आत्महत्येवर उपाय काय ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.

मुंबई : समाजात आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात तरुणाईच प्रमाण अधिक आहे. अपयश आल्यामुळे अनेक वेळा आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो, असे विविध संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आले. ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असा सूर समोर येऊ लागला. 'अपयश आल्यावर आत्महत्या करणे याला काय म्हणावे लागेल? अपयश आले तर पर्याय काय? आत्महत्या अभ्यासक्रमात विषय असावा का?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या झालेल्या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत. 

पहिली गोष्ट म्हणजे माणसाला यश आणि अपयश या दोहोंची सवय असावी. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला नेहमीच एक अनुभव देते. आत्महत्येचा प्रश्न आला तर अपयश किंवा कोणतंही कारण आत्महत्येच कारण बनू शकत नाही. आत्महत्या म्हणजे समोर आलेल्या परिस्थितीतून पळ काढणे एवढंच ! पण ती नैराश्याची स्थिती माणसाकडून काहीही करुन घ्यायला तयार असते. अपयश आले तर पर्याय म्हणजे "हे ही दिवस जातील" हे नेहमी स्वतः ला सांगणे आणि ती गोष्ट ज्यात आपल्याला अपयश आलं आहे ती अशीच सोडून न देता नेटाने त्यात प्रयत्न करणे. अपयशाला सामोरे जाताना हा विषय अभ्यासक्रमात असावा ही कल्पनाच मुळात खूप सुंदर आहे; विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्वांनाच यशाबरोबरंच अपयशाची सुद्धा सवय असणं आणि त्याला अंतर्मुख होणं आज काळाची गरज बनली आहे. आणि त्याचा पर्याय हा आत्महत्या नसतोच हे जाणून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे .
-साक्षी साळुंखे 

मुळातच आत्महत्या करणे हे चुकीचे लक्षण आहे. खर पाहिलं तर अपयश हेच तर यशाची पहिली पायरी असते, कारण अपयश आल्याने आत्महत्या करणे हे खूपच चुकीच ठरेल. अपयश आलं तर आपण कोणत्या बाबतीत कमी पडलो हे शिकायला मिळेल आणि यश कसे मिळेल यासाठी आपण सर्वोत्तपरी प्रयत्न करतो. माझ्या मते अपयश आले म्हणून आत्महत्या करणे अंत्यत चुकीची बाब आहे. माझे गुरुवर्य संदीप काळे सरांच्या मतांशी मी सहमत आहे. 
- श्रीराम मोटरगे 

आत्महत्या या विषयावर एका बाजूने बोलणे तसे मला वैयक्तिक दृष्ट्या पटत नाही. कोणतीही व्यक्ती मज्जा म्हणून आत्महत्या करत नाही. तर तो एक खूण असतो. स्वतःचा स्वतः केलेला खून किंवा समाजाने, जवळच्या व्यक्तीने, चुकीच्या सिस्टीमने केलेला त्या व्यक्तीचा केलेला खून. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एकतर जवळचा व्यक्ती नसावा किंवा त्याला व्यक्त होता येत नसावे, असेच समजेन. टोकाचा निर्णय घेण्यामागे कारणीभूत सर्वात आधी कोण असेल तर त्या व्यक्तीच्या घरातील नातेवाईक आणि त्याच्या सहवसातील लोक. सध्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला वाटत आपला मुलगा पहिला यावा. नेहमी. जिंकत राहावे, आणि हीच नेहमी जिंकण्याची सवय मनाला हार न पचवण्याची सवय लावून जाते, आणि कधी अपयश आले तर, घरातील काय म्हणतील,लोक काय बोलतील, या शुल्लक कारणाने व्यक्ती आत्महत्या कडे वळतो. व्यवसायिक क्षेत्रात सुद्धा घरातून पैसा मिळाला किंवा कर्ज काढले तर जोपर्यंत यश मिळते तोपर्यंत सगळे तुमच्यासोबत बहुतेक तुमच्या पुढे असतात पण जेव्हा अपयश सुरू होते तेव्हा सगळे तुमच्यावर चुकीचा निर्णय घेतला म्हणत आरोप करून एकटे सोडतात. अश्यावेळी आत्महत्या करणे हाच पर्याय त्या व्यक्तीला दिसत असतो. एका वर्गात परीक्षा वेळी खूप मुलांनी चुकीच्या मार्गाने पेपर लिहिले, मी त्यांना विचारले "असे का..?" तर त्यांनी जास्त गुण पडावे म्हणून असे केले असल्याचे सांगितले. मी पुन्हा बोललो,"जास्त गुण तुम्हाला का पाहिजेत?" तर ती बोलले की,"आम्हाला जास्त गुण नको, आमच्या आई बाबांना पाहिजे, ते परीक्षा झालो की आम्हाला किती मार्क पडणार? एवढे पैसे भरलेत, एवढे मार्क पाहिजे, असे प्रश्न विचारतात". अश्या वेळी मुले का तणावात येणार नाहीत? का अपयश आले की मग चुकीच्या मार्गाला जाणार नाही?. तसेच सध्या प्रत्येकजण लोकांवर कमी विश्वास ठेवत आहे,घात होईल या भीतीने कोणीच कोणाला स्वतच्या अडचणी सांगत नाही. ही एक समजात वाढत चाललेली सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे की,  माणसाचा माणसावरून उडत चालला विश्वास.
    
