कोरोना योद्‌ध्यांसाठी कोणत्या योजना राबवल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • कोरोना आजाराशी प्रत्यक्ष लढा देताना मृत्यू झालेल्या कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांसाठी सरकारने कोणत्या योजना राबविल्या आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
  • कोरोना साथीमध्ये वैद्यकीय आणि प्रशासकीय विभागातील कर्मचारी प्रत्यक्ष काम करीत आहेत.

मुंबई :- कोरोना आजाराशी प्रत्यक्ष लढा देताना मृत्यू झालेल्या कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांसाठी सरकारने कोणत्या योजना राबविल्या आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. कोरोना साथीमध्ये वैद्यकीय आणि प्रशासकीय विभागातील कर्मचारी प्रत्यक्ष काम करीत आहेत. यापैकी काही जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यूही झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर अशा कर्मचाऱ्यांना हुतात्मा घोषित करावे आणि त्यांच्या वारसांसाठी योजना राबवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका पत्रकार केतन तिरोडकर आणि अन्य एकाने ऍड. अपर्णा व्हटकर यांच्यामार्फत केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. मृत कोरोना योद्‌ध्यांना सन्मान घोषित करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. न्यायालयाने यामध्ये का हस्तक्षेप करावा, असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला. यावेळी केंद्र सरकारकडून ऍड. अनिल सिंह यांनी बाजू मांडली. केंद्र सरकार नागरिकांना असे नामांकन देऊ शकत नाही. केवळ प्रतिष्ठित पद्म पुरस्कार केंद्र सरकार देते, असे सिंह यांनी स्पष्ट केले. याचिकेवर पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

राज्य सरकारने कोरोना योद्‌ध्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला सांगितले. तसेच, पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या अध्यादेशाची माहितीही त्यांनी दिली. मात्र, त्यातून स्पष्टता येत नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News