यवस्थेत दिसून येत आहे. याशिवाय त्याच्यावर उपचार होत असताना त्याची काय परिस्थिती झाली होती, असा दावा या फोटोतून करण्यात येत आहे. या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहे. युजर्सच्या मते, हा फोटो इरफानचा शेवटचा फोटो आहे. ज्यावेळी तो कॅन्सरशी झुंज देत होता. 

काय आहे, व्हायरल फोटोमागचं सत्य?
याबाबत अधिक पडताळणी केली असता, हा फोटो इरफानचा असल्याचा दावा खोटा ठरला आहे. या फोटोत दिसणारी व्यक्ती इरफान नाही. फोटोला जवळून निरखून पाहिल्यास लक्षात येते की, हा फोटो एडिट केला आहे. खरं तर हा फोटो पाच वर्षे जुना आहे. फोटोत असणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरेशभाई पटेल आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, अल्बामामध्ये भारतीय नागिरकाला मारपीट केल्याप्रकरणीचा हा फोटो आहे. पोलिसांनी या भारतीय  इसमाला मारहाण केली होती. अनेक मीडिया चॅनेल्सने ही बातमी दाखवली देखील होती. दरम्यान अल्बामाचे गव्हर्नर रॉबर्ट बेंटले यांनी या प्रकरणी भारतीयांची लेखी माफी मागितली होती. तसेच मारहाण करण्याच्या आरोपावरून पोलीस अधिकाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं.  

मात्र गेल्या काही दिवसांपासून हा फोटो सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमधील व्यक्ती इरफान खान असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा असून तो फोटो एडिट केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे फोटो व्हायरल करण्यापूर्वी पडताळून घ्यावे, अफवा पसरू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान इरफान खानच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या बोलक्या डोळ्यांनी अभिनय करणाऱ्या आणि साधेपणातून मोठं होणाऱ्या स्टारला सर्वच स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News