'या' संकेतस्थळावर तरुणांना रोजगाराची माहिती मिळणार; आजचं करा नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 June 2020
  • कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगार संधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्‍यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे. बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्‍यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना "जॉब ऑफर' मिळू शकते. या शिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्‍लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानुसार रोजगार संधींची माहिती मिळणार आहे.

संकेतस्थळावर रोजगारविषयक सर्व सेवा या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामूल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी दिलेल्या सुविधांचा आवश्‍य लाभ घ्यावा, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News