अपयशाला सामोरे जाण्यासाठी अभ्यासक्रमात विषय वाढवला तर मला वाटतं आताची परिस्थितीत त्या विषयात सुद्धा पुन्हा स्पर्धा चालू होईल. जास्त मार्क पाडण्यासाठी पुन्हा मुलांच्या डोक्यावर अजून एका विषयाच्या अभ्यासाचा लोड वाढेल. अभ्यासक्रमात विषय वाढवण्यापेक्षा पास/ नापास पद्धतीत बदल करता आला तर खूप चांगले होईल. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खास वेगळी कॉलेज प्रत्येक शहरात उभे करता आले तर त्या कॉलेज मध्ये शिकताना सर्व नापास विद्यार्थी एकत्र आल्यामुळे त्यांचा गेलेला आत्मविश्रास पुन्हा येईल व फक्त आपणच नापास नाही झालो, आपल्यासारखे खूप आहेत, ही एक भावना तयार होईल. तसेच व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अपयश येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या कुटुंबाने आणि मित्र मंडळीना त्यांच्या सोबत राहण्याचे आवाहन सोशल मीडिया आणि इतर क्षेत्रातून केले तर मला वाटतं खूप मोठा नाही पण काही प्रमाणात नक्कीच फरक पडू शकतो. कारण कोणीच आपल्या मर्जीने आत्महत्या नाही करत. कळत नकळत आपण समाज सुद्धा त्याला कारणीभूत असतो.
- शंभूराज पाटील

अपयश आल्यावर कित्येक जण चिंतेत पडतात, एकांतात विचार करीत बसतात. या उलट अपयश आल्यानंतर कुटुंबियांसोबत बसून त्या अपयश येण्यामागे असलेली कारणे शोधून पुढच्या वेळेस कोणती काळजी घेता येईल ज्यामुळे आपणास यश मिळेल यावर विचार करायला पाहिजे. एकांतात प्रश्न सुटत नाही, बिनधास्त कसलाही कमीपणा मनात न ठेवता प्रत्येक प्रश्नांवर उत्तर शोधणे गरजेचे आहे. एखाद्या अपयशाने खचून न जाता अब्राहम लिंकन ना आदर्श मानून सतत प्रयत्न सुरू ठेवल्यास यश नक्की मिळेल असा सकारात्मक विचार डोक्यात ठेवावा. एखाद्या अपयशाने आयुष्य संपविणे हा एकमेव पर्याय नाही.
- प्रशांत बदकी

