गर्भपात का होतो?

डॉ. रेश्‍मा राजभोई, सातारा 
Thursday, 11 April 2019

मूल होणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण! पण त्याचबरोबर अचानकपणे होणारा गर्भपात हा सुद्धा तितकाच शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य बिघडविणारा प्रसंग. कोणाच्याही आयुष्यामध्ये अगदी नकोसा वाटणारा. साधारणपणे 30 ते 50 टक्के गर्भधारणांमध्ये वारंवार होणारे गर्भपात आढळतात. का होतो हा गर्भपात? योग्य रीतीने वारंवार गर्भपाताकडे पाहिले तर 90 टक्‍के पूर्ण महिन्याचे बाळ त्या माउलीच्या हातात देऊन, आई- बाबा होण्याचे स्वप्न पूर्णत्वाला नेऊ शकतो.

समोर "मलाच का?" हा प्रश्‍न विचारणारी माउली सांगत होती. उगाच झपझप चालू नको, उड्या मारू नको, सारखं सारखं जिन्यावरून वर- खाली करू नको, जड वस्तू उचलू नको, आता दोघं एकत्र झोपू नका, हे खाऊ नको, ते करू नको; पण आमचं कोण एकतंय डॉक्‍टर... असं म्हणणारी माता- माय.

माझ्यासारख्या असंख्य स्त्रीरोग तज्ज्ञांना नवीन नाही. या अशा गरज नसलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यातच उभ्या करणाऱ्या आणि काहीही वैज्ञानिक आधार नसलेल्या सल्ल्यांना सामोरं जाणं म्हणजे गुन्हा न करता त्या माउली ला झालेली शिक्षाच असते. म्हणूनच आज आपण पहिल्या तीन महिन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या गर्भपाताविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

वारंवार होणारा गर्भपात (रिकरंट प्रेगन्सी लॉस) म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये जर 20 आठवडे पूर्ण होण्याआधी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा गर्भपात होणे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा होणारे गर्भपात वारंवार होणारे गर्भपात समजले जाऊन त्याविषयी तपशीलवार तपास करणे व योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
 
सर्वसाधारणपणे 30- 50 टक्के गर्भधारणांमध्ये वारंवार होणारे गर्भपात आढळून येतात. त्यापैकी 15 टक्के दिवस आहेत हे कळल्यानंतर होतात. रोग परिस्थिती विज्ञानाच्या परीक्षणानुसार पुनरुत्पादन क्षमता असणाऱ्या 1-2 टक्के स्त्रियांमध्ये वारंवार होणारे गर्भपात दिसून येतात. शंभरापैकी 80 गर्भपात पहिल्या तीन महिन्यांमध्ये होतात. एक स्वप्न भंग पावतं अन्‌ हताशपणा येतो. 

का होतो हा गर्भपात? बहुतेकदा जवळजवळ 60 टक्के गर्भपात हे गर्भामध्ये असलेल्या दोषांमुळे होतात. निसर्ग आपली किमया करतो अन्‌ आपली काळजी घेतो. जे खराब आहे ते पडून जातं आणि जे चांगले आहे त्याचीच फक्त वाढ होते. 

एकट्या महाराष्ट्रामध्ये एप्रिल 2017 ते मार्च 2018 अखेर एकूण 60 हजार 495 गर्भपात अचानकपणे होणारे (spontaneous abortions) आढळून आले आहेत. म्हणूनच त्याच्या कारणांचा शोध घेऊन योग्य सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. 

वारंवार होणाऱ्या गर्भपाताची कारणे? 
1) रोग परिस्थिती विज्ञानानुसार कारणीभूत ठरणारे घटक 

अ) आईचे वय जर 35 वर्षांवरील असेल तर वयोमानानुसार अंडबीजाची संख्या व गुणवत्ता या दोन्हीवर परिणाम होतो व वारंवार होणारे गर्भपात दिसून येतात. 
ब) वडिलांचे वय 40 वर्षांवरील असेल तर. 
क) आधी जर गर्भपात झाला असेल तर पुढच्या गर्भधारणेमध्ये गर्भपात होण्याचा धोका जास्त असू शकतो. 
ड) सिगारेट, दारू, अतिप्रमाणात कॉफीचे सेवनही वारंवार होणाऱ्या गर्भपाताशी निगडित आहेत. 

2) गर्भातील गुणसूत्र दोष ः जवळजवळ 30 ते 57 टक्के केसेसमध्ये गर्भपात होण्याचे कारण हे आढळून आलेले आहे. जसे जसे वय वाढत जाते तसे हे कारण असण्याची शक्‍यता जास्त. 

3) आई किंवा वडिलांमधील गुणसूत्र दोष ः 
साधारणपणे 2-5 टक्केमध्ये हे कारण असू शकते. यामध्ये जरी बाळ झाले तरी ते व्यंग असलेले होऊ शकते. 

4) अँटिफॉस्फोलिपीड अँटीबॉडी सिण्ड्रोमा ः 
योग्य उपचार उपलब्ध असणारे हे कारण जवळजवळ 15 टक्के स्त्रियांमध्ये आढळतं की ज्यामध्ये 90 टक्के रुग्णांना हमखास यश मिळते. 

