WEEKEND कोल्हापूर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 May 2019

नृसिंहवाडी

नृसिंहवाडी

नृसिंहवाडी हे नृसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र आहे. प्रत्येक १२ वर्षाला या ठिकाणी कन्यागत महापर्वाचे आयोजन केले जाते. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप... असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो. संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या घाटावर मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते. येथील बासुंदी, पेढे, कवठाची बर्फी प्रसिद्ध आहे. जवळच कुरुंदवाडच्या हद्दीमध्ये घाट आहे. या घाटावर संताजी घोरपडे यांची ऐतिहासिक समाधी आहे. या घाटावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

रामलिंग, धुळोबा
आळते येथे डोंगराच्या कुशीत रामलिंग देवस्थान आहे. रामलिंगकडे जाताना दुतर्फा असणाऱ्या वनराईमुळे पर्यटकांना आनंद मिळतो. रामलिंग येथे अत्यंत प्राचीन गुहा मंदिर आहे. मंदिरासमोरील सभामंडपात सर्वप्रथम विठ्ठल-रखुमाईची मूर्ती दिसते. हेमाडपंथी सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम गुहा मंदिरातील विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या मूर्तीचे दर्शन होते. वीरभद्र, श्रीगणेश, काळभैरव, पार्वतीमाता मूर्तींच्या दर्शनानंतर शिवलिंगाचे दर्शन होते. गुहा मंदिरात वर्षभर ठिकठिकाणी झरे वाहतात. रामलिंगपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर अलमप्रभूगिरी हे देवस्थान आहे. घनदाट वनराईतून येथे वाहनासह जाता येते. ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर दाट झाडीतून पायवाटेने येथे जाता येते. येथून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. 

जहाजमंदिरनिसर्गाच्या सान्निध्यात सौंदर्याने नटलेले हे स्थळ सुमारे १५० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. येथील धर्मशाळेसमोर कलात्मक, रचनात्मक व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले जहाजमंदिर आहे. १५४ फूट लांब, १२२ फूट रूंद व २५ फूट उंच असे तीन मजली जहाजमंदिर आहे. मंदिराभोवताली नयनरम्य परिसर आहे. बाहुबलीपासून हाकेच्या अंतरावर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील शैक्षणिक संकुल आहे. हे संकुल शैक्षणिक व सामाजिक तीर्थक्षेत्र बनले आहे. कर्मवीर अण्णांच्या जन्मगावी रयत शिक्षण संस्थेने सुमारे पाच एकर जागेत आदर्शवत स्मारक उभे केले आहे. या स्मारकात अण्णांचा जीवनपट मांडला आहे.
 

खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर
खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. एका मोठ्या, अखंड शिलेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. शिवलिंग व कोपेश्‍वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. याच गावात हेमाडपंथी शैलीतील जैन मंदिर आहे. या मंदिरात साडेसहा ते सात फूट उंचीचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे.
 

कुंथुगिरी
हातकणंगले-रामलिंग मार्गावर रामलिंग फाट्यापासून पुढे काही अंतरावर कुंथुगिरी येथे सम्मेद शिखरजी मंदिराची भव्य प्रतिकृती बनविण्यात आली आहे. हे एक नव्याने पुढे आलेले प्रेक्षणीय स्थळ आहे. नांदणी मठ, नेज-कुंभोज मार्गावरील बाबूजमाल दर्गा, नृसिंहवाडी येथील काच मंदिर, शिरोळ येथील दत्त भोजन पात्र मंदिर, तसेच सैनिक टाकळी येथील नदीकाठी असलेले प्राचीन राम मंदिरही पाहण्यास प्रेक्षकांची नेहमीच वर्दळ असते.
 

बाहुबली अन्‌ कर्मवीर संग्रहालय
संपूर्ण भारतामध्ये जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असणारे बाहुबली तीर्थक्षेत्र हे अन्य धर्मीयांनाही आकर्षित करते. दक्षिण भारतातील मिनी शत्रुंजय म्हणून हे देश-विदेशात प्रसिद्ध आहे. भारतामध्ये राजस्थाननंतर कुंभोजगिरी येथील जहाजमंदिर, बाहुबली पहाडावरील श्री १००८ भगवान बाहुबलींची अति प्राचीन मूर्ती यांसह आधुनिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News