अखेर पर्येंत न टिकणारे म्हणजे अपयश. कुठल्या एक ठराविक वयात अपयश येतं. अस काही नाही, भीतीची भावना, माझ्याकडून हे होईल की नाही. मी हे करू शकेल की नाही. अस झालं तर. हे काय म्हणतील ते काय म्हणतील सतत दुसऱ्यांचा विचार करत आपण अपयश ओढवून घेतो. हे बघ त्या शेजारच्या मुलाला ऐवढे मार्क्स पडलेत, हा तुला त्याच्या पेक्षा जास्तच पडायला हवेत. अहो, आमचा भैया की नाही खूप हुशार आहे. परीक्षेचा निकाल लागतो पण भैया त्याचे मार्क्स पाहण्यासाठी ह्या जगात नसतो. कारण त्याच्या मनात भीती असते की जर मला अपेक्षे पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही तर आई बाबा मला खूप मारतील. त्या मारा पोटी घरच्यांच्या इज्जती पोटी भैया हा आत्महत्येचा निर्णय घेतो. आणि घरच्यांच्या हातात उरतो फक्त निकाल. सतत आपण वेग वेगळ्या गोष्टी करत असतो पण बऱ्याचदा अपयशी ठरतो. ते म्हणतात ना यशाला खूप जोडीदार असतात पण अपयशाला मात्र कोणी जवळ सुद्धा यायला मागत नाही. सतत अपयश येणे कुठलीही नवीन गोष्ट केली की माझ्याचं. बरोबर अस का घडतं. मी काय कोणाच घोडं मारलंय माझ्या कडून का काही होत नाही. अश्या सतत च्या अपयशाने कुठे तरी मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो. बर का करायची आत्महत्या अपयश येतंय म्हणून हो तू मेल्यावर तुला सगळे खूप चांगला होता असच बोलणार आहेत हे ऐकायचे का. बर ते ऐकायेलाही तू ह्या जगात नसणार आहे जर आत्महत्या केलीस तर आणि हे खरं आहे अपयशात मात्र कोणी साथ देखील देत नाहीत .कर प्रयत्न येउदे शंभर वेळा अपयश पण एक दिवस यश नक्की लोटांगण घालेल . त्या मुळे आत्महत्या करण्या पेक्षा निर्लज्ज बना नवीन क्षेत्राचा शोध घ्या एखाद्या कामाची लाज वाटत असेल तर न लाजता ते काम करा . स्वतःला वेळ द्या .स्वतःला अपडेट करा . एखाद्या कामात झोकून द्या नसेल पैसा खिशात तो पण येईल फक्त तुम्ही शोध घ्या तुमच्या आतल्या ताकदीचा तुमच्या बुद्धिमत्तेचा . शिक्षणात तर जरूर ह्या विषयाचा समावेश असावा. 
- संदिप पालवे. 

माझ्या मते तर अपयशाच्या पूर्वी यश काय असत हे समजून घेणं खूप फलदायी ठरेल, यश व अपयश एकाच नाण्याचे दोन बाजूच म्हणावे लागेल, जसे एका नाण्याची एक बाजू छापील व एक बाजू कोरी असेल तर त्या नाण्याला, किंमत उरेल का? नक्कीच नाही, याच प्रमाणे यश आणि अपयश आहेत, समजा या भूतलावर अपयश नावच काहीही नसत तर  यशाची किंमत आपल्याला कशी कळाली असली. अपयश येणं तर स्वाभाग्य म्हणावं लागेल, जो यशाची खरी किंमत उमगवून जात, पण काही युवक अपयशाची गाठभेट झाली तर लगेच आत्त्महत्येकडे वळण घेतात! का? कश्यासाठी हा मूर्खपणा! जर जीवनात अपयश आलंच नसत तर यश म्हणजे काय असत, त्याला मिळविण्यासाठी कशी धावपळ करावी लागत कस कळल असत! अपयश हा यशाचा आधार आहे, यश काय असत कळून देणारा आहे, जे काम आपण करत आहोत त्या कामाला पुन्हा जोमाने करण्याची स्फूर्ती देणारा आहे. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे " success comes form experience and experience comes form bad experience... अपयश  हे आपलं एक प्रकारचं शिक्षकच. जो कल्पनाशक्तीच्या पुढे जाऊन आपल्याला शिकवण देत, मग याला घाबरून मृत्यूशी गाठ बांधण्याचं कारण काय? या अपयश नावाच्या शिक्षकाने दिलेल leasson जीवनाचा मूलमंत्र आहे फक्त गरज आहे या शिक्षणाने दिलेलं शिक्षण आत्मसात करण्याची,  या शिक्षकाने दिलेलं अनुभव पचवण्याची!
-  कपिल राठोड

अपयश आल्यावर आत्महत्या करणे हे अत्यंत टोकाचे पाऊल आहे. जीवनात आपण जर सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवला तर उत्तमता आणि प्रतिभेने सारं काही जिंकता येतं. अपयश आले तर निराश न होता पुन्हा नव्याने त्याची तयारी करणे होय. अपयश आल्यावर कोणतंही वाईट पाऊल उचलणं योग्य नाही. आपण अपयश आलं तर न खचता तितक्याच धीराने खंबीरपणे आपण उभे पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून संकटांवर मात केली पाहिजे.
- स्वप्निल सच्चिदानंद नावडकर