5) स्त्रीमध्ये शारीरिक रचनात्मक दोष असतील. जसे की गर्भाशयाच्या पिशवीला पडदा असणे किंवा दोन तोंड असलेली पिशवी असणे आदी 10 ते 15 टक्के केसेसमध्ये हे कारण असू शकते. 

6) संप्रेरकांमधील असंतुलितपणा ः 
थाररॉईड असंतुलन, पी. सी. ओ. डी., ल्युटियल फेज डिफेक्‍ट ही कारणे 17 ते 20 टक्के केसेसमध्ये आढळून येतात. 

7) स्वप्रतिरक्षित रोग (Immunological factors) 

8) काही विषाणू किंवा जिवाणूजन्य संसर्ग 0.5 ते 5 टक्के रुग्णांमध्ये आढळून येतात. 

9) इनहेरिटेड थ्रॉंब्रोफिलिया (Inherited thrombo Philia) 

10) सर्वांत महत्त्वाचे असं, की काही कारणच नाही, सगळे नॉर्मल आहे असे 40- 50 टक्के रुग्णांमध्ये दिसून येते. 

मग आता या बागुलबुवाचं करायचं तरी काय? कारण आपण 90 टक्के गर्भपात योग्य सल्ला व उपचाराने टाळू शकतो. 

काय महत्त्वाचे...? 

अ) तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यावश्‍यक आहे. अंगारे धुपारे करून गर्भ टिकत नाही. "डॉक्‍टर, सगळं केल बघा, पण गुण काही नाही. बाहेरवाशाचं पण बघितलं,' ही वाक्‍य एकविसाव्या शतकात मनाला वेदना दिल्याशिवाय राहात नाहीत. 
ब) फक्त आईचाच तपास नाही तर आई व वडील दोघांचाही तपास करणे गरजेचे आहे. हे समजावून सांगताना डॉक्‍टरांबद्दल शंका घेणारे जास्त असतात. 
क) दोन गर्भधारणेमध्येच सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन गरजेचे. जेणेकरून पुढील गर्भधारणेच्या आधी नियोजन केले जाईल. 
ड) लिखित स्वरूपातील माहिती पेशंटसना देणे खूप महत्त्वाचं ठरते. 
ई) महत्त्वाचे तपास ः 

आई व वडील दोघांमध्ये खालील तपास करावेत. 
1) कम्पलिट ब्लड काउंट (सीबीसी), 2) लघवीचा तपास 3) रक्तगट 4) साखरेचा तपास 5) थॉयरॉईड प्रोफाईल 6) एचआयव्ही 7) एचबीएस एण्टिजेन 8) गुणसुत्रांचा तपास. 
आईच्या तपासण्या ः पेल्व्हिक सोनोग्राफी, ऍप्ला टेस्ट, होमोसिस्टीन लेवल, फॅक्‍टर V लेडन, फॅक्‍टर II जिन म्युटेशन, प्रोटीन एस. 
गर्भामध्ये असणाऱ्या गुणसुत्रांतील दोष तपासणे म्हणजेच गर्भ गुणसुत्र तपासणेही गरजेचे आहे. हे खर्चिक असले, तरी गरजेचे आहे. कारण मुळाशी गेल्याशिवाय उपचाराचा मार्ग सापडत नाही. 
फ) तपासाअंती ज्या काही कमतरता आहेत त्या उपचारांनी भरून काढणे महत्त्वाचे. 

हे अत्यावश्‍यक... 
गर्भधारणेपूर्वी कमीतकमी तीन महिने आधी फॉलिक ऍसिडची गोळी सुरू करावी. आहार, योग्य व व्यायामाचे योग्य नियोजन करावे. थॉयरॉईड किंवा मधुमेह यांचा उपचार करणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. ल्युटियल फेज डिफेक्‍टमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक खूप फायदा देते.

पहिले तीन महिने हे संप्रेरक वापरले तर गर्भपाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते. जर गर्भाच्या गुणसुत्रांमध्ये दोष असेल तर शक्‍यतो परत दोष येण्याचा धोका खूपच कमी असतो व नियमित गर्भारपणातील काळजी पुरेशी ठरते; पण जर आई वडिलांच्या गुणसुत्रांमध्ये दोष असेल तर जेनेटिक एक्‍स्पर्टस्‌चा सल्ला घेणे अत्यावश्‍यक आहे. ऍप्ला सिण्ड्रोम यामध्ये ऍस्पिरिनची गोळी व हिपॅरिनचं इंजेक्‍शन देणे खूप फायद्याचे आहे. 

हिपॅरिनचं इंजेक्‍शन महाग असले तरी ऍप्ला सिण्ड्रोम, इनहेरिटेड थ्रॉम्बोफिलिया व काहीही कारण न आलेल्या गर्भपातामध्ये ते खूप उपयोगी पडते, तसेच प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक ही खूप फायद्याचे आहे. योग्यरीतीने आपण जर वारंवार गर्भपाताकडे पाहिले तर जवळजवळ 90 टक्‍के पूर्ण महिन्याचे बाळ "त्या' माउलीच्या हातात देऊन, आई व बाबा होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News