महापूर

विजय कदम
Wednesday, 21 August 2019

दुर्दैव आमचं हेच आहे साहेब
पोसतोय तुमच्यासारखा भस्मासुर
जरा इकडेही लक्ष द्या साहेब 

 

घ्या जेवढा पाहिजे तेवढा घ्या 
स्वतः स्वतःचाच बडवून ऊर, 
जरा इकडेही लक्ष द्या साहेब
आमच्या भागात आलाय महापूर॥

कसला म्हणायचा हा निसर्ग 
आसमानी संकट घेऊन आला,
काल हवाहवासा तो वाटणारा 
पाऊस आज नकोनकोसा झाला, 

अहो कष्टाने भारलेल्या संसाराचा
बघा, कसा झालाय चक्काचूर॥ 
जरा इकडेही ---

आरडाओरडा नीट ऐका हो 

भुकेने तडफडणाऱ्या पोरांचा, 
ध्वनी  दिसना कुठेच आपला 
हंबरडा फोडताना त्या ढोरांचा,

झाली ताटातूट आपल्या माणसांची 
काय कळणार तुम्हा ती हुरहुर॥ 
जरा इकडेही ---

पर्यटनस्थळ सध्या झालं आहे 

साहेब तुमच्यासाठी आमचा भाग,
पण सेल्फी, नौकाविहाराच्या नादात
काय कळणार तुम्हा पोटाची आग,

कारण सत्तेच्या त्या खुर्चीखाली
निघतोय अतिआत्मविश्वासाचा धूर॥ 
जरा इकडेही ---

जाऊद्या तुम्हाला सांगून काय उपयोग
कारण कातडी तुमची त्या गेंड्याची,
खुशाल करा राजकारण आता
काळजी तुम्हाला तुमच्या झेंड्याची,

दुर्दैव आमचं हेच आहे साहेब
पोसतोय तुमच्यासारखा भस्मासुर॥
जरा इकडेही लक्ष द्या साहेब 

आमच्या भागात आलाय महापूर ॥ 
 

                      
             .
                
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News