युवकांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघाने काकोडा कुडचडे येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

कुडचडे :  संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांचे कार्य विस्‍तारले आहे. आजच्या युवकांनी महाराजांचे चरित्र तपासून एकतरी गुण आत्मसात करावा. रयतेसाठी राज्य चालविताना जातीभेद, धर्मभेद कधी मानला नाही, ना कुणावर अन्याय केला नाही. शिवाजी महाराजांच्या अविस्मरणीय कार्याची जाणीव युवकांना करून देण्‍यासाठी काकोडा बॉइजचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केले. 

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा संघाने काकोडा कुडचडे येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. फोंडा येथील जगदंब ढोल पथकाने उत्सवात अधिकच रंगत आणली. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पुष्पहार घालून व सुवासिनींनी आरती ओवाळून शिवजयंतीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हर... हर.. महादेव अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते. 

 यावेळी माजी आमदार सुभाष फळदेसाई, प्रमुख वक्ते ॲड. शिवाजी देसाई, महादेव देवस्थानचे अध्यक्ष स्वप्नील सावंत देसाई, नगरसेवक विश्‍‍वा सावंत देसाई, अपर्णा प्रभू देसाई, प्रसाद फळदेसाई, दिप्तेश देसाई, संदीप फळदेसाई, सुहास फळदेसाई उपस्थित होते. 

ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. शिवजयंती आज संपूर्ण भारतात साजरी केली जात आहे. शिवजंतीला संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे. या दिवशी प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करताना घराघरावर भगवे झेंडे उभारायला हवे. साडेतीनशे वर्षानंतरही शिवजयंती नव्हे तर शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर सुरू आहे आणि तो वर्षोनुवर्षे अधिकच तळपत राहणार आहे. शिवचरित्र वीस मिनिटात सांगून होत नाही तर त्यासाठी दिवस कमी पडतील, असे आमच्या राजाचे चरित्र 
आहे. 
      माजी आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले की, शिवाजी महाराज हे मुस्लिम धर्माविरुद्ध होते, असा खोटा प्रचार पसरविण्यात आला. वास्तविक शिवाजी महाराजांच्‍या सर्व आघाडीवर मुस्लिम सरदार प्रमुख होते. कुठल्याही धार्मिक स्थळाची मोडतोड न करता उलट बांधून देण्यात आली. 

अश्या राजाची थोरवी सांगावी तितकी थोडी आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील दहा टक्के तरी गुणांची जोपासना करण्याचे आवाहन उपस्थित शिवप्रेमींना केले. 
   त्यानंतर मिरवणूक शेल्‍डे, आसोल्ड, कोठंबी, केपे, बाळ्ळी, फातर्पामार्गे कुंकळ्ळी रवाना झाली.---

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News