आत्महत्या करुन काय मिळते?

लक्ष्मण जगताप
Saturday, 24 October 2020

मोबाईलपेक्षाही तुमचे आयुष्य अनमोल आहे. आईबापांसाठी तुम्ही काळजाचा तुकडा आहात...आणि हा तुकडाच नाहीसा झाला तर त्यांनी जगायचे कुणासाठी?

मुलांनो, आत्महत्या करुन काय मिळते?

कोरोनाने सगळं जग आपल्या कवेत घेतलं .असं एकही क्षेत्र नाही की त्याला कोरोनाचा फटका बसला नाही.मग त्याला शिक्षणक्षेञ तरी कसे अपवाद राहिल. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा जूनमध्येही उघडू  शकल्या नाहीत. मुलांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून अॉनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला.या अॉनलाईन शिक्षणासाठी मोबाईल ,संगणक, लॅपटॉप यासारख्या साधनांची गरज आहे.

सधन पालक मुलांना ही साधने देऊ शकतात परंतु ज्यांना रोजगारच नाही ,आर्थिक चणचणआहे ,खाण्याची भ्रांत आहे अशा पालकांच्या मुलांकडे  मोबाईल नसल्याने शिक्षण होत नाही. मग ही मुले नैराश्यातून आत्महत्या करतात आणि जीवन संपवून टाकतात.

जूनपासून आपण देशभरातील आकडेवारी जर बघितली तर मुलांच्या आत्महत्यांचे सञ चालूच आहे.या आत्महत्या थांबणार कधी ? समाज म्हणून आपण त्यावर काही विचार करणार आहोत की नाही ? का आणखी किती आत्महत्या होतात याचीच वाट पाहत बसणार ?

विद्यार्थी मित्रहो, आईवडीलांसाठी तुम्ही त्यांचा प्राण आहात.केवळ मोबाईल नाही म्हणून आत्महत्या करुन जीवन संपवू नका.तुम्हांला अजून खूप दिर्घ पल्ला गाठायचा आहे.आता तर कुठे आयुष्याची सुरूवात आहे.असे अर्ध्यावर डाव मोडून जावू नका.आईबापाने अंगाखांद्यावर खेळवून व रक्ताचे पाणी करुन मोठे केले आहे ते आत्महत्या करायला का? 

तुम्ही एका क्षणात निर्णय घेऊन मोकळे होता.पण त्या आई नावाच्या माऊलीला काय यातना होत असतील याचा कधी विचार केलात का?  तुमच्यासाठी हाडाची काडे करुणा-या बापाच्या काळजाला तुमच्या अशा अचानक जाण्याने किती मोठा खड्डा पडत असेल याचाही थोडाही  विचार मनात येत नाही का? 

मोबाईलपेक्षाही तुमचे आयुष्य अनमोल आहे.आईबापांसाठी तुम्ही काळजाचा तुकडा आहात ...आणि हा तुकडाच नाहीसा झाला तर त्यांनी जगायचे कुणासाठी ? आणि कशासाठी ? तुम्ही त्यांचे सर्वस्व आहात.त्यांचा जीव सगळा तुमच्याच आणि तुम्ही मागचा पुढचा कोणताही विचार न करता.आत्महत्येचा मार्ग निवडता.फक्त मोबाईल नाही म्हणून

...असा वेडा आणि चुकीचा विचार करु नका.थोडे दिवस तुमचे शिक्षण राहिले म्हणून काही फरक पडणार नाही.पण तुम्ही या जगात नसल्याने तुमच्या कुटुंबाचे काय होईल? याचा जरा एकांतात बसून विचार करा.मोबाईल नसेल तर पुस्तकांच्या माध्यमातून स्वयंअध्ययन करा.मित्रांची मदत घ्या.शिक्षकांशी बोलून मार्ग काढा.पण आत्महत्येचा मार्ग निवडू नका.

आज ना उद्या कोरोनाची परिस्थिती बदलेल.शाळा महाविद्यालये सुरू होतील.नियमित शिक्षण चालू होईल.म्हणून वाट पहा.मनावर संयम ठेवा.निराश होऊ नका.तुमच्या सारख्या कितीतरी मुलांकडे मोबाईल नाही.मग त्यांनीही  आत्महत्याच करायच्या का?

तुम्ही निवडताय तो मार्ग चुकीचा आहे.हे सुंदर आयुष्य स्वतः हाताने व अविचाराने संपवू नका.तुम्ही तुमच्या आईवडीलांचे आधारस्तंभ आहात.केवळ मोबाईल नाही म्हणून आईवडीलांना पोरके करुन जावू नका.तुमच्या नसण्याने त्यांच्या आयुष्यातील प्रकाशच नष्ट होईल.त्यांना तुम्ही हवे आहात.तुम्ही त्यांचा श्वास आहात.याचे भान राहू द्या.त्यांना दुःखाच्या खाईत ढकलू नका.म्हणून थोडा धीर धरा.पण आत्महत्या करु नका...कारण जीवन खरंच सुंदर आहे.

- लक्ष्मण जगताप

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News