आत्महत्या ही भारत देशासमोरील एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आपल्या आजूबाजूला नेहमी दोन प्रकारची माणसे वावरत असतात. एक म्हणजे स्वतःला जीवापाड जपणारी आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव पण घेणारी. तसेच या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाचा निभाव लागावा म्हणून आज जो तो धडपड करतोय. तस पाहिलं तर या आधुनिक काळामध्ये कोणी यश मिळवण्यासाठी पळतोय तर कोणी प्रेमासाठी झगडत आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदी आयुष्याच्या व्याख्यांचा बदल झालेला दिसून येतो. नाण्याला जशा दोन बाजू आहेत अगदी तशाचप्रकारे अपयशाला देखील दोन बाजू आहेत 1) यश 2)अपयश. 

यशाचा मार्ग सर्वाना हवाहवासा वाटतो, पण अपयश हे पचवायला कठीण असल्यामुळे लगेचच आत्महत्या हा मार्ग स्वीकारला जातो. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. तरी सुद्धा आपण कुठेतरी कमीच पडत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाचा संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो, आणि त्या संघर्षमयी वाटेवरूनच यशाचे शिखर गाठायचे असते. हे शिखर गाठताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या अडचणींना तोंड न देता तांनतनाव नैराश्य यातून स्वतःला लगेच संपवले की सगळेच प्रश्न सुटतील अशे विचार मनात घर करू लागतात. आणि मग आत्महत्या हेच टोकाचे पाऊल उचलले जाते. हे खूप चुकीचे आहे. 
 
समाजामध्ये आत्महत्या करण्यामध्ये तरुणाईचा जास्त कल आहे. याचे कारण असे की प्रत्येक मुलाचे आईवडील हे त्याच्याकडून करियर विषयी नको त्या अपेक्षा ठेवतात, त्यांच्यावर अभ्यासाचे स्पर्धा परीक्षाचे मानसिक दडपण लादले जाते. आणि मग त्यात अपयश आल्यावर ही मुलं टोकाचं पाऊल उचलतात. मुख्य म्हणजे काही मुलांचे तर नको ते लाड पुरवले जातात, त्याच्या आयुष्यामध्ये नाही हा शब्दच मुळीच त्यांना माहीत नसतो आणि मग पुढे जाऊन नाही शब्द ऐकायला मिळाला की त्यांना जीवन संपवणे सोडून दुसरं काही सुचतच नाही. त्याहीपलीकडे जाऊन पाहिलं तर आज प्रेमाच्या अट्टहासापायी बहुतेक तरुण तरुणी आत्महत्या करत आहेत. 
 
तरुणांच्या सर्वात जवळील मित्रमैत्रीण हे त्याचे आईबाबा असतात, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासामध्ये, करियरमध्ये अपयश आल्यानंतर समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना बोलत केलं पाहिजे, एकदा पडल्यानंतर जो पुन्हा उठून जोमाने पळायला लागतो तो शर्यत जिकल्याशिवाय राहत नाही. त्यांना धैर्याने त्या गोष्टींचा सामना करायला शिकवलं तर त्यांना नक्कीच यश मिळेल. अभ्यासक्रमामध्ये विषय ठेवण्यापेक्षा त्या व्यक्तींना घरच्यांनी समजून घेणे गरजेचे आहे, अपयश आल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे मला वाटते. 

1) दिवस -रात्र ( अंधार- उजेड)
यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अंधारांनंतर उजेड नसेल तर त्या अंधाराला काही किंमतच नसते.
2)सुख -दुःख, आयुष्यामध्ये फक्त सुखच उपभोगायला मिळालं तर दुःखाच महत्त्वच समजलं नसते 
3) अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनात फक्त त्याला यशच मिळालं तर त्याला अपयशाची चव कशी चाखता येणार... म्हणून यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा आनंद माणसाला घेता आला पाहिजे. अपयश आल्यावर आत्महत्या न करता दोन्ही हातांनी त्याचा सहज सामना करायला शिका, मानवाचे जीवन हे एकदाच आहे त्यामुळे आत्महत्या हा त्या जीवनाला लागलेला कलंक आहे, त्यामुळे तो कलंक पुसून टाकून जीवनाचा मनोसोक्त आनंद घ्यायला शिका...
- शिल्पा नरवडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News