लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागच्या बाजूस हा किल्ला असल्याने हा किल्ला थेट नजरेस पडत नाही. द्रुगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज नजरेस येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर काले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना.

प्राचीन बंदरांना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गची निर्मिती केली होती. साधारणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

इ. स. १८८५च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७मध्ये कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील स्वराज्यात सामिल करून घेतला. किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे.

सन १६६०मध्ये या भागाच्या सुरक्षितेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जुन १६६५ रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार, १८ जुनला कुबदखानाने हलालखान व इतर सरदारसोबत या परिसरचा ताबा घेतला. इ.स. १६८२च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवाल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८मध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितीस किल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे. थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याची टाकी आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजूने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारच्या पायऱ्या दमछाक करणाऱ्या आहेत.

दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकी आहे. तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडे वर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथून माघारी फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांपाशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरा मागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपणा ध्वजसंतभाच्या जागी पोहोचतो.

बालकिल्यावरून समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेत येतो. एकंदरित हा सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो, त्यामुळे नक्की या किल्ल्याला भेट द्या.